शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (14:08 IST)

सिद्धार्थ शुक्लाविषयी या गोष्टी माहिती आहेत का?

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. त्याच्या मृत्यूचा कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.
 
"साधारण साडेदहाच्या आसपास सिद्धार्थला रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप लगेच सांगता येणार नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत अधिक माहिती देता येईल," असं कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी बीबीसीला सांगितलं आहे.
 
बिग बॉसच्या 13व्या सिझनचा विजेता ठरल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाला 50 लाख रुपयाचं पारितोषिक आणि एक कारही मिळाली होती.
 
बिग बॉस या वादग्रस्त शोच्या या 13 व्या सिझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, रश्मी देसाई, आरती सिंह आणि पारस छाब्रा हे सहा लोक अंतिम फेरीत होते.
 
सिद्धार्थ शुक्ला कोण होता?
सिद्धार्थ शुक्ल मॉडेल आणि अभिनेता होता. 12 डिसेंबर 1980 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या सिद्धार्थने 2008 मध्ये 'बाबूल का आँगन छुटे ना' या मालिकेतून पदार्पण केलं.
 
त्याचं शिक्षण सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झालं. त्याने रचना संसद महाविद्यालयातून इंटेरियर डिझाईन विषयात पदवी घेतली.
 
बिग बॉसमध्ये येण्याआधी त्याने 'झलक दिखला जा', 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी' अशा अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
 
2014 मध्ये त्याने 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 2017च्या 'लव्ह यू जिंदगी' या चित्रपटातही तो झळकला होता.
 
अभिनयाबरोबरच त्याने अनेक शोजचं निवेदनही केलं. 'इंडियाज गॉट टँलेट' या शोचं भारती सिंग बरोबर निवेदन केलं होतं. 'सावधान इंडिया' या शोचं निवेदन त्याने केलं.
 
आता तो बिग बॉसचा विजेता ठरला तरी बिग बॉसच्या 10व्या सिझनमध्यो तो पाहुणा कलाकार म्हणून आला होता.
 
सिद्धार्थ कसा जिंकला बिग बॉस-13?
बिग बॉसचा सिझन सुरू झाल्यावरच सिद्धार्थ अंतिम फेरीत जाईल असा विश्वास होता. त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या मागे असलेल्या चाहत्यांची संख्या अशा अनेक कारणांमुळे तो या शोमध्ये बराच पुढे जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
 
शहनाझ गिल बरोबर असलेल्या त्याच्या प्रेमाची चर्चा रोज ट्विटरवर #Sidnaaz या ट्रेंडने व्हायची. दररोज त्यांच्या नावाने हजारो ट्वीट्स येत असत. त्यांचं नातं अगदी परिपूर्ण होतं असं नाही तरी लोकांना या दोघांना एकत्र पहायला आवडायचं, हे मात्र नक्की.
 
विविध टास्क करणं हे बिग बॉसच्या घरातलं एक मोठं काम असतं. शोमधलं सर्वाधिक नाट्य याच काळात घडतं.
 
प्रत्येक सिझनमध्ये हा टास्क करणारे अनेक स्पर्धक असतातच, जे कामं करण्याऐवजी तो वेळ भांडण्यात घालवतात. मात्र सिद्धार्थ त्याला अपवाद ठरल्याचं या मालिकेला नियमितपणे पाहणारे सांगतात.
 
सलमान खानशी जवळीक असल्यामुळेसुद्धा तो विजेता ठरला अशीही एक चर्चा होती. अनेकदा सलमान त्याची बाजू घेतो, असा आरोप सलमान खानवर लावण्यात आला होता.
 
सतत प्रसिद्धीच्या झोतात असणं हाही सिद्धार्थचा गुण आहे. त्यामुळेही त्याच्या विजयाला हातभार लागला आहे. म्हणूनच कदाचित 2019 मध्ये गुगल वर सगळ्यात जास्त सिद्धार्थचा शोध नेटकऱ्यांनी घेतला होता.
 
असं असलं तरी सिद्धार्थ विविध कारणांनी या शोमध्ये वादात राहिला. भांडणं हा बिग बॉस शोचा गाभा असला तरी या सिझनमध्ये जितकी भांडणं आणि हाणामारी झाली तितकी आधी कधीच झाली नसावी.
 
सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यात सर्वांत जास्त भांडणं झाली. सुरुवातीच्या काळात ते दोघे चांगले मित्र होते. मात्र नंतर त्यांच्यात भांडणं सुरू झाली. आधी होणारी शाब्दिक चकमक नंतर हाणामारीत बदलली. दोघांनी एकमेकांना अनेकदा धक्काबुक्की केली होती.
 
शारीरिक हिंसाचार बिग बॉसच्या घरात वर्ज्य असतो. मात्र या भांडणामुळेच लोकांना शोमध्ये रस निर्माण झाला आणि शोचा TRP वाढला. त्यामुळे बिग बॉसने दोघांवर कारवाई केली नाही.
 
सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांनी याआधी एकत्र काम केलं होतं. मात्र त्यांच्यातही अनेकदा भांडणं झाली. ते एकमेकांना नको-नको ते बोलले होते. रश्मीचा बॉयफ्रेंड अरहानशी सिद्धार्थचं कडाक्याचं भांडणंही झालं होतं. रश्मी आणि सिद्धार्थने एकमेकांवर चहा कॉफीही फेकली होती.