शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 (17:09 IST)

शिवसेना-भाजप सत्तासंघर्ष : माझ्यासमोर कधीही अडीच वर्षांच्या मुद्द्यावर निर्णय झाला नव्हता - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन कोण करणार या प्रश्नांचं उत्तर अजूनही मिळालं नाहीये. मात्र 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्यानं राजकीय घडामोडींना मात्र वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी तो स्वीकारला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
 
राज्यपालांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
 
यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या इतर घटक पक्षांचे आभार मानले. तसंच फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली.
 
"अडीच वर्षाचा मुख्यमंत्री अशी चर्चा माझ्यासमोर झाली नाही. याउलट यावरून एकदा आमची चर्चा फिस्कटली होती. माझ्यासमोर तरी अडीच वर्षाचा विषय झाला नाही. पण अमित शहा यांना सुद्धा विचारलं पण असं काही नाही असं शहांनी सांगितलं."
 
"उद्धव ठाकरे यांनी माझे फोन घेतले नाहीत. आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती, चर्चा आम्ही नाही तर शिवसेनेनं थांबवली, शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करण्याचं धोरण स्वीकारलं," असं फडणवीस यांनी म्हटलंय.
 
"ज्या भाषेत बोललं जातं त्या भाषेपेक्षा जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे," असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं आहे.
 
भाजप कुठलंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
 
काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेणार आहे का - शरद पवार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली.
 
भाजप आणि शिवसेनेनं सत्ता स्थापन करण्यासाठी रामदास आठवले यांनी प्रयत्न करावेत, असं त्यांना सांगितल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या स्थितीत फरक आहे, इथं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे शिवसेना-भाजपनं सत्ता स्थापन करायला हवी, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
 
"बरोबर या असं शिवसेनेनं सांगितलेलं नाही, आठवलेंनी सांगितलेलं नाही की भाजपनं सांगितलेलं नाही," असंही शरद पवार यांनी सांगितलंय.
 
तसंच राज्यात लगेच निवडणुका होणार नाहीत असं वाटत असल्याचंही पवार यांनी म्हटलंय.
 
"काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेणार आहे का," असा सवाल पवार यांनी शिवराज पाटील चाकूरकरांनी केलेल्या वक्तव्यावर केला आहे. चाकूरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेनं आघाडीला पाठिंबा द्यावा असं म्हटलं होतं.
 
शिवसेनेची बैठक संपली
अवकाळी पावसामुळे शतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेबाबत योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
 
शिवसेनेच्या आमदारांना कुणीही फोडू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.
 
काँग्रेसने पुरावे द्यावेत - मुनगंटीवार
"काँग्रेस नेत्यांनी खोटा आरोप केला आहे, हा लोकशाहीचा अवमान आहे. भाजप कोणत्याही काँग्रेस आमदारच्या संपर्कात नाहीये आणि राहाणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 48 तासंमध्ये त्याचे पुरावे द्यावेत नाहीतर जनतेची माफी मागावी," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
 
चर्चा प्रत्येक स्तरावर सुरू आहे, असं उत्तर मुनगंटीवर यांनी नितीन गडकरी यांच्या मुंबई भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे.
 
नितीन गडकरीच्या घरी नेत्यांची बैठक?
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भाजपचे काही नेते दाखल झाले आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी पाटील-निलंगेकर, सुभाष देशमुख हे गडकरींच्या घरी पोहोचले आहेत.
 
वडेट्टीवार यांचा आरोप
भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. "सत्तेसाठी कुठल्याही थराला हे राजकारण जाऊ शकतं. अनेकांना भाजपकडून प्रलोभनं दिली जात आहेत," असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
 
"शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटीची ऑफर दिल्याचा आरोप शिवसेनेने केला. हे माध्यमांसमोर आलं म्हणून आम्ही आमच्या आमदारांना असा कुठला फोन आला तर तो रेकॉर्ड करायला सांगितलं आहे. आम्हाला हे लोकांसमोर आणायचं आहे." असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. "आम्ही कोणत्याही आमदाराला आम्ही कुठे हलवलं नाही. काही आमदार जयपूरला गेले असतील तर ते फिरायला गेले असतील. त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही," असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
"काही आमदारांचे आम्हाला फोन आले आहेत. त्यांना भाजपकडून ऑफर आल्याचं सांगितलं जातंय. आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेऊ," असं विधान काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे.
 
"सगळेच आमदार आज संध्याकाळपर्यंत मुंबईला किंवा जिथे सांगण्यात आलंय तिथे पोहचतील. शक्यतो आम्ही एकत्र राहू आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे," असंही माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
 
काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे. पण भाजप-शिवसेनेनं सत्तासंघर्षाची जी भूमिका घेतली आहे, ती जनतेला मान्य नाहीये आणि काँग्रेस आमदारांचीही तीच भूमिका असल्याचं माणिकराव ठाकरेंनी सांगितलं.
 
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना भाजपतर्फे संपर्क करण्यात आला होता. परंतु, खोसकर हे काँग्रेसच्या सतत संपर्कात असून ते आमच्याबरोबर आहे, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही 'ऑपेरेशन लोटस'चा प्रयत्न होत असल्याचं काँग्रेस नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितलं आहे.
 
बीबीसी मराठीनं हिरामण खोसकर यांच्याशी संपर्क साधला. सुरूवातीला त्यांनी हा प्रकार नाकारला, मात्र नंतर काही व्यक्ती माझ्या घरी आल्या होत्या, मी बाहेर असल्याचे सांगत त्यांना टाळलं, असं खोसकर यांनी सांगितलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला येत आहेत. शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दौऱ्यावर होते. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते आपला दौरा अर्धवट सोडून येत असल्याची चर्चा होती. मात्र एनसीपीच्या सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे 8 नोव्हेंबरलाच मुंबईत येणं अपेक्षित होतं.
 
शुक्रवारी (8 नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही त्यासाठी मुंबईत येणार आहेत.
 
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे हे शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला. संभाजी भिडे हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याबाहेर दिसले होते. दरम्यान, संभाजी भिडे हे गुरुवारी (7 नोव्हेंबर) मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरे उपस्थित नसल्यामुळे संभाजी भिडे यांना मातोश्रीवरुन माघारी फिरावे लागले, असं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलं आहे.
 
विधानसभेची मुदत संपणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तांत्रिकदृष्ट्या आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. अंतिम मुदतीपर्यंत सरकार स्थापनेची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. नवं सरकार बनेपर्यंत देवेंद्र फडणवीसच काळजीवाहू मुख्यमंत्री राहू शकतात.
 
दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपकडे बहुमत असेल तर फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनावं. काळजीवाहू म्हणून सूत्र हलवू नये. हा जनादेशाचा अपमान असेल, असं वक्तव्य केलंय
 
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांसोबत महत्वाची बैठक होणार आहे. शिवसेना भवन इथं दुपारी बारा वाजता ही बैठक पार पडेल.
 
सत्ता स्थापनेचा दावा नाहीच
निवडणुकीत 105 जागा जिंकलेला भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्याला 56 जागा जिंकलेल्या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करणं आणि चालवणं शक्य नाही.
 
लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना जे ठरलं ते द्या, असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची मागणी करुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडलं आहे. तसंच शिवसेनेला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचंही संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण शिवसेनेने सत्ता स्थापन करण्याबाबत स्वतः कोणत्याही हालचाली अद्याप केलेल्या नाहीत.
 
दरम्यान, गुरुवारी (7 नोव्हेंबर) वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेनेनं सकाळी 11 वाजता आपल्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्यास भाजपशी कोणतीही चर्चा करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती सहभागी आमदारांनी दिली.
 
दुपारी भाजपचे चार नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जाऊन भेटले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी सत्तास्थापनेच्या कायदेशीर तरतुदींबाबत राज्यपालांकडून माहिती घेतली. पण सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही.