शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (08:24 IST)

मोरबी : कोसळलेल्या पुलाला 'फिटनेस सर्टिफिकेट' मिळालं होतं?

morbi
गुजरातमधील मोरबी नदीवरील पूल कोसळल्याने आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
जवळपास शंभर वर्षे जुना असलेला हा पूल काही दिवसांपूर्वीच दुरुस्तीनंतर लोकांसाठी खुला करण्यात आला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरबीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबियांसाठी जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य अजूनही बेपत्ता आहेत, त्यांच्या संबंधीची माहिती हेल्पलाइन नंबर 02822 243300 वर घेता येऊ शकते, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळण्याची घटना घडली आहे. मोरबी येथील माचू नदीवरील शंभर वर्षे जुना पूल रविवारी (30 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी पुलावर उपस्थित असलेले पर्यटक नदीत कोसळले.
 
गुजरात इन्फॉर्मेशन विभागानं दिलेल्या माहितीच्या आधारे एएनआय या वृत्तसंस्थेने या दुर्घटनेत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत 177 लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
 
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंह सांघवी यांनी रात्री एक वाजता माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी 68 मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचं सांगितलं होतं.
 
बचाव कार्य सुरू असून अनेक लोक बेपत्ता झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
 
राजकोटचे खासदार मोहनभाई कल्याणजी कुंडरिया यांनी बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी रात्री उशीरा बोलताना आतापर्यंत 68 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली होती.
 
मृतांचा आकडा वाढण्याची तसंच मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
 
त्यांनी म्हटलं की, "माझ्या मते पुलावर लोक मोठ्या संख्येनं जमले होते, ज्यामुळे हा पूल तुटला. पुलावर जाण्यासाठी तिकीट विक्री करण्यात आली होती. त्यासंबंधीचीही माहिती घेतली जात आहे."
 
पूल कोसळला तेव्हा त्यावर 400 हून अधिक लोक उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
 
राजकोटच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार मोरबी दुर्घटनेनंतर जिल्ह्यातून 22 अँब्युलन्स, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आणि सहा नौका पाठविण्यात आल्या आहेत.
 
 
दुरुस्तीनंतरही पूल कसा कोसळला?
मोरबी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संदीप जाला यांनी सांगितलं, "हा पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत होता. त्यामुळे रहदारीसाठी, सार्वजनिक वापरासाठी बंद केला होता. अंजटा-ओरेवा संस्थेने पूल दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता."
 
ते पुढे म्हणाले, "जिल्हाधिकारी सरांनीही याबाबत बैठक घेतली होती. दुरूस्तीच्या कामासाठी दर निश्चित करायचे ठरले आणि पूल सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात येईल असंही ठरलं. 7 मार्च रोजी यासाठी ओरेवा कंपनीसोबत आवश्यक करार झाले. यानुसार 15 वर्षांसाठी व्यवस्थापन करायचे ठरले."
 
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना संदीप सिंग जाला यांनी म्हटलं, "डागडुजीसाठी मार्च महिन्यात पूल बंद होता. 26 ऑक्टोबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पूल खुला करण्यात आला. परंतु स्थानिक नगरपालिकेने पुलाचे फिटनेस प्रमाणपत्र जारी केलेले नव्हते."
 
या संपूर्ण प्रक्रियेबाबत बोलताना संदीप जाला म्हणाले, "संबंधित समूहाने करारानुसार डागडुजीचे काम सुरू केले होते. याबाबत माध्यमांसाठाटी रिपोर्ट्स सुद्धा प्रकाशित केले होते. यामुळे आम्हालाही कल्पना होती की काम सुरू आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सर्वोत्तम दर्जाचं सामान वापरलं जात आहे हे आम्हाला मीडिया रिपोर्ट्समधूनच कळत होतं."
 
"आता आम्हाला कल्पना नाही की हा पूल कसा कोसळला. त्याची क्षमता किती होती, बांधकामानंतर फिनटेस टेस्ट झाली होती की नाही. कोणत्या दर्जाचे सामान पुलाच्या कामासाठी वापरले," असंही ते म्हणाले.
 
जास्त लोकांना पुलावर जाण्यास परवानगी दिल्याबाबत त्यांनी सांगितलं," पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना तिथे जाण्याची परवानगी दिली गेली. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत."
 
पुलाच्या दुरुस्तीबाबत ते सांगतात, " संबंधित संस्थेने आणखी एका खासगी कंपनीला काम दिलं होतं. त्यांनी खासगीस्वरुपात आवश्प्रयक कागदपत्रांची व्यवस्था केली होती का याची आता आम्ही चौकशी करतोय. आम्ही त्यांच्या प्रतिनिधींना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. अद्याप संपर्क झालेला नाही. आता आम्ही कार्यालयातून रेकॉर्ड्स मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."
 
बतावकार्याबद्दल बोलताना झाला सांगतात, "आमची टीम सातत्याने बचावकार्य करत आहे. राजकोट पालिकेचे पथकही आम्हाला मदत करत आहे. ध्रगंधा, हलवाड, मालिआ इथल्या रेस्क्यू टीम सुद्धा काम करत आहेत. खासगी अँब्युलन्सची व्यवस्थाही केली आहे."
 
मोरबी जिल्ह्याचे मदत आयुक्त हर्षद पटेलांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "दुर्घटनेत नेमका किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले हे अद्याप स्पष्ट नाही. राज्य व्यवस्थापन, एनडीआरएफ, एनडीआरएफची पथकं मदतकार्य करत आहेत. जखमींना लवकरात लवकर उपचार देणे हे आमचे प्राधान्य आहे. राज्य आणि केंद्र सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी काम करत आहे."
 
पूल कधी बांधला गेला होता?
हा पूल अनेक वर्षांपासून बंद होता. डागडुजीनंतर हल्लीच लोकांसाठी हा पूल खुला करण्यात आला होता.
 
दिवाळीनंतर गुजराती नववर्षाच्या निमित्ताने पूल पुन्हा नागरिकांसाठी खुला केला होता. दिवाळीची सुटी आणि रविवार असल्याने पुलावर खूप गर्दी जमली होती.
 
जवळपास एक शतक जुना पूल कशामुळे कोसळला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. याचा तपास करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.मोरबीच्या मच्छू नदीवरील हा झुलता पूल मोरबीची एक वेगळी ओळख बनवण्याच्या हेतूने आधुनिक युरोपिय तंत्रज्ञानचा वापर करून बनवला होता.
 
मोरबी शहराच्या सरकारी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या पुलाला 'इंजिनिअरिंगचा चमत्कार' म्हटलं गेलं आहे.
 
हा पूल 1.25 मीटर रूंद आणि 233 मीटर लांब होता. हा पूल मच्छू नदीवर दरबारगढ महल आणि लखधीरजी कॉलेजला जोडत होता.