शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (12:42 IST)

धोनी रिटायर होणार नाही, पत्नी साक्षीनं केलं स्पष्ट

सोशल मीडियावर गुरुवारी दुपारनंतर अचानक महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.

धोनी आता क्रिकेट संन्यास घेणार असं चित्र सोशल मीडियावर निर्माण झालं असतानाच त्याची पत्नी साक्षी रावत हीने एक ट्वीट केलं. या सर्व अफवा असल्याचं तिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.
 
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टेस्ट टीम जाहीर करतेवेळी निवडसमितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या निवृत्तीचं खंडन केलं. धोनीच्या निवृत्तीसंबंधीच्या बातम्या चुकीचं असल्याचं ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
मग चर्चा कशी सुरू झाली?
मग अचानकपणे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली तरी कशी? गुरूवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं केलेल्या ट्वीटमुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल पुन्हा तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.
 
विराट कोहलीनं धोनीसोबतचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये कोहली धोनीसमोर गुडघ्यावर बसलेला दिसत आहे.

हा फोटो 2016 साली वर्ल्ड टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील आहे.
 
या फोटोसोबत विराट कोहलीनं लिहिलं होतं, "ही मॅच कधीच विसरू शकत नाही. ती रात्र खास होती. या व्यक्तिनं मला फिटनेस टेस्ट असल्याप्रमाणे पळवलं होतं."
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात भारतासमोर 161 धावांचं लक्ष्य होतं. धोनी आणि विराट कोहलीनं एकेरी-दुहेरी धावा घेत हा पल्ला गाठला होता. त्याचाच संदर्भ विराट कोहलीनं केलेल्या ट्वीटला होता.
 
यापूर्वीही निवृत्तीच्या चर्चांना उधाण
38 वर्षीय धोनी 2019 वनडे वर्ल्डकपनंतर निवृत्ती स्वीकारणार अशा चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र टीम इंडियाची वर्ल्डकप मोहीम सेमी फायनलमध्येच संपुष्टात आली.
 
वर्ल्डकपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला. मात्र लष्करी सेवेमुळे या दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचं धोनीने निवडसमितीला कळवलं. त्यामुळे विंडीज दौऱ्यातील वनडे आणि ट्वेन्टी20 सीरिजसाठीच्या संघात धोनीची निवड करण्यात आली नाही.
धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलपदी आहे. त्याने पॅराट्रूपिंगचं प्रशिक्षणही पूर्ण केलं आहे. भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर असताना धोनी लष्करी सेवेचा भाग म्हणून काश्मीरमध्ये कार्यरत होता. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. पहिल्या टप्प्यात ट्वेन्टी-20 मालिका होणार आहे. धोनीचं नाव ट्वेन्टी-20 संघात नव्हतं. धोनी टेस्टमधून याआधीच निवृत्त झाला आहे. आफ्रिकेविरुध्दच्या वनडे मालिकेत धोनी खेळतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. टीम इंडियाला 2007 ट्वेन्टी20 वर्ल्डकप, 2011 वर्ल्डकप, टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून देणाऱ्या धोनीने दिमाखात क्रिकेटला अलविदा करावा अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.