मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (21:20 IST)

शिवसेना-भाजप सत्तासंघर्ष : देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, उद्धव ठाकरेंचा चर्चेस नकार

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन कोण करणार या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळालं नाहीये. मात्र 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्यानं राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे.
 
काँग्रेसची 'वेट अँड वॉच'ची भूमिका
"राज्यपाल कुठलं पाऊल उचलतात यकडे लक्ष आहे, सरकार स्थापन करण्याचा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही," असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.
 
"भाजप सरकार स्थापन करू शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे, फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे लोकांनी त्यांना नाकारलं आहे. शेतकऱ्यांबाबत बोलायला कुणी तयार नाही," अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
 
महाराष्ट्रात घटनात्मक सरकार यावं अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
 
भाजपनं आरोप फेटाळले
भाजपवर लावण्यात आलेला खोटा आरोप आम्ही खारीज करतो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
 
उद्धव ठाकरेंचं मन मोदींबाबत कोण कलुषीत करत आहे याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा. तसंच मोदींवर टीका करणारी माणसं तेव्हा विरोधात होती, असं स्पष्टीकरण त्यांनी दुष्यंत चौटाला यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिलं आहे.
 
आम्हाला सत्तेपेक्षा सत्य महत्त्वाचं आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
 
अजूनही नातं तुटलं असं आम्ही म्हणत नाही, लहान भावानं मोठ्या भावाचं ऐकावं, असं मुनगंटीवर यांनी स्पष्ट केलं आहे.
 
मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही - उद्धव ठाकरे
"कोणत्याही टिकेची पर्वा न करता मी लोकांचे मुद्दे मांडत राहिलो. माझ्यावर पहिल्यांदा कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर अमित शहांचा संदर्भ घेऊन खोटे आरोप केले आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
"शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीसांच्या मदतीची गरज नाही. तसंच अमित शहांच्या उपस्थितीत आमचा फॉर्मुला ठरला होता, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
आता महाराष्ट्रासमोर 'हे' आहेत पर्याय
"मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट धक्कादायक होतं, त्याचं मला दुःख झालं. खाते वाटप मी मानलं असतं, पहिली अडिच वर्ष तुमची दुसरी तुमची हे मी मानलं असतं. पण पद शब्दात मुख्यमंत्रिपदसुद्धा येतं," असं उद्धव यांनी फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याबाबत म्हटलं आहे.
 
मी भाजपला शत्रूपक्ष मानत नाही, पण त्यांनी खोटं बोलू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दुष्यंत चौटाला यांच्या काही क्लिप पत्रकारांना दाखवून अशा टीका शिवसेनेनं मोदी आणि शहांवर केली नसल्याचा दावा केला आहे.
 
"जेव्हा युती तुटली होती तेव्हा आरएसएसकडून मला संपर्क करण्यात आला होता, आरएसएसनंही सांगावं की खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 
बहुमत नसताना सरकार कसं येणार, असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
 
तसंच भाजपनं लवकारत लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा किंवा इतरांसाठी सर्व पर्याय खुले करावेत, असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं आहे.
 
युती ठेवायची असेल तर पहिल्यांदा शपथ घ्या, असं त्यांनी भाजपला उद्देशून म्हटलं आहे.
 
मी चर्चेला दरवाजे बंद केलेले नाहीत, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये. तसंच मी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं आहे.
 
अयोध्येचा जो काही निकाल येणार आहे त्याचं क्रेडीट सरकार घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला आहे.
 
मी दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात - गडकरी
"अजूनही वेळ गेलेली नाही, आमच्या युतीची ताकद हिंदुत्व आहे. त्यामुळे अजूनही पर्याय खुले आहेत, मी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे, मार्ग काढण्यास मी आग्रही आहे आणि शक्य असल्यास मी नक्की प्रयत्न करेन," असं नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.