प्राजक्ता पोळ
एक सप्टेंबर 2019... भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांचा प्रवेश पार पडला. पण यावेळी पद्मसिंह पाटील हे स्टेजवर कुठेही दिसले नाहीत.
राणा जगजितसिंह यांनी 31 ऑगस्टला उस्मानाबादमध्ये सभा घेऊन राष्ट्रवादीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पद्मसिंह पाटील यांनी त्याच सभेत राणा जगजितसिंहांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह या पिता-पुत्रांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात प्रवेशावेळी राणा जगजितसिंह हे एकटेच स्टेजवर उपस्थित राहिले.
मग पद्मसिंह पाटील हे राणा जगजितसिंह यांच्याबरोबर भाजपमध्ये गेले की ते राष्ट्रवादीत राहिले याची चर्चा होताना दिसत आहे.
भाजपचं सोईचं राजकारण?
एक सप्टेंबरला राणा जगजितसिंह यांचा एकट्याचाच प्रवेश झाल्याच पद्मसिंह पाटील यांच्या निकटवर्तीयांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
गेल्या काही दिवसांत असं दिसलंय की मुलाने ज्या पक्षात प्रवेश घेतला त्याच्यापाठोपाठ त्याचे वडीलही त्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे.
पण, राणा जगजितसिंह यांचा भाजपात प्रवेश झाला मग पद्मसिंह पाटील यांचा प्रवेश का नाही? या प्रश्नाचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान सांगतात, "एकेकाळी तेरणा साखर कारखान्याचा घोटाळा असो किंवा पवनराजे निंबाळकर खून प्रकरण, पद्मसिंह पाटील यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आकाशपाताळ एक केलं होतं. पद्मसिंहांवर कारवाई होण्यासाठी विरोधी पक्षात असताना भाजपने आघाडी सरकारवर दबाव आणला होता.
पाटील घराण्याभोवती फिरणारं राजकारण
"पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर खून प्रकरणातील आरोपी असले तरी 45 वर्षं इकडचं राजकारण पाटील घराण्याभोवती फिरतय. पद्मसिंह पाटील हे आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत फक्त राणा जगजितसिंह पाटील यांना भाजप प्रवेश देऊन भाजपने सोईचं राजकारण केल्याचं दिसतंय," असं प्रधान सांगतात.
भाजपमध्ये जाण्याचा जगजीत सिंह यांना काय फायदा होऊ शकतो याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे सांगतात, "भाजप ज्या पद्धतीनं कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संस्थांनं खालसा करण्यासाठी भ्रष्टाचाराची प्रकरणं उखरून काढतय ते बघता राणा जगजितसिंह पाटील यांनीही भाजपमध्ये जाणं सोईचं मानल्याचं दिसतंय."
"राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. पद्मसिंह पाटील हे मागे राहिल्याने तिकडच्या राजकारणात फारसा फरक पडेल असं वाटत नाही. राणा जगजितसिंह पाटील यांना एकट्याला प्रवेश देणं हे भाजपच्या दृष्टीने योग्य ठरलंय," असं हुंजे सांगतात.
"उस्मानाबादच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून राणा जगजितसिंह यांचा भाजपा प्रवेश पाहता येईल," असं जेष्ठ पत्रकार रविंद्र आंबेकर यांना वाटतं.
या प्रवेशानंतर भाजपाची आणखी एक रणनिती समोर आली. आहे, ती म्हणजे युतीधर्म आपल्या पद्धतीने पाळायचा.
"निंबाळकर आणि पाटील घराण्यातल्या कट्टर वैराची जाणीव असूनही भाजपाने पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराला राजाश्रय दिला आहे. एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारलेत. शिवसेनेला शतप्रतिशत जी जाणीव करून दिलीय, तर शरद पवारांच्या परिवारात फूटही पाडलीय. भारतीय जनता पक्षाने आपला अजेंडा हा युतीपेक्षा वेगळा असल्याचं स्पष्ट केलंय," अंबेकर सांगतात.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवारांना सोडून गेले आहेत. त्यामुळे या पक्षात आपलं राजकीय भवितव्य काय राहील असा प्रश्नही अनेकांसमोर होता. तसेच राष्ट्रवादीचं राजकारण हे पवार कुटुंबाभोवतीच फिरतं यातूनही राणा जगजीत सिंह यांनी भाजपचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आंबेकर सांगतात.
"राष्ट्रवादीचं एकूणच सर्व राजकारण पवार परिवाराभोवती फिरताना दिसतंय. अशावेळी राणा यांच्यासमोर भाजपामध्ये सामील होण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी भाजपा मध्ये फारसं मानाचं स्थान नसतानाही अनेक राजकीय नेते भाजपामध्ये स्वखुशीने का जातायेत? हा खरा प्रश्न आहे." असं रविंद्र आंबेकर सांगतात.
पद्मसिंह पाटीलांनी कुठे म्हटलंय.....?
राणा जगजितसिंह पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. पद्मसिंह पाटील यांनी त्याला पाठिंबा दिला आहे त्याचं स्वागत आहे. पण पद्मसिंह पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं मला तरी ऐकिवात नाही. त्यामुळे जर जोपर्यंत पद्मसिंह पाटील हे भाजपमध्ये यायचंय असं म्हणत नाहीत तोपर्यंत यावर काही भाष्य करण्याचा प्रश्न येत नाही असं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी म्हटलंय.