गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (16:05 IST)

एकनाथ शिंदे आपल्या सरकारचं भविष्य पाहाण्यासाठी गेले का?

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योतिषाची भेट घेऊन आपल्या आणि राज्याच्या भवितव्याविषयी जाणून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
 
सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्निक दर्शन घेतले.
 
ईशानेश्वर मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कॅ. अशोक खरात हे अंकशास्त्र-ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत.
 
अनेकजण त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात तेव्हा एकनाथ शिंदे हे देखील त्याच हेतूने खरात यांना भेटल्याची चर्चा आहे.
 
सरकार तंत्र-मंत्रात अडकलं - संजय राऊत
त्यांच्या या  भेटीवर अद्याप शिंदे किंवा खरात यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.
 
पण त्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. सरकार तंत्र-मंत्रात अडकले आहे त्यामुळे राज्यावर संकटं येत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई  यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केला आहे. त्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला घेरले आहे, त्यावरून संजय राऊत यांनी टीका केली.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची टीका
तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
 
ते म्हणाले, "मुख्यमंत्री नाशिकमधल्या एका ठिकाणी ज्योतिष पाहण्यासाठी गेल्याची सध्या चर्चा आहे. हे जर खरं असेल तर ते अत्यंत वेदनादायी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचं, मुख्यमंत्र्यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा निषेध व्यक्त करते. ज्योतिष हे शास्त्र स्वप्न विकण्याची कला आहे, थोतांड आहे, असं आम्ही वारंवार सिद्ध केलं आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असं कृत्य करणं म्हणजे समाजात चुकीचा संदेश परवण्यासारखं आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो," असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे.
 
देवस्थानच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवदर्शनसाठी आले होते, शेतकरी तसंच जनतेसमोरील अडचणी, संकटं दूर व्हावीत यासाठी प्रार्थना केल्याची माहिती माध्यमांना दिली.
Published By -Smita Joshi