गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (14:28 IST)

कोल्हापूर पाऊस : 'गिरीश महाजन पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी?'

कोल्हापूर आणि सांगलीत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. लाखो लोक बेघर झालेत. अशा गंभीर परिस्थितीतही मंत्री हसताना दिसत आहेत.
 
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एक सेल्फी व्हीडिओ सध्या व्हायरल झालाय.
 
व्हीडिओ शूट करणारी व्यक्ती पूरपरिस्थीती दाखवत असताना हसताना दिसत आहे. त्यावेळी कॅमेरा बोटीत बसलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे नेला असताना, त्यांनी हसत हसत कॅमेऱ्याकडे हात दाखवला.
 
गिरीश महाजनांच्या या कृतीमुळे ते सध्या विरोधकांच्या टीकेचे धनी बनले आहेत.
 
"मदत करू शकला नाहीत तरी ठीक, पण थट्टा करू नका"
लोकप्रतिनिधी असं असंवेदनशीलपणे वागत असतील तर जनतेनं मदत कार्याची अपेक्षा कोणाकडून ठेवायची? असा सवाल अ‍ॅड. कल्याणी माणगावे यांनी उपस्थित केला आहे.
 
अ‍ॅड. माणगावे या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. शिवाय, त्या स्वत: कोल्हापूरच्या रहिवाशी आहेत.
त्या पुढे म्हणतात, "मी स्वतः कोल्हापूरची असल्याने लोकांच्या वेदना पाहत आहे, संसार उद्ध्वस्त झालेत आणि मंत्री हसत आहेत, हे पाहणं अतिशय क्लेशदायक आहे. तुम्ही मदत नाही करू शकला तरी ठीक आहे, पण जनतेची अशी क्रूर थट्टा करू नये ही अपेक्षा."
 
विरोधकांकडून महाजनांच्या राजीनाम्याची मागणी
"महापूर पाहणीवेळी मंत्री गिरीश महाजन आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू, सेल्फीसाठी पोझ. पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी? सत्ताधाऱ्यांना काही संवेदना उरल्या आहेत की नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या असंवेदनशील मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,अधिकाऱ्यांचे निलंबन करा," अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीय.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पूरग्रस्तांप्रती मंत्री किती असंवेदनशील आहेत, याचं उदाहरण म्हणजे गिरीश महाजन आहेत. खरंतर महाजनच नाही, मुख्यमंत्रीही काल हवेत आले नि हवेतूनच गेले. सांगलीचे भाजप आमदार गाडगीळ एकटेच बोट घेऊन पूरपर्यटन करत आहेत. हे सर्व पूरग्रस्तांचे अपमान करत आहेत."
 
मुख्यमंत्रीही तसेच, महाजनही तसेच आणि चंद्रकांत पाटीलही तसेच, त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असंही शेट्टी म्हणाले.
 
या विषयावर आम्ही गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ते सध्या फोन उचलत नाहीयेत.
 
गिरीश महाजन आणि वाद
जळगाव येथील मूकबधिरांच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात गिरीश महाजन हे कंबरेला बंदूक लावून उपस्थित राहिले होते. या प्रकारानंतर विरोधकांनी विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करत, महाजनांवर टीका केली होती.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावाच्या परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याच्या शोधासाठी स्वत: गिरीश महाजन गेले होते. यावेळी महाजन स्वत: बंदूक घेऊन शिवाराज बिबट्याचा शोध घेत होते.
लोकसभा निवडणुकीवेळी अमळनेर येथील मेळाव्यात भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली होती. महाजन यांच्यासमोरच झालेल्या या वादावेळी महाजन एका व्यक्तीला ढकलतानाचे व्हीडिओ व्हायरल झाले होते.
केंद्र सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह गिरीश महाजन यांनी ठेका धरला. कलम 370 रद्द करणं हे भाजपच्या दृष्टीने विजयी घटना असली, तरी काश्मीरमधील गंभीर परिस्थिती पाहता महाजनांनी गांभिर्य पाळलं पाहिजे होतं, असं अनेकांचं म्हणणं होतं.
मद्य उत्पादनांना महिलांची नावं दिली तर त्यांची विक्री नक्कीच वाढेल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते. 2017 च्या नोव्हेंबर महिन्यात नंदुरबारमधील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वक्तव्यानंतर महाजनांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर महाजनांनी स्पष्टीकरण देत, महिलांचा अपमान करण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं होतं.