सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (23:50 IST)

दीक्षा शिंदे खरंच नासाच्या पॅनलिस्ट बनल्या आहेत का? - फॅक्ट चेक

कीर्ती दुबे
गेल्या आठवड्यात 19 ऑगस्ट रोजी एएनआय या वृत्तसंस्थेनं एकापाठोपाठ काही ट्वीट केले. महाराष्ट्राच्या औरंगाबादेतील 14 वर्षीय दीक्षा शिंदे हिची अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या एमएसआय फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलसाठी पॅनलिस्ट म्हणून निवड झाल्याचा दावा त्यात करण्यात आला.
 
"माझ्या 'ब्लॅक होल अँड गॉड' या सिद्धांताला नासानं मंजुरी दिली असून तीन वेळा नकारल्यानंतर ही मंजुरी मिळाली आहे. नासाने मला बेवसाईटसाठी आर्टिकल लिहायला सांगितलं," असं दीक्षा शिंदेनं एएनआयच्या वृत्तात म्हटलं होतं.
 
10 वीची विद्यार्थिनी असलेल्या दीक्षाच्या या यशाची यशोगाथा पाहता पाहता माध्यमांनी सर्वांसमोर आणली. एएनआयनं केलेले ट्वीट्स आणि फोटो याच्याच आधारे माध्यमांनी या बातम्या दिल्या. मात्र एएनआयनं आता ते ट्विट डिलिट केलं असून बातमीही वेबसाईटवरूनही काढली आहे.
 
एएनआयनं त्यांच्या ट्वीटमध्ये दीक्षाचं म्हणणं, तिचे फोटो आणि नासाच्या एका तथाकथित सर्टिफिकेटचा फोटोही प्रसिद्ध केला होता.
 
त्या सर्टिफिकेटवर 'नासा प्रपोजल रिसर्च 2020, दीक्षा शिंदे यांना परिपूर्ण अशा रिसर्च प्रपोजलसाठी उत्तम प्रयत्न करण्यासाठी हा पुरस्कार दिला जात आहे,' असं लिहिलेलं होतं.
 
सर्टिफिकेटवर सीईओ आणि अध्यक्ष म्हणून जिम ब्रायडेंसटाईन यांचं नाव लिहिलं आहे आणि डिपार्टमेंट चेअर म्हणून जेम्स फ्रेडरिक यांचं नाव लिहिलं आहे.
या बातमी संदर्भात एएनआयवरही प्रश्न उपस्थित झाले. त्यानेळी वृत्तसंस्थेच्या एडिटर इन चीफ स्मिता प्रकाश यांनी एक ट्वीट केलं. "ही स्टोरी खोटी नाही, आम्ही अजूनही या वृत्ताशी ठाम आहोत," असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
 
मात्र, आता त्यांनी त्यांचं स्वतःचं ट्वीटही डिलिट केलं आहे.
 
नासानं बीबीसीला काय म्हटलं?
बीबीसीनं 20 ऑगस्टला या प्रकरणी नासाबरोबर एका ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला.
 
नासानं 26 ऑगस्टला आम्हाला त्याचं उत्तर पाठवलं. "मे 2021 मध्ये नासाने एका थर्ड पार्टी सर्व्हिसच्या माध्यमातून एक्सपर्ट पॅनलिस्टसाठी अर्ज मागवले होते. या पॅनलिस्टने नासाच्या फेलोशिपसाठी येणाऱ्या अर्जांचं समीक्षण करावं असं आम्हाला अपेक्षित होतं. दीक्षा शिंदे यांनी स्वतःबाबत चुकीची माहिती दिली होती. सध्या पॅनलिस्ट म्हणून अर्ज करणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दीक्षा शिंदे नासाशी संलग्न नाहीत, किंवा आम्ही त्यांना कोणतीही फेलोशिपही दिलेली नाही," असं नासानं त्यात म्हटलं आहे.
"ही फेलोशिप केवळ अमेरिकेच्या नागरिकांसाठी आहे. नासानं शिंदे यांच्याकडून कोणताही सायन्स पेपर स्वीकारलेला नाही किंवा प्रशस्तीपत्रकही दिलेलं नाही. नासा त्यांच्या अमेरिका भेटीचा खर्च करत असल्याचा दावादेखील पूर्णपणे चुकीचा आहे."
 
खोट्या प्रशस्तीपत्रावर नासाच्या माजी प्रशासकाचं नाव
एएनआयनं शिंदे यांचं जे प्रमाणपत्र पोस्ट केलं होतं, त्यावर सीईओ आणि अध्यक्ष म्हणून जिम ब्रायडेंसटाइन यांचं नाव आहे. आम्ही हे नाव गुगल करता नासाच्या वेबसाइटच्या एका पेजची लिंक मिळाली.
नासाच्या वेबसाईटनुसार जेम्स फ्रेडरिक 'जिम' ब्राइडेंसटाइन नासा या अंतराळ संस्थेचे 13 वे प्रशासक होते. त्यांची निवड ट्रंप यांच्या कार्यकाळात 23 एप्रिल 2018 ला झाली होती आणि 20 जानेवारी 2021 ला त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
 
पहिला मुद्दा - जेम्स नासाचे सीईओ किंवा अध्यक्ष नसून माजी प्रशासक आहेत. त्यांचा कार्यकाळही या वर्षाच्या सुरुवातीलाच संपुष्टात आला होता.
 
दुसरा मुद्दा - जेम्स फ्रेडरिक 'जिम' ब्राइडेंसटाइन एकाच व्यक्तीचं नाव आहे. शिंदे यांच्या खोट्या प्रशस्तीपत्रकावर याचा वापर दोन वेगवेगळ्या नावांसारखा करण्यात आला आहे.
 
नासाच्या फेलोशिपचे नियम
नासाच्या माइनॉरिटी इन्स्टीट्यूशन फेलोशिपसाठी काही नियम आहेत. केवळ अमेरिकेचे नागरिकच यासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी विज्ञान, गणित, तंत्रज्ञान अशा विषयांत पदवी मिळवली आहे आणि यावर्षी 1 सप्टेंबरपासून मास्टर्स किंवा संशोधन विषयक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तेच लोक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात.
 
त्यामुळे हे नियम पाहता दीक्षा शिंदे या फेलोशिपसाठीच पात्र ठरत नाही. मग अर्जांचं समीक्षण करणाऱ्या पॅनलचा भाग त्या कशा बनणार.
 
अशा प्रकारे एएनआय या वृत्तसंस्थेवर प्रकाशित झालेलं वृत्त चुकीचं ठरतं आणि अनेक माध्यम समुहांनी ते वृत्त तसंच्या तसं प्रकाशित केलं होतं.