शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (19:47 IST)

समंथाला दुर्मिळ आजार, ट्वीट करत म्हणाली, 'कधीकधी वाटतं, हे सगळं हाताबाहेर चाललंय'

samantha
"मला यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांशी हे शेअर करायचं होतं. पण यातून पूर्ण बाहेर पडायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे," असं म्हणत अभिनेत्री समंथाने झालेल्या आजाराबद्दल माहिती दिली आहे. समंथाने ही पोस्ट टाकताच हजारो चाहत्यांनी तिच्यावर सदिच्छांचा वर्षाव केला आहे.
 
समंथाने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. या फोटोत समांथाने पलंगावर बसलेला स्वतःचा एक फोटो पोस्ट केलाय, ज्यात तिच्या मनगटावर IV ड्रिप जोडलेली दिसतेय. तिच्यासमोर एक माइक उभा दिसतोय. यात तिचा चेहरा दिसला नसला तरी तिने तिच्या हातांनी हृदयाचे प्रतीक बनवले.
 
मागील काही दिवसांपासून समंथाची तब्येत बरी नसल्याने ती उपचारासाठी भारताबाहेर गेली होती.
 
या आठवड्याच्या सुरुवातीला तिच्या यशोदा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये सामंथा सरोगेट मदर यशोदाच्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे, ती एका गंभीर वैद्यकीय गुन्ह्याचे रहस्य धैर्याने उलगडते. तामिळ आणि तेलुगूमध्ये शूट केलेला यशोदा हिंदी, कन्नड आणि मल्याळम या तीन अतिरिक्त भाषांमध्ये डब करून रिलीज केला जाणार आहे.
 
हरी आणि हरीश दिग्दर्शित, यशोदा 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ती विजय देवरकोंडा सोबत आगामी रोमँटिक ड्रामा चित्रपट खुशीमध्ये देखील दिसणार आहे. 23 डिसेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
 
कोण आहे समंथा रूथ?
समंथा ही दक्षिण भारतातल्या सिनेमा इंडस्ट्रीतील स्टार अभिनेत्री आहे. तिचं बरचसं काम तेलुगू आणि तमिळ सिनेमांमध्ये केलं आहे. पण बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे न करताही तिचे भारतभर चाहते आहेत.
 
तिने 'ये माया चेसवे' या चित्रपटातून 2010 साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.समंथानं 'द फॅमिली मॅन' या वेब सीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही भूमिका केली आहे.
 
2017 साली समंथानं दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी विवाह केला होता. त्याआधी दोघंजण जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. चैतन्य हा दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि लक्ष्मी दागुबट्टी यांचा मुलगा.
 
चै-सॅम नावानं ओळखलं जाणाऱ्या या स्टार कपलनं काही फिल्म्समध्येही एकत्र काम केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यावरून अफवांचंही पेव फुटलं.
 
शेवटी दोघांनी आपण वेगळं होत असल्याचा निर्णय 2 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केला. काळजीपूर्वक विचारविनिमय करून चैतन्य आणि ती वेगळे होत असल्याचं तसंच मैत्रीची बांधिलकी कायम ठेवू असं समंथानं त्यावेळी सोशल मीडियावर लिहिलं होतं.
 
चैतन्यनेही त्यावेळी या कठीण काळ्यात चाहत्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं आणि आमच्या खासगी आयुष्याचा आदर ठेवावा असं आवाहन केली होतं.
 
पण फॅन्स आणि ऑनलाईन कम्युनिटीत अनेकांचं वागणं त्या उलट होतं.
 
समंथाने काय लिहिलं?
यशोधाच्या ट्रेलरला तुम्ही दिलेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. तुम्ही जे भरभरून प्रेम करता आणि तुमचा सगळ्यांचा भक्कम पाठिंबा यामुळेच आयुष्यातस समोर उभे ठाकणाऱ्या परिस्थितीला मी सामोरी जाऊ शकते.
 
काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा आजार झाल्याचं स्पष्ट झालं. मला यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांशी हे शेअर करायचं होतं पण यातून पूर्ण बाहेर पडायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे.
 
आपण नेहमीच कणखर असण्याची आवश्यकता नसल्याचं यानिमित्ताने माझ्या लक्षात आलं आहे. एखाद्या प्रश्नासमोर, समस्येने हतबल होणं अगदी स्वाभाविक आहे हेही मला कळून चुकलं आहे. यात वावगं काहीच नाही. या आजारातून मी पूर्णपणे बरी होईन असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. शारीरिकदृष्ट्या काही दिवस बरं वाटतं, मानसिकदृष्ट्या कधी उदास वाटतं.
 
कधीकधी हे सगळं हाताबाहेर चाललंय, आता सोसवत नाही असं वाटतं तेव्हाच ते वाटणं हलकेच निघून जातं. कदाचित बरं होण्याच्या दृष्टीने टाकलेले ते एक पाऊल असेल.
 
माझं तुम्हा सगळ्यांवर अतिशय प्रेम आहे.
 
हेही दिवस जातील...
 
मायोटिस काय आहे?
मायोटिस ही एक दुर्धर अवस्था आहे. स्नायू दुखावल्यामुळे प्रचंड थकवा येतो. हा आजार बळावू शकतो. प्रचंड थकव्यामुळे माणूस चालताना पडू शकतो, चालल्यानतंर दमल्यासारखं वाटू शकतं. उभं राहणं देखील त्रासदायक होऊ शकतं.
 
प्रतिकारशक्ती सक्षम नसेल तर हा आजार होतो असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. निरोगी पेशींवर हा विषाणू आक्रमण करतो.
 
लक्षणं काय आहेत?
पॉलीमायोटिस हा प्रामुख्याने खांदे, नितंब आणि मांड्याच्या स्नायूंना परिणाम करतो. महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. 30 ते 60 वयोगटाच्या महिलांना जास्त प्रमाणात होतो.
 
डेरामायोटिस मध्ये त्वचेवर पुरळ उठतं. महिला आणि लहान मुलांमध्ये याची लक्षणं आढळतात.
 
इनक्ल्यूजन बॉडी मायोटिस यामध्ये मांड्याचे स्नायू कमकुवत होतात, गुडघ्याखालचे स्नायूंनाही फटका बसतो. घशात गिळतानाही त्रास होऊ शकतो. 50वर्ष आणि आणखी वयाच्या पुरुषांमध्ये हा आढळतो.
 
लक्षणं काय असतात?
मान, खांदे, पाठ, नितंब आणि मांड्याच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवतो. स्नायू दुखतात, प्रचंड थकवा जाणवतो.
 
स्नायू कमकुवत झाल्याने पडायला होईल असं वाटतं. उभं राहतानाही त्रास होतो. खुर्चीवरून उठणंही अवघड आहे. काहीवेळेला त्वचेवर लाल, जांभळ्या रंगाचं पुरळ उठतं. पुरळाला खाज सुटते. त्वचेखाली गाठ निर्माण होऊ शकते. काही वेळेला उदास आणि अस्वस्थ वाटतं.
 
समंथाला मिळाल्या सदिच्छा
समंथा लवकर बरी हो, तुला खूप सारं बळ अशा शब्दात ज्युनियर एनटीआर यांनी सदिच्छा दिल्या आहेत. लवकरात लवकर बरी हो, परतल्यानंतर तू पूर्वीपेक्षा कणखर असशील याची खात्री वाटते असं काजल अगरवाल यांनी म्हटलं आहे.

Published By -Smita Joshi