गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (20:11 IST)

अफगाणिस्तान : भुकेनं रडणाऱ्या मुलांना झोपवण्यासाठी मी गुंगीची औषधं देतो

Author,योगिता लिमये
अफगाणी लोक त्यांच्या भुकेल्या मुलांना झोपवण्यासाठी गुंगी आणणारी औषधे देत आहेत. इतर जण जगण्यासाठी त्यांच्या मुली व अवयव विकत आहेत.
 
तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता काबीज केल्यानंतर आणि परदेशी निधी गोठवला गेल्यानंतरच्या दुसऱ्या हिवाळ्यामध्ये लाखो लोक भूकबळी जाण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.
 
 “आमची मुले सतत रडत असतात आणि ती झोपत नाहीत. आमच्याकडे अन्न नाही.” अब्दुल वहाब म्हणाला.
 
 “म्हणून आम्ही औषधांच्या दुकानात जातो, गोळ्या घेतो आणि त्यांना देतो. जेणेकरून त्यांनी गुंगी येईल.”
 
 तो हेरत या शहराच्या सीमेवर राहतात. हेरत हे अफगाणिस्तानातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. या ठिकाणी गेल्या अनेक दशकांपासून हजारो मातीची घरे उभी राहिली आहेत आणि बेघर झालेले, युद्धात व नैसर्गिक आपत्तीमुळे पोळलेले लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
 
 आमच्या भोवती गोळा झालेल्या सुमारे डझनभर लोकांच्या गटातील अब्दुल एक आहे. आम्ही विचारले, मुलांना गुंगी आणण्यासाठी किती जण गोळ्या देतात?
 
 “आमच्यापैकी बरेच जण देतात.” तो उत्तरला.
 
 गुलाम हजरतने त्याच्या अंगरख्याच्या खिशात हात घातला आणि गोळ्यांची एक पट्टीच बाहेर काढली. त्या ॲल्प्राझोलॅम  गोळ्या होत्या. चिंतातुरता म्हणजेच अँक्झायटीसंबंधित आजार असलेल्या रुग्णांना शांत करण्यासाठी या गोळ्या देतात.
 
 गुलामला सहा मुले आहेत. सर्वात धाकडे मूल एक वर्षाचे आहे. “मी त्यालासुद्धा देतो.” तो म्हणाला.
 
 इतरांनी आम्हाला एस्किटॅलोप्रॅम आणि सर्ट्लाइन गोळ्यांच्या पट्ट्या दाखवल्या. या गोळ्या ते त्यांच्या मुलांना देत असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्य व चिंतातुरता असलेल्या रुग्णांना या गोळ्या दिल्या जातात. 
 
 पुरेसे पोषण मिळत नसलेल्या मुलांना या गोळ्या दिल्या तर त्यांचे यकृत निकामी होऊ शकते, तसेच दीर्घकालीन थकवा येऊ शकतो, झोप येऊ शकते आणि वर्तनदोष निर्माण होऊ शकतात, असे डॉक्टर म्हणतात.
 
 तिथल्या औषधाच्या दुकानात आम्हाला समजले की, या औषधाच्या पाच गोळ्या 10 अफगाणींसाठी वापरल्या जातात (साधारण 10 अमेरिकन सेंट्स). ही एका पावासाठी लागणारी किंमत असते.
 
 आम्ही ज्या कुटुंबांना भेटलो ते बहुतेक जण दररोज पाव वाटून खातात. एका महिलेने आम्हाला सांगितले की, ते सकाळी कोरडा पाव खातात आणि रात्री पाव भिजवून खातात.
 
  हेरतच्या सीमेवरील भागात राहणारे बहुतेक पुरुष मजुरी करतात. गेली अनेक वर्षे ते अत्यंत हालाखीचे जीवन जगत आहेत.
 
तालिबानने गेल्या ऑगस्टमध्ये सत्ता काबीज केली. नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही. अफगाणिस्तानात येणारा परदेशी निधी गोठवला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था जवळजवळ ढासळली आहे. त्यामुळे अनेक पुरुष कित्येक दिवस कामाविना असतात.
 
 एखाद्या दिवशी त्यांना काम मिळते. त्या बदल्यात त्यांनी 100 अफगाणी किंवा एक डॉलरहून थोडे जास्त पैसे मिळतात.
 
 आम्ही जिथे कुठे गेलो, तिथे आम्हाला दिसून आले की, लोकांना त्यांच्या कुटुंबीयांची भूक भागविण्यासाठी टोकाची पावले उचलावी लागत आहेत.
 
अम्मर (नाव बदलले आहे) म्हणाला की, त्याने तीन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करून मूत्रपिंड काढून घेतले. त्याने त्याच्या शरीरावरचा 9 इंचांचा व्रणही दाखवला.
 
 तो त्याच्या विशीत म्हणजेच त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या वयात आहे. त्याला कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून त्याचे नाव दिलेले नाही.
 
“इथून सुटकाच नाही. तुम्ही स्थानिक रुग्णालयात मूत्रपिंडू विकू शकता, असे मला समजले. मी तिथे गेलो आणि किडनी विकण्याची इच्छा दर्शवली. काही आठवड्यांनी मला फोन आला आणि रुग्णालयात बोलवून घेतले.”,तो म्हणाला.
 
“त्यांनी काही चाचण्या केल्या. त्यानंतर त्यांनी मला भूल दिली. मी बेशुद्ध झालो. मी खूप घाबरलो होतो पण माझ्याकडे काही पर्यायच नव्हता.”
 
 अम्मरला साधारण 2,70,००० अफगाणी (3100 डॉलर) मिळाले. आपल्या कुटुंबासाठी अन्न विकत घेण्यासाठी घेतलेल्या पैशांची परतफेड करण्यात त्यापैकी बहुतेक रक्कम खर्च झाली.
 
“आम्ही एका रात्री जेवलो तर दुसऱ्या दिवशी खात नाही. माझे मूत्रपिंड विकल्यानंतर मी अर्धाच माणूस राहिलो आहे, असे मला वाटते. मी हताश झालो आहे. आयुष्य असेच सुरू राहिले तर मी कदाचित मरून जाईन.” तो म्हणाला.
 
 पैशासाठी अवयव विकणे अफगाणिस्तानमध्ये नवे नाही. तालिबानने सत्ता काबीज करण्याआधीही असे घडत असे. पण आता, इतका कठोर निर्णय घेतल्यानंतरही लोकांकडे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नाही.
 
 एका उघड्या, थंड घरात आम्ही एका तरुण मातेला भेटलो. तिने सात महिन्यांपूर्वी तिचे मूत्रपिंड विकले होते. त्यांनी बकऱ्यांचा कळप विकत घेण्यासाठी कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची परतफेड करायची होती. काही वर्षांपूर्वी त्या बकऱ्यांचा पुरात मृत्यू झाला आणि त्यांनी त्यांचे उपजीविकेचे साधन गमावले.
 
 तिला मूत्रपिंड विकून मिळालेले 2,40,000 अफगाणी (2700डॉलर) पुरेसे नव्हते.
 
“आता आमच्यावर दोन वर्षाची मुलगी विकण्यासाठी बळजबरी केली जात आहे. आम्ही ज्यांच्याकडून कर्ज घेतले, ते आमचा दररोज छळ करत आहेत. तुम्ही परतफेड करू शकत नसाल तर तुमची मुलगी आम्हाला द्या, असे ते सांगत आहेत.”, ती म्हणाली.
 
“मला तर या परिस्थितीची खूपच लाज वाटते. अशा प्रकारे जगण्यापेक्षा मरण पत्करले, असे मला वाटते.” तिचा नवरा म्हणाला.
 
 तिथले लोक आपल्या मुलींची विक्री करत असल्याचे आमच्या अनेकदा कानावर आले.
 
“मी माझ्या पाच वर्षांच्या मुलीला 1,00,000 अफगाणींना विकले.”, निझामुद्दिन म्हणाला. मूत्रपिंडाच्या किमतीच्या निम्म्यापेक्षाही ही कमी किंमत आहे. हे सांगताना त्याने ओठ घट्ट दाबला होता आणि डोळ्यात पाणी तरळले होते.
 
 इथल्या लोकांच्या प्रतिष्ठेवर त्यांची भूक वरचढ ठरते.
 
“हे इस्लामी कायद्याच्या विरुद्ध आहे, हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही आमच्या मुलांच्या आयुष्याला धोका निर्माण करत आहोत, याचीही आम्हाला जाणीव आहे. पण दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.”, असे या समुदायातील एक प्रमुख अब्दुल गफार म्हणाला.
 
 एका घरात आम्ही चार वर्षांच्या खेळकर नाझियाला भेटलो. तिच्या 18 महिन्यांच्या भावासोबत म्हणजेच शमसुल्लासोबत खेळताना ती मजेशीर चेहरे करत होती.
 
“आमच्याकडे अन्न विकत घ्यायला पैसे नाहीत. म्हणून स्थानिक मशिदीत मी जाहीर केले की मला माझी मुलगी विकायची आहे.” तिचे वडील हजरतुल्ला म्हणाले.
 
 कंदाहारच्या दक्षिणेला असलेल्या एका भागातील कुटुंबातील मुलासोबत लग्न करण्यासाठी तिची विक्री करण्यात आली आहे. आतापर्यंत हजरतुल्लाला तिच्यासाठी दोन वेळा पेमेंट मिळाले आहे.
 
“त्यापैकी बहुतेक रकमेचा वापर अन्न विकत घेण्यासाठी होतो आणि उरलेल्या रकमेतून लहान मुलासाठी औषधे विकत घेतो. त्याच्याकडे पाहा. तो कुपोषित आहे.” हजरतुल्ला म्हणाला. शमसुल्लाचा शर्ट वर करून त्याचे फुगलेले पोट आम्हाला दाखवले.
 
अफगाणिस्तानातील पाच वर्षांखालील मुलांना पुरेसे पोषण न मिळाल्याने कुपोषणाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
 
 मेडिसीन्स सान्स फ्रंटिअर्स (एमएसएफ) या संस्थेमध्ये देशभरातून दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी 47% वाढ झाली आहे. 
 
हेरतमधील एमएसएफचे अन्नकेंद्र हे कुपोषणावर उपचार करणारे एकमेव सुसज्ज केंद्र आहे. केवळ हेरतच नव्हे तर घोर व बगधिस या प्रदेशांमधील रुग्णही येथेच येतात. या प्रदेशांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी कुपोषितांची संख्या 55% वाढली आहे.
 
गेल्या वर्षीपासून त्यांनी खाटांची संख्या वाढवली आहे, जेणेकरून कुपोषित मुलांच्या वाढत्या संख्येवर उपचार करता येऊ शकतील. इतके होऊनही हे केंद्र कायम भरलेले असते. या ठिकाणी येणाऱ्या मुलांवर एकाहून अधिक आजारांवर उपचार करावे लागतात.
 
ओमिद कुपोषित आहे आणि त्याला हर्निया व सेप्सिस झाला आहे. 14 महिन्यांच्या ओमिदचे वय फक्त 4 किलो आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या वयाच्या सामान्य प्रकृतीची मुलांचे वय 6.6 किलो असते. त्याला जेव्हा खूप उलट्या होऊ लागल्या तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आमनाने म्हणजेच त्याच्या आईने पैसे उधार घेतले होते.
 
हेरतमधील तालिबान प्रांतीय सरकारचे प्रवक्ते असलेल्या हमीदुल्ला मोटावकील यांना भुकेच्या प्रश्नाबद्दल विचारणा केली.
 
“अफगाणिस्तानवर जे आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले आहेत आणि अफगाणी मालमत्ता गोठवल्या गेल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे. गरजूंची संख्या किती आहे, हे निश्चित करण्याचा आमचे सरकार प्रयत्न करत आहे. अनेक जण त्यांच्या परिस्थितीबद्दल असत्य सांगत आहेत कारण त्यांना मदत मिळेल, असे वाटत आहे.”ते म्हणाले. परिस्थिती किती हालाखीची आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, असे सांगूनही त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही.
 
 तालिबान रोजगारनिर्मितीचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. “आम्ही लोखंडाच्या खाणी आणि नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनचा प्रकल्प सुरू करणार आहोत.”
 
 पण नजीकच्या भविष्यात हे कठीण दिसत आहे.
 
 तेथील नागरिकांनी आम्हाला सांगितले की, तालिबान सरकार व आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला वाळीत टाकल्यासारखे वाटत आहे.
 
 भूक ही हळुहळू आणि शांतपणे मारते. भुकेचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत.
 
 जगाचे याकडे लक्ष नाही. पण अफगाणिस्तानमधील समस्येची व्याप्ती कदाचित कधीच जगासमोर येणार नाही. कारण याची मोजदादच होत नाही आहे.
 
 अतिरिक्त वृत्त संकलन - इमोजेन अँडरसन आणि मलिक मुदस्सिर