कोणतंही शहर जेव्हा विस्तारतं तेव्हा वाहतुकीची कोंडी हा प्रश्न त्या शहरासमोर असतो. महाराष्ट्रातल्या मुंबई-पुणे-नागपूर या शहरांमध्ये ट्राफिक जॅम आणि पार्किंगचा प्रश्न नेहमी चर्चेत येतो. आता वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की या वाहनांचं करावं काय असं म्हणायची वेळ लोकांवर येते. पण जर तुम्हाला म्हटलं की यावर एक उपाय आहे तर तुम्ही काय म्हणाल?
यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण स्पेनच्या बार्सिलोना या शहरात असं घडलंय. ज्या ठिकाणी पार्किंग असायची त्या ठिकाणी आता मुलं खेळत आहेत. हे कसं घडलं त्याची ही गोष्ट. गजबजलेल्या बार्सिलोना शहराच्या मधोमध सध्या वेगळीच शांतता असते. ऐकू येतं ते फक्त मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांचं खिदळणं आणि पक्षांचा चिवचिवाट.
या भागात अजिबात ट्राफिक नसतं. आणि पूर्वी जिथे गाड्या पार्क केलेल्या असत तो भाग आता खेळण्यासाठी, झाडांसाठी आणि धावण्यासाठीच्या ट्रॅकसाठी वापरण्यात येतोय. ट्राफिकच्या गोंगाटात आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले रस्ते मोकळे करण्यासाठी सध्या बार्सिलोनामध्ये 'सुपरब्लॉक्स' ही योजना राबवण्यात येतेय.
वाढत्या प्रदूषणामुळे धोक्यात येऊ घातलेले शेकडो जीव याद्वारे वाचवता येतील असं या शहरातील प्रशासक सांगत आहेत. ही योजना इतर शहरांसाठी एकप्रकारची 'ब्लू प्रिंट' असेल.
आतापर्यंत बार्सिलोना शहरामध्ये फक्त सहा असे सुपरब्लॉक्स तयार करण्यात आले असले, तरी अशा शेकडो ब्लॉक्सची निर्मिती करण्याची योजना आहे.
यामध्ये सध्या अस्तित्त्वात असणारे नऊ ब्लॉक्स एकत्र जोडून तयार झालेल्या शहराच्या भागामध्ये अत्यावश्यक वाहन वगळता इतर सर्व वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. परवानगी असणारी वाहनंही या भागातून 10 किलोमीटर प्रती तासाच्या वेगमर्यादनेच चालू शकतात. या परिसरातल्या रहिवाशांच्या गाड्यांसाठी भूमिगत पार्किंग तयार करण्यात आलंय.
याला काही रहिवाशांचा विरोध आहे. या लोकांना आपल्या गाड्या घराबाहेर पार्क करायच्या आहेत. किंवा हे असे लोक आहेत ज्यांचे या भागात उद्योग असून ट्राफिक थांबवल्याने आपल्या उद्योगावर परिणाम झाल्याचं त्यांना वाटतंय.
सिएटलसारख्या इतर काही शहरांना मात्र ही संकल्पना आवडली असून ती अंमलात आणण्याचा विचार केला जातोय.
"शहरातली 60% सार्वजनिक जागा ही गाड्यांनी व्यापलेली असते. तुम्ही जर याचं फेरवाटप केलं आणि विभागणी बदलली तर मग अशाही लोकांना वा घटकांना जागा मिळू शकते, ज्यांना आजवर ती मिळू शकली नव्हती," बार्सिलोनाच्या शहरीकरणासाठीच्या उपमहापौर जॅनेट सँझ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
'शहराचं रूप बदलायचं आहे'
बार्सिलोनाला फक्त शहरातल्या ट्राफिकचच रूप बदलायचं नाही तर शहरातल्या लोकांविषयी जी माहिती गोळा करण्यात येते, ती देखील सुरक्षित ठेवायची आहे. शहरात विविध ठिकाणी असणारे सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि टेलिकॉम नेटवर्कद्वारे ही माहिती गोळा होत असते.
यासाठीच बार्सिलोना शहराने बोर्डॉक्स, एडिनबर्ग, फ्लोरेन्स आणि मँचेस्टर या शहरांच्यासोबत एक योजना सुरू केलीय. यामध्ये नागरिकांविषयीची डिजिटल जगामध्ये गोळा करण्यात येणारी खासगी आणि इतर माहिती सार्वजनिक आणि व्यक्तिगत मालमत्ता यामध्ये विभाजित करण्यात येते. या माहितीचा वापर फक्त लोकांच्या हितासाठीच केला जाऊ शकतो.
स्मार्टसिटी आणि 'स्मार्ट' लोक
"टेक्नॉलॉजीचा वापर हा लोकांच्या सेवेसाठी, त्यांचं शहरातलं आयुष्य सुधारण्यासाठी करण्यात यायला हवा, यावर आमचा विश्वास आहे," शहराचे डिजीटल इनोव्हेशन कमिशनर मायकल डॉनल्डसन सांगतात.
"एखादं शहर हे फक्त वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्मार्ट ठरत नाही. तर तिथे राहणारे नागरिक, त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान यावरून ठरतं."
"आम्ही कोणती माहिती गोळा करतो, कशी करतो आणि त्याचं काय करणार हे सांगणं गरजेचं आहे." ते म्हणतात.
पुढच्या वर्षी बार्सिलोना शहराचं काऊन्सिल दोन पायलट प्रोजेक्टस सुरू करेल. यातला एक प्रकल्प रस्त्याचे पृष्ठभाग वापरून अपारंपरिक (शाश्वत) ऊर्जेची निर्मिती करण्याबद्दल असेल. तर शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी टेक्नॉलॉजीचा वापर कसा करून घेता येईल याविषयी दुसरा प्रकल्प असेल.
शहरामध्ये सर्व नागरिकांचा विचार केला जावा यासाठी गोळा करण्यात येणाऱ्या सगळ्या डेटाचं विश्लेषण होणं गरजेचं आहे. यामुळेच यापूर्वी महिला, एखाद्या वर्णाचे लोक, अपंगत्व असणाऱ्या व्यक्ती अशा ज्या गटांकडे दुर्लक्ष झालं होतं त्यांच्याकडे लक्ष देणं शक्य होणार असल्याचं मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूटच्या सहाय्यक प्राध्यापक कॅथरिन डी'इग्नाझियो म्हणतात.
"स्मार्ट सिटीचा विचार करताना लिंग, वर्ण वा वापराची सुलभता याविषयीचा विचार सर्वंकषपणे करण्यात आला नाही. आपण अशाप्रकारचे शहरांची आखणी करतो जिथे उच्चभ्रू श्वेतवर्णीय पुरुषांना आरामात वावरता येतं, पण इतरांचा तिथे विचार केला जात नाही."
'महिलांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष'
बार्सिलोनामध्ये पंट 6 (Punt 6) नावाचा स्त्रीवादी शहर नियोजकांचा एक गट यासाठी काम करतोय. शहरातल्या ज्या भागांमध्ये महिला, लहान मुलं वा ज्येष्ठांना वावरण्यात अडचण येते तिथे काय करता येईल, यावर हा गट काम करतोय. उदाहरणार्थ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.
"अनेकदा आपल्याला भेदभाव करायचा नसतो म्हणून आपण स्त्री आहे की तो पुरुष याकडे दुर्लक्ष करतो. पण हे चूक आहे. आम्ही अडचणी सोडवताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही. आम्हाला सर्वांचा समावेश करणारी शहरं निर्माण करायची आहेत. अनेकदा कंपन्या शहरांकडे येऊन आपण काय काय करू शकतो, याविषयी सांगतात आणि कमी स्रोत असणारं सरकार त्यांना त्या गोष्टी करायला सांगतं. पण या टेक कंपन्या आणि शहराचं प्रशासन या दोन्हींमध्ये उच्चभ्रू, बहुतेकदा श्वेतवर्णीय पुरुष असतात. आणि इतर घटकांचा समावेश करून घेण्याकडे अनेकदा त्यांचा कल नसतो." डी'इग्नाझियो सांगतात.