सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (19:05 IST)

'धर्मवीर' सिनेमात राणे दिसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी चित्रपटाचा शेवट पाहिला नाही का?

uddhav thackeray
प्राजक्ता पोळ
13 मे रोजी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेला धर्मवीर सिनेमा 'रिलीज' झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. परंतु या सिनेमाचा शेवट न पाहता ते बाहेर निघून गेले.
 
या सिनेमाच्या शेवटी दाखवलेला आनंद दिघे यांच्या मृत्यूचा तो क्षण पाहता आला नाही म्हणून उध्दव ठाकरे निघून गेले का? या सिनेमात दिघे यांच्या मृत्यूचा शेवटचा क्षण दाखवताना त्यात राज ठाकरे आणि नारायण राणेंना हॉस्पिटलमध्ये गेलेलं दाखवण्यात आले आहे. ते उध्दव ठाकरेंना सहन झालं नाही म्हणून ते सिनेमाचा शेवट न पाहता निघून गेले का? अशी चर्चा आरोप प्रत्यारोपांमुळे सुरू झाली आहे.
 
नेमकं काय घडलं?
15 मे (रविवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'धर्मवीर' सिनेमाचा विशेष शो पाहण्यासाठी ठाण्याच्या सिनेमागृहात आले होते. त्यांनी तो सिनेमा पाहिला. पण सिनेमाचा शेवट आल्यावर तो संपायच्या 10-15 मिनिटे आधी ते सिनेमागृहातून बाहेर पडले. ते बाहेर जाऊन काहीवेळ थांबले. पण सिनेमाचा शेवट उद्धव ठाकरे यांनी पाहिला नाही. सिनेमाच्या शेवटी आनंद दिघेंच्या मृत्यूचा क्षण पाहता येणं शक्य नसल्याने मी बाहेर आलो, असं उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
dharmavir
सिनेमागृहातून बाहेर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "एक कलाकार म्हणून पाहताना हा सिनेमा अप्रतिम झालेला आहे असं मी म्हणेन. पण हा चित्रपट होता. याचा खरा भाग आम्ही प्रत्यक्षात पाहिलेला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नातंही या सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे.
 
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नात्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी म्हणेन की, हे नातं या सिनेमात दाखवले आहे त्यापेक्षाही अधिक घट्ट होतं. शेवटचा प्रसंग मी पाहू शकलो नाही. कारण तो आमच्या सगळ्यांवर झालेला तो आघात होता. व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिलेले आहेत. आपल्या शिवसैनिकांवर प्रेम करणारे बाळासाहेब ठाकरे होते."
 
राज ठाकरे आणि नारायण राणे दिसल्यामुळे मुख्यमंत्री निघून गेले?
उद्धव ठाकरे यांनी सिनेमानंतर दिलेल्या प्रतिक्रियांवर काही आरोप झाले. आमदार नितेश राणे यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं आहे, "खरंच उद्धव ठाकरेंना या सिनेमाचा आघाती शेवट पाहणं कठीण गेलं? असं वाटत नाही. ते निघून गेले कारण, तेव्हा शिवसेनेत राज ठाकरे आणि नारायण राणे किती महत्त्वाचे होते हे दाखवण्यात आलेलं उद्धव ठाकरेंना डोळ्यांनी पाहणं शक्य झालं नाही. त्यातून हे सिद्ध होत की, उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या जडणघडणीच्या काळात कुठेच नव्हते. सत्य नेहमी कटू असते."
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद म्हणतात, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो संपूर्ण काळ पाहिला आहे. ते भावनिक आहेत म्हणून त्यांना दिघे साहेबांच्या मृत्यूचा क्षण पाहता आला नसावा. पण हे समजण्यासाठी टीका करणार्‍याला भावना असाव्या लागतात. भावना काय असतात हे माहिती असावं लागतं".
dharmavir
काय आहे या सिनेमाचा शेवट?
या सिनेमात आनंद दिघे यांचं काम कसं होतं. ते व्यक्ती म्हणून कसे होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघे यांच्या मृत्यूवेळी झालेल्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत.
 
या सिनेमाच्या शेवटी 'आनंद दिघे यांचा अपघात होतो. त्यानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलेली पहिली व्यक्ती असते ती राज ठाकरे... हिंदुत्वासाठी तुम्हाला जगायला हवं असं राज ठाकरे आनंद दिघे यांना शेवटच्या क्षणी सांगताना दाखवले आहे.
 
त्यानंतर आनंद दिघे यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी त्यावेळी शिवसेनेचे नेते असलेले नारायण राणे हे भेटायला येतात. राणे हे आनंद दिघे यांच्या कानात काहीतरी बोलतात आणि हॉस्पिटलमधून निघून जातात. त्यानंतर आनंद दिघे यांचा मृत्यू होतो. मग हॉस्पिटलमध्ये राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे दोघंही येतात असं दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर सिंघानिया हॉस्पिटलला लागलेली आग, ठाण्यात झालेली जाळपोळ ही दाखवण्यात आली आहे.