रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

फेसबुक श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादाच्या प्रचारी पोस्ट ब्लॉक करणार

श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि फुटीरतावादावर बंदी घालणार असल्याचं फेसबुकने स्पष्ट केलं आहे. श्वेतवर्णीय राष्ट्रवाद आणि श्वेतवर्णीय स्वामित्वाची भावना (White Supremacy) या दोन गोष्टी आता वेगळ्या काढता येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
श्वेतवर्णीय राष्ट्रवादाचं कौतुक करणाऱ्या, त्याला पाठिंबा देणाऱ्या तसंच त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी आम्ही पुढच्या आठवड्यापासून फेसबुक तसंच इंस्टाग्रामवरून ब्लॉक करणार आहोत असंही फेसबुकने जाहीर केलं.
 
कट्टरतावादी संघटनांचा मजकुर ओळखण्याची क्षमता सुधारण्याची ग्वाहीही या सोशल मीडिया कंपनीने दिली. अशा प्रकारच्या गोष्टी सर्च करणाऱ्या लोकांना आपोआप अतिउजव्या विचासरणीच्या विरोधात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडे वळवलं जाईल.
 
एका व्यक्तीने न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवरचा हल्ला लाईव्ह-स्ट्रीम केल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीवर दबाब वाढला होता. सुरुवातीला फेसबुकने श्वेतवर्णीय राष्ट्रवादाशी संबंधित मजकूर पोस्ट करायला परवानगी दिली होती. युझर्सला श्वेतवर्णीय राष्ट्र बनवण्यासाठी इतर लोकांना आवाहन करण्याचीही परवानगी होती.
 
याबद्दल स्पष्टीकरण देताना फेसबुकने सांगितलं की त्यांच्या दृष्टीने श्वेतवर्णीय राष्ट्रवाद स्वीकारार्ह होता कारण अमेरिकन प्राईड किंवा बास्क फुटीरतावाद यासारख्या गोष्टींसारखा तो लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा होता.
 
पण बुधवारी लिहिलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये फेसबुकने स्पष्ट केलं की तीन महिने तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की श्वेतवर्णीय राष्ट्रवादाला श्वेतवर्णीय स्वामित्व भावना तसंच व्देष पसरवणाऱ्या संघटना यापासून वेगळं काढता येणार नाही.
 
फक्त पोस्टमन नाही
 
या महिन्यात न्यूझीलंडमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर अनेक जागतिक नेत्यांनी सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या साईटवर पोस्ट होणाऱ्या मजकुराची जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हटलं.
 
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी 'सोशल नेटवर्क ही जनतेची व्यासपीठं आहेत, फक्त पोस्टमन नाहीत,' असं विधान केलं. त्यांचा रोख सोशल मीडिया साईटसनी अधिक जबाबदारीने वागण्याकडे होता.
 
न्यूझीलंडमध्ये झालेल्या या हल्ल्याचा व्हीडिओ साईटवरून काढून टाकण्याआधी 4000 वेळा पाहिला गेला होता हे फेसबुकने मान्य केलं. या हल्ल्यात 50 जणांचा बळी गेला होता.
 
त्यानंतरच्या 24 तासात या व्हीडिओच्या 12 लाख कॉपी अपलोड होण्यापासून थांबवण्यात आल्या तर 3 लाख कॉपी अपडलोड झाल्यानंतर डिलिट करण्यात आल्या.
 
फ्रेंच मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एका संस्थेने फेसबुक आणि युट्यूबवर हल्ल्याचा व्हीडिओ पोस्ट करु दिल्याबद्दल खटला भरला आहे.