मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (19:01 IST)

मुनव्वर फारुकीला तुरुंगात का जावं लागलं?

साभार ट्विटर 
जान्हवी मुळे
बीबीसी प्रतिनिधी
"मी डोंगरीला राहतो, असं सांगितलं, तर अर्ध्या लोकांना डोंगरी माहिती नसतं. आणि बाकीचे अर्धे विचारतात, 'अच्छा.. ते दाऊद वालं डोंगरी?' अरे, हा काय गैरसमज आहे.. डोंगरी दाऊदसाठीच फेमस नाहीये बाबा.. हाजी मस्तान.. टायगर मेमन.. बघा ना केवढे गँगस्टर्स दिलेत आम्ही.."
 
मुनव्वर फारुकी उपहासानं मुंबईतल्या डोंगरीचं वर्णन करतो, तेव्हा त्या जोक्सवर प्रेक्षकातले सगळे हसताना दिसतात. त्याचा हा व्हीडियो यूट्यूबवर सत्तेचाळीस लाख जणांनी पाहिला आहे.
 
पण त्याच मुनव्वरच्या काही जोक्सला लोकांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे मुनव्वरला तुरुंगातही जावं लागलं. हिंदू देवदेवतांसंदर्भात कथित आक्षेपार्ह विनोद केल्याच्या आरोपाखाली इंदूर पोलिसांनी 2 जानेवारीला मुनावरला अटक केली होती. त्याचा जामीन अजूनही होऊ शकलेला नाही.

मुनव्वरनं गुजरात दंगल, गोध्रा हत्याकांडावरून गृहमंत्री अमित शहांवर केलेले जोक्सही काहींना पसंत पडले नाहीत. तर दुसरीकडे हा प्रकार म्हणजे कलेच्या स्वातंत्र्यावरचा घाला असल्याची भावना कॉमेडियन्सनी व्यक्त केली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि मुनव्वर फारुकी कोण आहे?
 
जुनागड आणि डोंगरी मधला कलाकार

28 वर्षांचा मुनव्वर फारुकी मूळचा गुजरातच्या जुनागडचा आहे, पण तिथून तो वडिलांसोबत मुंबईत डोंगरी परिसरात राहायला आला.
 
आधी छोटी-मोठी कामं केल्यावर मुनव्वरनं काही काळ ग्राफिक्स डिझायनिंगही केलं, पण 2019 मध्ये तो स्टँड अप कॉमेडीकडे वळला.
 
या क्षेत्रात तसा नवखाच असूनही मुनव्वरला गेल्या वर्षभरात लोकप्रियता मिळू लागली. यूट्यूबवर आता त्याचे पाच लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत आणि लाखो लोक त्याचे व्हीडियो पाहतात.
 
डोंगरीवरचे त्याचे जोक्स तर सोशल मीडियावर गाजले. पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकावरवर टिप्पणी करणारे त्याचे व्हीडिओजही व्हायरल झाले आहेत. कुणाला ते पसंत पडले, तर कुणी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करतं.
 
मुनव्वरनं केलेल्या काही जोक्सना आक्षेप घेत गेल्यावर्षी 19 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश पोलिसांतही त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. मध्य प्रदेश पोलिसांनी मुनव्वरला अटक केल्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनीही त्याची कस्टडी मागितली आहे.
 
मुनव्वरला अटक कशासाठी झाली?
 
1 जानेवारी रोजी मुनव्वर इंदूरच्या छप्पन दुकान परिसरातील मन्रो कॅफेमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी गेला होता.
 
तेव्हा भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी गौर यांचे पुत्र एकलव्य गौर तिथे आले. त्यांनी स्टेजवर चढून मुनव्वरला जाब विचारला.
 
एकलव्य गौर स्वतःला हिंदूरक्षक संघटनेचे नेते म्हणवतात. त्यांचा दावा आहे की मुनव्वर यांनी या शोमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान केला.
 
इंदूरमधल्या स्थानिक माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत गौर म्हणतात, "तो एक 'सीरियल ऑफेंडर' आहे आणि हिंदू देवी-देवतांवर जोक्स करतो. मला मुनव्वरच्या शो-विषयी कळलं तेव्हा मी तिकीट काढलं आणि पाहायला गेलो. अपेक्षेप्रमाणेच तो हिंदू देवतांचा अपमान करत होता आणि गृहमंत्री अमित शहांचं नाव गोध्रा दंगलीशी जोडत खिल्ली उडवत होता."
 
पण त्यादिशी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या अनेकांचा दावा आहे, की गौर स्टेजवर गेले तेव्हा मुनव्वरने आपला शो सुरूही केला नव्हता. तो नुकताच स्टेजवर चढला होता.
 
या घटनेचे काही व्हीडिओज व्हायरल झाले आहेत, ज्यात फारुकी गौर आणि त्यांच्या साथीदारांना समजावताना दिसतो आहे. तो गौर यांना आपला हिंदू धर्माचा अपमान करण्याचा उद्देश नसल्याचं तसंच आपल्या जुन्या व्हीडिओंमध्ये इस्लामवरही जोक्स केले असल्याचं तो सांगताना दिसतो. तर काही प्रेक्षकही वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं.
 
मुनव्वरनं त्यानंतर शो सुरू केला, काही मिनिटांतच गौर यांचे साथीदार परतले आणि त्यांनी मुनव्वरला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
 
मुनव्वरचे वकील अंशुमन श्रीवास्तव सांगतात, "त्यानं न केलेल्या जोक्ससाठी त्याला अटक झाली आहे. मुनव्वरचा शो सुरु होण्याआधीच त्यांनी अडथळा आणला. एखादा कथित गुन्हा होईल असं अनुमान किंवा अपेक्षा म्हणजे गुन्हा नाही. पोलिसांनी सगळ्या गोष्टी न तपासता त्याच्यावर केस दाखल केली आणि त्याला अटक केलं."
 
पोलिसांचं म्हणणं काय आहे?

मुनव्वरला पोलीस तुकोगंज पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्याशिवाय 3 जानेवारीपर्यंत इंदूर पोलिसांनी शोच्या आयोजनातील आणखी पाच जणांना अटक केली. त्यात एडविन अँथनी आणि सदाकत खान यांच्यासह नलिन यादव आणि प्रखर व्यास हे दोन कॉमेडियन्स, प्रथमचा भाऊ प्रियम व्यास यांचा समावेश आहे.
 
फारुकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 295 A आणि 298 धार्मिक भावना दुखावल्याचा आणि जाणूनबुजून दुखावणारे शब्द उच्चारल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच कलम 269 अंतर्गत त्याच्यावर बेपर्वा वागणुकीनं संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराची शक्यता वाढवल्याचा आरोपही आहे.
 
स्थानिक माध्यमांशी बोलताना तुकोगंज पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे, की फारुकीनं या शोमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा कुठलाही व्हीडिओ तेव्हा देण्यात आला नव्हता. तर गौर यांचा दावा आहे, की त्यांनी मुनव्वरला जोकची रिहर्सल करताना ऐकलं होतं.
 
मध्य प्रदेशच्या हाय कोर्टात काय झालं?

25 जानेवारीला मुनव्वरच्या जामिन अर्जावर सुनावणी करताना मध्य प्रदेश उच्च न्यायालयात रोहित आर्या यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने टिप्पणी केली. अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य तुम्ही का करता? तुमच्या मनोवृत्तीला काय झालं आहे? तुमचं काम चालावं म्हणून म्हणून तुम्ही असं वागता का? असा सवाल न्यायालयाने केला.
 
मुनव्वर यांना जामिनाचा अर्ज मागे घ्यायचा आहे का? असंही न्यायाधीशांनी विचारलं. मात्र मुनव्वरने कोणताही गुन्हा केलेला नाही असं त्याच्या वकिलांनी सांगितलं.
 
मुनव्वर यांनी तीन वेगवेगळ्या प्रसंगी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुनव्वर यांच्यामुळे अन्य कॉमेडियन्सनी अशाच स्वरुपाचे विनोद सांगितले असं सांगत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असं तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितलं.
 
यावर भाष्य करताना रोहित आर्या म्हणाले की अशा मनोवृत्तीच्या लोकांना मोकळं सोडता कामा नये.
 
कॉमेडियन्सच्या प्रतिक्रिया

मुनव्वरच्या अटकेविषयी बोलताना यूट्यूबर आणि कॉमेडियन सुशांत घाडगे सांगतो, "कलेच्या माध्यमातून आपण समाजातल्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि बोललंही पाहिजे. म्हणूनच त्याला स्टँड अप म्हणतात - ते फक्त उभं राहून बोलणं नाही, तर काही गोष्टींवर स्टँड घेणं - भूमिका घेणंही आहे. तो आवाज काढून घेण्याचा प्रयत्नही नेहमी केला जातो.
 
"जी कुणी मुलं स्टँड अप करतायत, ती सामान्य कुटुंबातली साधी मुलं आहेत. ती आता कलेच्या क्षेत्रात उतरली आहेत आणि त्यांचा आवाज मांडत आहेत. तो आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. जोक्सना इतकं महत्तव देण्याची गरज नाही की त्यासाठी एखाद्याला महिनाभर तुरुंगात राहावं लागेल."
 
कॉमेडियन वीर दास ट्विटरवर लिहितात, "तुम्ही जोक्स आणि हास्य थांबवू शकणार नाही. कॉमेडियन्स ते सादर करतायत म्हणून नाही, तर हसणं ही लोकांची गरज आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल, तेवढं हसं करून घ्याल, आत्ताही आणि पुढे इतिहासाकडूनही. ज्यानं ज्यानं विनोदावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याभोवती विनोदांची मालिका तयार झाली आहे."
 
कुणी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या ट्वीटची आठवण करून दिली, ज्यात भारताचे पंतप्रधान उपहास आणि विनोद आपल्या आयुष्यात आनंद आणत असल्याचं म्हटलं आहे.
 
अभिनेत्री कुब्रा सैत, कॉमेडियन वरूण ग्रोव्हर, आदिती मित्तल आणि समय रैना यांनीही सोशल मीडियावरून मुनावरच्या अटकेवर टीका केली होती.
 
कुणाल कामरा ते मुनव्वर फारुकी
 
अर्थात अशा कारवाईला किंवा टीकेला सामोरं जावं लागलेला मुनव्वर हा पहिलाच कॉमेडियन नाही.
 
गेल्या महिन्यातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एका निकालानंतर कुणाल कामरा आणि कार्टुनिस्ट रचिता तनेजा यांनी केलेल्या टिप्पणीसाठी त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननाप्रकरणी कारवाई सुरू केली होती.
 
गेल्या वर्षी जुलैमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं महाराष्ट्र सरकारच्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पावर टिप्पणी केली होती, त्यानंतर अग्रिमाला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आणि शिविगाळही झाली. अग्रिमानं त्यानंतर माफी मागितली आणि संबंधित व्हीडिओ डीलिट केल्याचं जाहीर केलं होतं.
 
वारंवार होणाऱ्या अशा घटनांविषयी कॉमेडियन्सना काय वाटतं? सुशांत घाडगे सांगतो, "कशावर जोक्स करायचे याचं स्वातंत्र्य लोकांना असायला हवं. कलाकारांनी काही गोष्टींचं भान ठेवायला हवं हे खरं, पण कलाकारांचा कधी दुखावण्याचा हेतू नसतो, हेही लक्षात घ्यायला हवं.
 
"आपण जोक्स फारच जास्त गांभीर्यानं घेतो, प्रत्यक्ष आयुष्यात गंभीर नसलेल्या लोकांवरही सोशल मीडियामुळे दडपण येतं की या जोकवर काहीतरी भूमिका घ्यायला हवी. प्रत्येकवेळी त्यातून काही उपदेश घेण्याचा किंवा त्यातून काहीतरी पोहोचतंय का असा विचार करतो का करतो? जोक जोक आहे, त्यावर हसायचं. लोकांनी हसणं बंद केलं तर कसं चालेल?"