शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (15:21 IST)

इंदुरीकर जर निवडणूक लढवणार नाहीत तर भाजपच्या यात्रेत का गेले?

श्रीकांत बंगाळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला कीर्तनकार इंदुरीकर महाराज उपस्थित होते, त्यामुळे ते राजकारणात येत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली.
 
संगमनेरच्या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तिथून ते परतले पण इंदुरीकर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झाली.
 
यातलं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
 
इंदुरीकर महाराज निवडणूक लढणार नाही, असं त्यांच्या प्रवक्त्यांशी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
 
"इंदुरीकर महाराज आमदारकीचं तिकीट घेणार नाही. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाही. कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून 1 लाख रुपये देण्यासाठी महाराज तिथं गेले होते. बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं," असं इंदुरीकरांचे प्रवक्ते किरण महाराज शेटे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
तर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाविषयी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं, "आमदारकीबाबत आमची कोणतीही चर्चा महाराजांशी झालेली नाही. मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे देण्यासाठी ते उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त कुठल्याही स्वरूपाची राजकीय चर्चा आमच्यात झालेली नाही."
 
इंदुरीकर महाराज बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध निवडणूक लढायचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांनी स्वत: बाळासाहेबांचे वडील भाऊसाहेब थोरात यांच्या कामाचं कौतुक केलं आहे, असं इंदुरीकरांचे निकटवर्तीय सांगतात.
 
इंदुरीकर महाराजांचा 9 जानेवारी 2019ला वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.
 
त्यावेळी ते म्हणाले, "सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांना आमच्या विद्यालयाच्या पहिल्या गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. तोपर्यंत एक इमारत होती. या संस्थेला पहिली देणगी दादांनी त्यांच्या पैशातून 25 हजार रुपये दिली होती," अशी आठवण ते कृतज्ञतापूर्वक सांगतात.
भाजप उमेदवाराच्या शोधात?
इंदुरीकर महाराजांच्या या कार्यक्रमातील उपस्थितीविषयी ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे सांगतात, "इंदुरीकर महाराज या कार्यक्रमाला गेले. त्यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द केला आणि लगेच तिथून निघून गेले. त्यांनी तिथं भाषण केलं नाही किंवा कोणतीच राजकीय भूमिकाही जाहीर केली नाही, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम काय ते सांगता येणार नाही. शिवाय, ते संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत असली तरी इंदुरीकर अकोले तालुक्यातून येतात. त्यामुळे याबद्दलही काही सांगता येणार नाही."
 
"पण, हेही खरं आहे की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपला बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात उमेदवार सापडत नाहीये. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे यांनी इथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा होती. पण त्यातून पुढे काही निष्पन्न झालं नाही," तुपे पुढे सांगतात.
 
'मी सर्व पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता'
राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन केलं जातं. इतकंच काय येरवडा मध्यवर्ती कारागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय.
 
गेल्या वर्षी इंदुरीकरांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला राज्याच्या महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर म्हणाले, "गेल्या 20 वर्षांपासून मी गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी परळी (मुंडे कुटुंबीय) फेस्टिव्हलला असतो, तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामती ( पवार कुटुंबीय) फेस्टिव्हलला असतो. मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे."
 
इंदुरीकर महाराज एकेठिकाणी म्हणतात कोणत्याच नेत्याच्या टोळीत जाऊ नका. आपल्या गळ्यातली तुळशीची माळ हातात धरून ते म्हणतात आमच्या टोळीत म्हणजेच वारकरी संप्रदायात या. इथं आलात तर पैसा मिळणार नाही पण समाधान नक्की मिळेल.