मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
बेळगाव, कारवार आणि निपाणीसह वादग्रस्त सीमाभाग प्रकरण न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा परिसर केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री सवदी यांनी थेट मुंबईवरच दावा केला असून मुंबई कर्नाटकात समाविष्ट व्हावी, असं कर्नाटकच्या मराठी भाषिक लोकांना वाटत असल्याचं विधान लक्ष्मण सवदी यांनी केलं.
"शिवाय, या लोकांसोबतच मीसुद्धा मुंबई कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करतो. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं, अशी मी केंद्र सरकारला विनंती करतो," असंही लक्ष्मण सवदी म्हणाले.
डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या 'संघर्ष आणि संकल्प' या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन नुकतंच करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बेळगावसह सीमाभागतील वादग्रस्त परिसर केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. यावरून देशभरात प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.