शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (16:18 IST)

हैदराबाद बलात्कार प्रकरण : जिथं बलात्कार केला तिथंच झालं चौघांचं एन्काउंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी कोर्टानं या चारही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलीस गुरुवारी रात्री ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता त्या ठिकाणी घेऊन गेले होते.
 
"नेमकी काय आणि कशी घटना घडली याची माहिती घेत असताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला, त्यानंतर झालेल्या एन्काउंटरमध्ये चारही जण मारले गेले," असं एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
 
हैदराबादपासून 50 किमी अंतरावर असलेल्या चटनपल्ली गावात ही घटना घडली आहे. 28 नोव्हेंबर रोजी पशूवैद्यक म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणीला हैदराबादमध्ये कथितरित्या बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं होतं.
 
आरोपीच्या हातामध्ये पिस्तुल
घटनास्थळी आरोपींच्या मृतदेहाच्या हातात पिस्तुल सापडले आहे. घटनास्थळाची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
 
आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला- व्ही. सी. सज्जनार
सकाळी आरोपींना जेव्हा घटनास्थळी आणलं तेव्हा त्यांनी पोलिसांवर काठीने मारहाण सुरु केली आणि आमची हत्यारं हिसकावून घेऊन आमच्यावरच गोळीबार केला असं सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी सज्जनार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
पीडितेच्या पालकांची प्रतिक्रिया
माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, मी पोलिसांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया या प्रकरणात मृत पावलेल्या मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दिल्लीत 2012 मध्ये घडसलेले्या निर्भया बलात्कार प्रकरणातील मृत पीडितेच्या आईनं देखील समाधान व्यक्त केलं आहे.
 
"हैदराबादच्या पोलिसांनी योग्यच केलं आहे, मी त्याचे आभार मानते. मी गेल्या 7 वर्षांपासून कोर्टात चकरा मारत आहे. सर्वांनी हे पाहिलं पाहिजे की हैदराबाद पोलिसांनी कसं केलं आहे. निर्भयाच्या दोषींना लवकर फाशी मिळावी यासाठी मला अजून संघर्ष कराला लागत आहे. हैदराबादच्या मुलीला आज न्याय मिळाला आहे," अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
 
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेश पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून शिकावं असं म्हटलंय. उन्नाव बलात्कार प्रकरणाबाबत बोलाताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी मात्र अशा प्रकारच्या घटनांना लोकशाहीत जागा नसल्याचं म्हटलंय.
 
"न्यायालयीन प्रक्रियेशिवाय अशा प्रकारच्या एन्काउंटरला लोकशाहीत जाता नाही, कायद्याद्वारे दोषींना शिक्षा व्हायला पाहिजे होती," असं त्यांनी ट्वीट केलं आहे. वकील रेबेका मेमन जॉन यांनी या एन्काउंटरवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची योग्य पद्धतीनं न्यायालयीन सुनावणी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे.
 
बीबीसी तेलगूचे संपादक जी.एस. राममोहन यांचं मत
तेलगूभाषिक राज्यांमध्ये पोलिसांकडून होणाऱ्या एन्काउंटरची प्रकरणं नवी नाहीत. या राज्यांमधल्या नक्षलवादी चळवळीच्या काळापासून अशी एन्कांउंटर्स आणि त्यानंतर मानवाधिकाराचा मुद्दा पुढं येणं हा इतिहास आहे. अशाप्रकारच्या हिंसक घटना तेलगू लोकांनी आजवर अनेकदा पाहिल्या आहेत आणि त्याबाबत थोडीशी संवेदनशीलताही कमी झाली आहे. त्याचा परिणाम दिशा बलात्कार-हत्या प्रकरणात दिसून आला. बलात्कार आणि निघृणपणे केलेल्या या हत्येमुळे समाजात अत्यंत राग होता. इथल्या समाजानं न्यायव्यवस्थेवर आधीच अविश्वास दाखवला आहे. वेळेत न्याय न मिळण्यामुळं अशा घटनांमध्ये तात्काळ न्याय मिळावा असं त्यांना वाटतं.
 
त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींचं एन्काऊंटर व्हावं अशी लोकांची विनंती होती. हे एन्काउंटर करणाऱ्या व्ही. सी. सज्जनार यांनी वारंगळच्या पोलीस आयुक्तपदी असताना दोन महिलांवर अॅसिड हल्ला करणाऱ्या तीन आरोपींचं असंच एन्काउंटर केलं होतं. त्याबद्दल लोक सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदनही केलं.
 
या मानसिकतेचा विचार करता सर्व पक्षांना आणि लोकांमध्ये त्याला स्वीकारलं गेलं आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी असा न्यायालयाचा मार्ग डावलून न्याय देण्याविरोधात मत प्रदर्शित केलं आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या कल्पना कन्नाबिरान यांचं मत
 
"या चारही जणांचा थंड डोक्यानं खून करण्यात आला आहे. आपल्याला न्यायव्यवस्था बंद करून तमाशा पाहायचा आहे का? तेलंगाणात याकडे न्याय म्हणून पाहिलं जात आहे. तर यूपीत आदित्यनाथ यांच्या राज्यात नित्यानंद मोकाट आहे आणि उन्नव पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. अनेक कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
 
एन्काउंटरमध्ये कुठलाही न्याय नाही. एक जण हिरो होतो आणि पीडितेच्या दुःखाला बाजूला सारलं जातं. आपण याला पाठिंबा देणं उचित नाही. पोलिसांच्या राज्यात कुठलंही भविष्य नाही. तेलंगाणाची निर्मिती लोकशाही आंदोलनातून झाली होती- त्याचा आपल्याला विसर पडला आहे. आपण पुन्हा त्या मार्गावर कसं जाऊ शकतो?
 
सुप्रीम आणि हायकोर्टाचं यावर काय म्हणणं आहे?"
 
अमरावतीच्या खासदार नवनीतकौर राणा यांनी तेलंगण पोलिसांचं स्वागत केलं आहे. त्या म्हणाल्या, "असा कायदा असावा की, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून एका महिन्यात बलात्काऱ्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, नाहीतर वर्षानुवर्षं कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. माझ्यासाठी हा न्याय योग्य आहे. एक आई, मुलगी आणि पत्नीच्या नात्यानं मला हा न्याय योग्य वाटतो. मी तेलंगणा पोलिसांचं स्वागत करते." बलात्काऱ्यांवर ऑन द स्पॉट अशीच कारवाई करायला हवी, असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलंय.
 
अशी घडली होती घटना
मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
 
टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
 
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला. मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
 
त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं.