सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (19:41 IST)

शेतकरी आंदोलन : मेधा पाटकर, योगेद्र यादव यांच्यासह 37 जणांवर हिंसा भडकवल्याचा FIR

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 37 नेत्यांवर एफआयआर दाखल केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. मेधा पाटकर, बुटा सिंग, योगेंद्र यादव यांच्यासह इतर नेत्यांची त्यात नावं आहेत.
 
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल, जोगिंदर सिंह उग्रा यांची नावं आहेत. एफआयआरमध्ये भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांचंही नाव आहे.
 
या एफआयआरमध्ये कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 353 (सरकारी कामात बाधा आणणं) अशा गंभीर कलमांचा समावेश आहे.
 
किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत दिल्ली पोलिसांवर आरोप केले आहेत. त्यांनी हिंसेला दिल्ली पोलिसांना जबाबदार ठरवलं आहे.
 
राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेनं या आंदोलनातून माघार घेतली आहे. त्याचे प्रमुख नेते व्ही. एम. सिह यांनी आंदोलन वेगळ्या दिशेला जात असल्याचं म्हणत स्वतःला आंदोलनातून काढता पाय घेतला आहे. तर तिकडे पोलिसांनी 200 आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आहे.
 
काँग्रेसने शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे.
 
शेतकरी आंदोलनाच्याआडून झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांना एक क्षणही आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा राजिनामा घेतला पाहिजे, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
 
ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार करणाऱ्या 200 लोकांना पकडलं
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी जवळपास 200 कथित आंदोलनकर्त्यांना अटक केली. मंगळवारी दिल्ली शहरात शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता.
 
हजारो शेतकरी आणि पोलीस यांच्या दरम्यान दिल्लीच्या विविध सीमा भागात संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आंदोलक दिल्ली शहरात शिरले.
 
पोलीस आणि आंदोनकर्ते यांच्यात दिल्लीतील आयटीओ, अक्षरधाम आणि लाल किल्लासहित अन्य ठिकाणी संघर्ष झाला.
 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनांमध्ये 300 पोलीस जखमी झाले. एका आंदोलनकर्त्याचा यामध्ये मृत्यूही झाला.
 
ज्या लोकांना अटक केली आहे, त्यांच्यावर दंगल घडवून आणणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत, ओळख पटवून पोलीस अटक करत आहेत. लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलोईसह अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज पाहून लोकांची ओळख पटवली जात आहे.
 
केंद्र सरकारने दिल्लीत पॅरामिलिटरी जवानांच्या 15 तुकड्या तैनात केल्या आहेत. जेणेकरून कडेकोट सुरक्षा असेल.
 
रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराकरता शेतकरी नेत्यांनी समाजकंटकाना दोषी ठरवलं आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे वी.एम सिंह यांनी शेतकरी आंदोलनापासून वेगळं झाल्याचं म्हटलं आहे.
 
एएनआय वृत्तसंस्थेने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल, जोगिंदर सिंह उग्रा यांची नावं आहेत. एफआयआरमध्ये भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांचंही नाव आहे.
 
या एफआयआरमध्ये कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 353 (सरकारी कामात बाधा आणणं) अशा गंभीर कलमांचा समावेश आहे.
 
किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत दिल्ली पोलिसांवर आरोप केले आहेत. त्यांनी हिंसेला दिल्ली पोलिसांना जबाबदार ठरवलं आहे.
 
"पोलिसांनी आम्हाला ठरवून दिलेला मार्ग बंद केला होता. पोलिसांनीच शेतकऱ्यांना संभ्रमित केलं तसंच त्यांनीच काही असामाजिक तत्वांना जाणूनबुजून दिल्लीत प्रवेश दिला. त्यांच्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स उघडले," असा आरोप राकेश टिकैत यांनी बीबीसीशी बोलताना दिल्ली पोलिसांवर केला आहे.
 
'सरकारकडून षड्यंत्र'
शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप भारतीय किसान युनियनच्या महिला विभागाच्या अध्यक्ष हरिंदर बिंदू यांनी केला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
 
"शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठीच सरकारनं षड्यंत्र रचलं नाही तर कडक सुरक्षा असलेल्या लाल किल्ल्यावर आंदोलक घुसणं शक्य नाही," असं हरिंदर बिंदू यांनी म्हटलं आहे.
 
राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारात 83 पोलीस जखमी झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
 
आंदोलनकर्त्यांनी या पोलिसांवर हल्ला केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलीस जखमी होण्याच्या बरोबरीने सार्वजनिक मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
 
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान समाजकंटकांनी आंदोलना घुसखोरी केल्याचं संयुक्त किसान मोर्चाचं म्हणणं आहे.
 
ट्रॅक्टर आंदोलन थांबलं असलं तरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरूच राहील असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.
 
मंगळवारी नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढला. एका बाजूला हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध भागात हातात तिरंगा आणि आपल्या संघटनेचा झेंडा घेऊन ट्रॅक्टर रॅली काढताना दिसून आले. तर, अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकरी आंदोलकांमध्ये हिंसक झटापटही झाली.
 
यादरम्यान, एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्यात प्रवेश करून शीखांचा निशान साहिब हा धार्मिक झेंडाही फडकवला.
 
या सर्व घटनांमुळे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचं आता काय होईल, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
मंगळवारी झालेल्या हिंसेचं कारण दाखवत सरकार हे आंदोलन दडपून टाकेल की पुन्हा शेतकरी आंदोलन आणखी आक्रमक बनेल, हे प्रश्न सर्वांसमोर उभे राहिले आहेत.
 
या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी सर्वप्रथम मंगळवारी प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ.
 
शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली मंगळवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली. पोलिसांसोबत झालेल्या चर्चेनंतर या रॅलीसाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता.
 
दुपारी 12 वाजता अनेक ठिकाणी बॅरिकेड तोडणं, ठरवलेल्या मार्गाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आणि पोलिसांचा लाठीमार तसंच अश्रुधूराचा मारा केल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
 
काही वेळानंतर ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शीखां धर्मियांचा निशान साहिब हा धार्मिक झेंडा फडकवण्यात आल्याचे व्हीडिओ आणि फोटो सर्वच माध्यमांमध्ये झळकू लागले.
 
काही माध्यमांनी तिरंगा झेंड्याचा अपमान करत खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आल्याच्याही बातम्या दिल्याचं पाहायला मिळालं.
 
पण, लाल किल्ल्यावर फडकवण्यात आलेला झेंडा हा शीखांचा निशान साहिब हा धार्मिक झेंडाच असल्याचं अखेर स्पष्ट झालं.
 
मंगळवारी आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठ्या प्रमाणात झटापट झाली. या घटनेत 83 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकरी या सर्व घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
 
याप्रकरणी पोलिसांनी 4 गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी हिंसेसाठी शेतकरी आंदोलकांना जबाबदार धरताना म्हटलं,
 
"ट्रॅक्टर रॅलीसाठीची वेळ आणि मार्ग अनेक बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ठरवून देण्यात आला होता. पण शेतकरी निश्चित मार्गाऐवजी इतर ठिकाणी तेही ठरलेल्या वेळेच्या आधीच ट्रॅक्टर घेऊन आले. यानंतर झालेल्या गोंधळात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत."
 
जबाबदारी कुणाची?
शेतकऱ्यांनी या सर्वांसाठी आपले काही 'चुकलेले' सहकारी आणि दिल्ली पोलीस तसंच केंद्र सरकार यांना जबाबदार धरलं आहे.
 
पोलिसांनी अनेक ट्रॅक्टरचं नुकसान केलं असून त्यांनी याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी केली आहे.
 
संयुक्त किसान मोर्चा या शेतकऱ्यांच्या संघटनेने यावर तातडीने प्रसिद्धीपत्रक काढत ट्रॅक्टर रॅली तत्काळ समाप्त करण्याची घोषणा केली.
 
याप्रकरणी राजकीय पक्षांची प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रॅलीदरम्यान झालेल्या हिंसेचा निषेध केला आहे.
 
त्यांनी ट्वीट करून म्हटलं, "दिल्लीतील दृश्याने धक्का बसला. काही गटांकडून करण्यात आलेली हिंसा स्वीकारार्ह नाही. शांततेच्या मार्गाने विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या प्रतिमेला यामुळे तडा जाईल. शेतकरी नेत्यांनीही स्वतःला यापासून वेगळं केलं आहे. ट्रॅक्टर रॅली थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मी सगळ्या शेतकऱ्यांना दिल्ली रिकामी करण्याचं आणि सीमेवर परतण्याचं आवाहन करतो."
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
 
हिंसेतून कोणत्याही समस्येचा तोडगा निघत नाही. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतले पाहिजेत," असं त्यांनी म्हटलं आहे.
 
शेतकरी आंदोलन हाताळण्याची सरकारची पद्धत चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
 
त्याचप्रमाणे आम आदमी पक्षानेही केंद्र सरकारलाच या हिंसेसाठी जबाबदार धरलं आहे. द्रमुक आणि ममता बॅनर्जी यांनीही हिंसेचं खापर केंद्र सरकारच्याच डोक्यावर फोडलं आहे.
 
याबाबत माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले. आंदोलक-पोलीस चर्चेनंतर ठरवण्यात आलेल्या मार्गांवरसुद्धा पोलिसांनी बॅरिकेडींग केल्याचा आरोप टिकैत यांनी केला.
 
नियोजित मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडींग केल्यामुळे आंदोलक शेतकरी इतर मार्गांनी गेले. यामध्ये काही लोक आंदोलनाचा भाग नव्हते. त्यांनी पुढे जायचं ठरवलेलंच होतं. एका दिवसासाठी येऊन वातावरण बिघडवणाऱ्या लोकांची आम्ही ओळख पटवू. लाल किल्ल्यावर जे झालं, ते चुकीचंच आहे. आमच्या आंदोलनात कोणताच धार्मिक कार्यक्रम ठरवण्यात आलेला नव्हता. आम्ही याचा निषेध करतो."
 
हा प्रकार म्हणजे दिल्ली पोलीस आणि गुप्तहेर संस्थांचं अपयश असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. पण भाजप यासाठी दिल्ली पोलिसांचं कौतुक करत आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण यांनी बीबीसीसोबत याबाबत चर्चा केली.
 
"मी दिल्ली पोलिसांचं अभिनंदन करतो. जमावाने उचकवल्यानंतरही त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली. पोलिसांच्या समस्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. पोलिसांनी आधी बळाचा वापर केला असता तर व्हीक्टिम कार्ड खेळणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त सहानुभूती मिळाली असती."
 
शेतकरी आंदोलनाशी संबंधित स्वराज पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं. लाल किल्ल्यावर असे कृत्य करणारे लोक कधीच आंदोलनाचा भाग नव्हते, असा दावा त्यांनी केला.
 
शेतकऱ्यांची आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर जाण्याची योजना कधीच नव्हती, असं शेतकरी नेते मंजीत सिंह यांनी बीबीसी प्रतिनिधी अरविंद छाबडा यांनीही सांगितलं.
 
त्यांच्या मते, काही लोकांना भडकवण्यात आलं होतं. संयुक्त किसान मोर्चानेही अशीच प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रसिद्धी पत्रकानुसार काही असामाजिक तत्व शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाले होते. शांतता हेच त्यांचं सर्वांत मोठं शस्त्र असून याच्या उल्लंघनामुळे आंदोलनाला फटका बसेल."