मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (22:26 IST)

शेतकरी आंदोलन: पूर्व दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर तणाव वाढला, राकेश टिकैतांचा मागे हटायला नकार

आज गुरुवारी संध्याकाळी गाझीपूर सीमेवर वेगवान हालचाली दिसून येत आहेत. तेथे पोलिसांची संख्याही वाढल्याचे दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने या परिसरात कलम 144 लागू केले आहे. या कलमांतर्गत लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
 
इथल्या आंदोलनस्थळी दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत तसेच तेथे राखीव पोलीस दलही उपस्थित आहे. गाझियाबादवरुन दिल्लीला येणारा रस्ता बंद करण्य़ात आला आहे. अशा स्थितीतही राकेश टिकैत यांचं धरणं आंदोलन सुरू आहे.
 
टिकैत यांनी पुन्हा एकदा आंदोलकांसमोर भाषण केले. कोणालाही अटक होणार नाही, इथं गोळी चालवली गेली तर पोलीस प्रशासन जबाबदार असेल असं ते भाषणात म्हणाले आहेत. आज संध्याकाळी ते स्वतःला अटक करवून घेतील अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती.
 
तर शेतकरी नेते गुरनाम सिंग चढुनी यांनी जबरदस्तीने आंदोलन थांबवलं जाणार नाही. आम्ही पुढचा मार्ग मीटिंगद्वारे ठरवू असं मत मांडलं आहे.
 
राजद्रोहाचा गुन्हा दाखल
ट्रॅक्टर परेडच्यावेळेस दिल्लीत झालेल्या हिंसेप्रकरणी यूएपीए आणि राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेत देशातील आणि देशाबाहेरील संघटना आणि लोकांच्या भूमिकेचाही तपास केला जाईल असं त्यात म्हटलं आहे.
 
तत्पुर्वी दिल्ली पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना नोटीस बजावली होती. ठरवलेल्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गावरुन ट्रॅक्टर रॅली काढल्याबद्दल आणि दिल्ली पोलिसांशी केलेल्या समझोत्याला तोडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये असे प्रश्न या नोटिशीत विचारण्यात आला आहे.
 
याला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यांच्या संघटनेतील ज्यांनी 26 जानेवारी रोजी दिल्लीत हिंसा केली अशांची नावेही दिल्ली पोलिसांनी मागितली आहेत. यावर टिकैत यांनी अद्याप आपण नोटीस वाचलेली नाही असं सांगितलं.
 
एएनआयशी बोलताना ते म्हणाले, एक माणूस येतो आणि तो लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतो, पोलीस गोळीबार करत नाहीत. हे कोणाच्या आदेशावर झालंय? पोलिसांनी त्याला जाऊही दिलं. त्याला अटक झाली नाही. त्यावर काहीही कारवाई झाली नाही. कोण आहे तो? त्यानं सर्व समाजाला आणि शेतकरी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती. काही ठिकाणी या झटापटीचं हिंसक स्वरूप पाहायला मिळालं.
 
आज सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलकांनी हा परिसर रिकामा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तिरंगेका अपमान नही सहेगा हिंदुस्तान, सिंघू बॉर्डर खाली करो अशा घोषणाही त्यांनी दिल्या आहेत.