शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

शिवसेना-भाजपकडून राज्यपालांच्या स्वतंत्र भेटी कशासाठी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळालं. मात्र, दोन्ही पक्षांच्या जागांची संख्या 2014 च्या तुलनेत कमी झाली असून, शिवसेनेचा भाव वधारला आहे. त्यामुळं दोन्ही पक्षात सत्तेची रस्सीखेच दिसून येते आहे.
 
विधानसभेचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला, आज 28 ऑक्टोबर उजाडल्यानंतरही सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला नाहीय.
 
त्यातच आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी सकाळीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, रावतेंच्या भेटीनंतर काही वेळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
 
शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष युती करूनच विधानसभा निवडणुका लढले. मात्र, निकालात ज्याप्रमाणे जागा मिळाल्या त्यावरून सत्तेची रस्सीखेच दोन्ही पक्षात दिसून येतेय. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचालाही उधाण आलं आहे.
 
दिवाकर रावतेंनी राज्यपालांची भेट घेणं हा दबावतंत्राचा भाग असल्याचं वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात.
 
"अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद आणि 50-50 चा फॉर्म्युल्याला भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. या पार्श्वभूमीवर दबावतंत्र म्हणून दिवाकर रावते राज्यपालांना भेटले असावे," असं सुधीर सूर्यवंशी म्हणतात.
 
तर ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, हे सर्व माध्यमांनी चालवलेली अतिरंजित प्रकरणं आहेत.
 
नानिवडेकर पुढे म्हणतात, "निवडून आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको, अशी एकूणच शिवसेना आमदारांची मागणी आहेत. त्यामुळं रावतेंचं स्थानच अनिश्चित आहे. रावते हे महत्त्वाचे नेते असले तरी मातोश्रीचे धोरण ठरवणारे नेते नाहीत. आणि जरी सेनेचं धोरण ठरवणारे असले तरी माध्यमांनी सेना-भाजपची आमदारसंख्या सुद्धा पाहिली पाहिजे."
 
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेची धडपड?
"गेली पाच वर्षे सत्तेत राहून विरोधकासारखं वागल्यानं शिवसेनेला फटका बसलाय. यंदा जागा कमी झाल्यात. पुन्हा तसं केल्यास आणखी जागांवर फटका बसेल. अशा सर्व स्थितीत मुख्यमंत्रिपद महत्त्वाचं आहे," असं सुधीर सूर्यवंशी सांगतात.
 
शिवाय, "मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळाल्यास राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक संकेत जाईल. त्यामुळं रावतेंची राज्यपालांशी भेट केवळ संकेत नसून, काहीतरी नक्कीच शिजतंय," असंही सूर्यवंशी म्हणतात.
 
मात्र, जोपर्यंत शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचं समर्थन नाही, तोपर्यंत सध्याची आकडेवारी पाहता शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं ही केवळ कवी-कल्पना आहे, असं नानिवडेकर म्हणाल्या.
 
राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीवर फडणवीस आणि रावते काय म्हणाले?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी राज्यपालांशी भेटीबाबत माहितीही दिली.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज सकाळी राजभवनात भेट घेऊन दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील सद्यस्थितीची माहिती त्यांना यावेळी दिली."
 
तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते म्हणाले, "मुंबईचा महापौर असल्यापासून म्हणजे 1993 पासून दिवाळीनिमित्त राज्यपालांची भेट घेऊन शुभेच्छा देण्याची माझी प्रथा आहे. त्याप्रमाणे यावेळीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या."