बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (14:53 IST)

नंदुरबारमध्ये घराच्या अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला

leopard
घराच्या अंगात जेवण करण्यासाठी बसलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमध्ये घडला आहे. यानंतर बिबट्याने त्या महिलेला फरफटत नेऊन ठार केले आहे. मोगराबाई रुमा तडवी असे या महिलेचे नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यामधील डाबचा मालीआंबा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरात असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोगराबाई रुमा तडवी (वय 55 वर्षे) या रात्री 9 वाजेच्या सुमारास मालीआंबा येथे आपल्या राहत्या घराच्या अंगणामध्ये जेवण करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना फरफटत नेले. यावेळी घरामध्ये कोणीच नसल्याने असहाय्य झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे 20 ते 25 मीटर अंतरावर नेऊन त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न केले. यानंतर रात्री मोगराबाई यांचे पती आणि मुलगा घरी आले. परंतु त्या दोघांना मोगरबाई घरात न दिसल्याने त्यांनी आवाज दिला. जंगल परिसर असल्यामुळे घराशेजारी अंधार होता. त्या अंधारामध्ये त्यांनी मोगराबाई यांचा शोध घेतला परंतु त्या दिसल्या नाहीत.
 
त्यानंतर सकाळी 6 वाजेच्या सुमारास उजाडल्यानंतर मोगराबाई यांचे पती आणि मुलगा या दोघांनीही त्यांचा पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरापासून 20 ते 25 मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर बिबट्या मोगराबाई यांचा मृतदेहाचे लचके तोडतांना दिसला, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor