सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (10:15 IST)

पाकिस्तान : जेव्हा सावरकर आणि गोळवलकरांचं नाव उच्चारताना इम्रान खान अडखळतात...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर पुन्हा टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी सावरकर आणि गोळवलकरांचं नाव उच्चारताना अडखळले. 
 
भाजपनं मात्र इम्रान खान यांना भारताच्या अंतर्गत बाबींवर टीका करण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्यांच्या देशातलं पाहावं असं प्रत्युत्तर दिलं आहे.
 
लाहोरमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय शीख संमेलनामध्ये सोमवारी त्यांनी भाषण केलं. यामध्ये भारत, शीख आणि काश्मीरसारख्या मुद्दयांबाबत ते बोलले.
 
ते म्हणाले, "मला अतिशय खेदाने असं म्हणावं लागतंय की भाजपचं हे सरकार त्याच दृष्टिकोनातून काम करतंय, ज्याद्वारे पाकिस्तानची निर्मिती झाली होती."
 
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचं कौतुक करत ते म्हणाले की 'कायद-ए-आजम' धार्मिक नव्हते. तर या विचारसरणीच्या लोकांना स्वातंत्र्य नाही तर हिंदुराष्ट्र हवं असल्याचं त्यांनी ओळखलं होतं.
 
ते म्हणाले, "तेव्हा त्यांनी पुन्हा पुन्हा असं सांगितलं होतं की तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाहीये. इंग्रजांच्या गुलामगिरी नंतर तुम्ही आता हिंदूंच्या गुलामीखाली जाणार आहात."
 
इम्रान खान म्हणाले, "मी भारताला चांगला ओळखतो. मी अनेकदा तिथे जायचो. माझे अनेक मित्र आहेत तिथे. पण RSS भारताला ज्या दिशेने घेऊन जात आहे, तिथे इतर कोणालाच जागा नाही."
 
महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी इम्रान खान यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
"इम्रान खान यांनी ही टीका पहिल्यांदा केलेली नाही, भारतातल्या अंतर्गत बाबींवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही. संघ, भाजपवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांनी स्वतःच्या देशात लक्ष घालावं.
 
ज्या महान व्यक्तींची नावं सुद्धा त्यांना उच्चारता येत नाहीत त्यांच्यावर त्यांनी टीका करणं म्हणजे त्यांनी सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, इम्रान यांनी आधी भारताचा इतिहास आणि व्यक्तींची नावं आधी नीट समजून घ्यावीत," असं प्रत्युत्तर भांडारी यांनी दिलं आहे.
 
भारताने नेहमी सन्मान दिला
याचवेळी इम्रान खान यांनी भारतासंबंधीच्या आठवणींना उजाळा दिलाय. भारतात गेल्यावर दरवेळी खूप सन्मान मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
कोणताही धर्म अत्याचाराला परवानगी देत नाही, अगदी हिंदू धर्मातही असं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
ते म्हणाले, "मी क्रिकेट खेळण्यासाठी पहिल्यांदा जेव्हा भारतात गेलो तेव्हा मला तो देश वेगळाच वाटला. तिथे आम्हाला भरपूर आदर आणि प्रेम मिळालं. आम्ही ज्या भारताबद्दल इतक्या द्वेषपूर्ण आणि भयंकर गोष्टी ऐकत होतो, ज्या देशाला आम्ही शत्रू समजत होतो तिथे आम्हाला इतका आदर आणि इतके मित्र मिळाल्याचं पाहून आम्ही चकितच झालो. आजही माझे अनेक मित्र आहेत तिथे."
 
म्हणूनच पंतप्रधान झाल्यापासून आपल्याला भारतासोबतचे संबंध सुधारायचे असल्याचं इमरान खान यांनी म्हटलंय.
 
ते म्हणाले, "मी पहिल्याच दिवशी भारताला निरोप दिला होता की जर तुम्ही आमच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंत तर आम्ही दोन पावलं पुढे येऊ. दोन्ही देशांतल्या अडचणी सारख्याच असल्याचं नरेंद्र मोदींसोबत फोनवरून बोलताना मी म्हटलं होतं. गरीबी आहे, बेरोजगारी आहे आणि हवामान बदलाची मोठी अडचण आहे."
 
'काश्मिरमध्ये मुसलमान नसते, तरीही बोललो असतो'
काश्मिरचा प्रश्न चर्चेचने सोडवला जाऊ शकतो पण याबाबत भारताकडून नेहमी अटी घालण्यात आल्याचं पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटलंय.
 
इम्रान खान म्हणाले, "तुम्ही आधी हे केलंत तर आम्ही पुढाकार घेऊ असं एखाद्या सुपर पॉवर देशाने एखाद्या गरीब देशाला सांगावं तसं त्यांनी केलं. युद्धाने एखादा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असं मला वाटत नसल्याने मी यामुळे चकितच झालो युद्धाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल, तर तो बेकअक्कल आहे. त्या व्यक्तीने जगाचा इतिहास वाचलेला नाही. युद्धाने तुम्ही एक प्रश्न मिटवाल पण त्यामुळे चार नवीन प्रश्न निर्माण होतील."
 
माजी क्रिकेट कर्णधार ते पाकिस्तानचे पंतप्रधान असा प्रवास करणाऱ्या इम्रान खान यांनी भारतावर धार्मिक भेदभावाचा आरोप केलाय.
 
ते म्हणाले, "भारताने काश्मिरमध्ये गेल्या २७ दिवसांपासून कर्फ्यू लावलाय आणि ८० लाख लोकांना बंदिस्त केलंय. बिचाऱ्या रुग्णांचं आणि मुलांचं काय होत असेल? माणुसकी असलेलं कोणीही असं कसं करू शकतं? कोणताही धर्म असं वागण्याची परवानगी देतो का? तुम्ही हिंदुत्त्ववाद वाचा. हिंदू धर्मात असं वागण्याची परवानगी आहे का? दुसऱ्या धर्माची लोकं आपल्याच दर्जाची असल्याचं जेव्हा तुम्ही मानत नाही तेव्हाच तुम्ही असं वागता."
 
जर हे लोक (काश्मिरी) मुसलमान नसते, तरीही आपण याविषयी बोललो असतो असं इम्रान खान म्हणाले आहेत.
 
पण संपर्काची साधनं आणि संचारावर नियंत्रण ठेवल्याने परिस्थिती चिघळली नाही आणि लोकांचे जीव वाचले, असं भारत सरकारचं म्हणणं आहे.
 
दहशतवाद्यांचं इंटरनेट बंद करायचं पण इतरांसाठी इंटरनेट सुरू ठेवायचं, असं करणं शक्य नसल्याचं युरोपातल्या 'पोलिटिको' मासिकाशी बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "दहशतवादांचा एकमेकांतला संपर्क तोडायचा पण त्याचा सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे शक्य नव्हतं. दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखांमधल्या संपर्काची साधनं बंद करायची पण इतरांसाठी इंटरनेट सुरू ठेवायचं, हे कसं शक्य आहे? मला या पद्धतीविषयी जाणून घ्यायला आवडेल."
 
शीखांना मल्टीपल एन्ट्री व्हिजा
मल्टीपल व्हिसा देण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणत शीख संमेलनात इमरान खान यांनी पाकिस्तानी शीखांना दिलासा दिला.
 
खान म्हणाले, "तुम्हाला जर भारतात जायचं असेल, परत यायचं असेल तर तुमच्यासाठी मल्टीपल एन्ट्री व्हिसाची सोयही आम्ही करू."
 
जर मुसलमान दुसऱ्या धर्माच्या कोणावर अन्याय करत असेल तर तो आमच्या धर्माच्या विरोधात आहे असंही ते म्हणाले आहेत. अल्पसंख्याक हे आमच्याच बरोबरीचे नागरिक असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलंय.
 
करतारपूर साहिब आणि ननकाना साहिब या शीख तीर्थस्थानांचाही इम्रान खान यांनी उल्लेख केला.
 
"करतापूर तुमची मक्का आहे, तर ननकाना साहिब मदीना आहे. तुम्हाला तुमच्या मक्का - मदीनापासून दूर ठेवण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. जर एखाद्या मुसलमानाला मक्का - मदिनेला जाता आलं नाही तर त्याला किती त्रास होईल. तुमच्यावर कोणीही उपकार करत नाहीये. हे आमचं कर्तव्यच होतं. आम्ही तुमच्यासाठी गोष्टी सुकर करू."
 
भारतासोबतचा तणाव आणि युद्धाच्या शक्येतेविषयी ते म्हणाले "आण्विक शक्ती असणाऱ्या दोन देशांतला तणाव वाढला, तर साऱ्या जगालाच त्याचा धोका असतो. मी फक्त इतकंच म्हणीन की आमच्याकडून कधीही कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणार नाही."
 
पण नंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने याविषयीचं स्पष्टीकरण देत म्हटलं की परदेशी वृत्तसंस्थांनी इमरान खान यांचं म्हणणं चुकीच्या स्वरूपात मांडलं. मंत्रालयाने म्हटलंय, "अण्वस्त्रधारी दोन देशांमधल्या संघर्षाविषयीचं पाकिस्तानी पंतप्रधानांच्या मताचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय. अण्वस्त्रधारी दोन देशांत संघर्ष होऊ नये पण पाकिस्तानाने त्यांच्या आण्विकनीतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही."