शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (17:22 IST)

SRA : किशोरी पेडणेकरांच्या चौकशीचा किरीट सोमय्यांचा दावा, काय आहे प्रकरण?

Kirit Somaiya
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (SRA) घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणात दादर पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना आज (29 ऑक्टोबर) पुन्हा चौकशीला बोलावण्यात आलं असून यासंदर्भात आपण मुंबई हायकोर्टात याचिकाही केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे, किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून पोलिसांनी चौकशी केल्याचं वृत्तही त्यांनी खोटं असल्याचा दावा केला. शिवाय, पोलिसांनी चौकशीला बोलावल्यास त्याला सामोरं जाण्याची तयारी असल्याचंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
काय आहे प्रकरण?
आज (29 ऑक्टोबर) सकाळपासूनच किशोरी पेडणेकर यांच्यावरील आरोपांच्या बातम्या सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होत्या.
 
लोकमत वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, "SRA मध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या प्रकरणात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्यावेळी दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव नव्हतं. पुढे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4 जणांना अटक केली.
 
"अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोरी पेडणेकर यांचा शेजारी आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश आहे. तर एक मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे. यातल्या दोघांनी स्टेटमेंटमध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं, असं या बातमीत म्हटलं आहे.
 
"SRA फ्लॅट द्यायच्या नावाखाली पैसे घेतले गेले, पण फ्लॅट मिळाला नाही, अशी तक्रार 9 जणांनी दाखल केली होती. या 9 जणांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही भाग किशोरी पेडणेकर यांना देण्यात आल्याचं अटकेत असलेल्या आरोपींनी सांगितल. त्यामुळे आज पहिल्यांदाच किशोरी पेडणेकर यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली," असंही या बातमीत म्हटलेलं आहे.
 
किरीट सोमय्यांच्या आरोपांची मालिका
 
या बातम्याांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आज एकापाठोपाठ एक असे तीन ट्वीट करून किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडल्या.
 
सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्या यांनी म्हटलं, "किशोरी पेडणेकरना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशन यावे लागणार, दादर पोलीस स्टेशन 12 SRA फ्लॅट्सच्या फसव्या विक्री प्रकरणात किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन्स पोलिस स्टेशनची चौकशी होणार आहे."
 
"वरळीतील 6 SRA फ्लॅटच्या बेकायदेशीर ताबा देण्यात आला. तसंच किश कॉर्पोरेटला बीएमसीचं कोव्हिड कंत्राटही दिलं गेलं होतं, याबाबत आपण हायकोर्टात याचिका केली आहे," असंही सोमय्या म्हणाले.
 
यानंतर दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी सोमय्या यांनी आणखी एक ट्वीट केलं.
kishori pednekar
किशोरी पेडणेकर यांनी 2017 च्या BMC निवडणूक प्रतिज्ञापत्रात SRA गोमाता नगर फ्लॅट 601 हे त्यांचं निवासस्थान दाखवलं आहे. त्या बेनामी मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
 
दरम्यान, यानंतर किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, महापौर महोदयांनी जे अॅफिडेव्हिट निवडणूक लढवताना दाखल केलं, त्याचं त्यांना विस्मरण होत आहे. त्यांच्या कंपनीने हायकोर्टात उत्तर देतानाही असंच लिहिलं आहे.
 
पेडणेकरांनी जे गरिबांचे गाळे ढापले, ते त्यांनी भाऊबीजेनिमित्त परत करावेत. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो आहे. एसआरएला पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टी वासियांच्या नावाने ढापले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
पेडणेकर यांनी चौकशी झाल्याचंच फेटाळलं
किशोरी पेडणेकर या आज (29 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपली पोलिसांनी चौकशी केली, हेच मुळात फेटाळून लावलं.
 
"माझी कोणतीही चौकशी झालेली नाही. हे कोण उठवतं, काही माहीत नाही. पण मी एक सजग नागरिक आहे. जर पोलिसांनी चौकशीला बोलावलं तर मी चौकशीला सामोरं जाईन," असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
उद्धव ठाकरे यांना भेटण्याचं कारण माध्यमांनी विचारलं असता, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठीच आपण आलो होतो. आपल्यावरील आरोपांविषयी या बैठकीत कोणतीही चर्चा झालं नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.
 
पेडणेकर पुढे म्हणाल्या, "माध्यमांनी या प्रकरणाच्या तळाशी जावं. एखाद्या महिलेवर कितीवेळा राजकीय अत्याचार करणार. हा माझ्या बदनामीचा प्रयत्न आहे. किरीट सोमय्या हे माझ्या बदनामीची सुपारी घेतात. आग नसताना भाजपकडून धूर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, शिंदे-फडणवीस हे नेते कधीच एखाद्या महिलेवर असे आरोप करणार नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
 
"मी बदनामीला घाबरत नाही. मी कशी आहे, मी काय काम करते, हे सगळं मी राहत असलेल्या परिसरातील लोकांना माहीत आहे. माझा संविधान, पोलीस यंत्रणा आणि न्यायालय यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे," असंही पेटणेकर यांनी म्हटलं.

Published By -Smita Joshi