सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (12:39 IST)

इम्रान खान यांचा चीन दौरा : काश्मीरप्रश्नी चीननं का बदलली भूमिका?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु यावेळी चीनने काश्मीरबाबत जे मत व्यक्त केले ते पाकिस्तानसाठी फार आनंददायी नाही.
 
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काश्मीर प्रश्नावर पूर्वीपेक्षा एकदम उलट मत व्यक्त केलं आहे. यापूर्वी काश्मीरचा प्रश्न यूएन चार्टर आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावांतर्गत सोडवला पाहिजे असं मत चीननं व्यक्त केलं होतं.
 
आता मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संवाद साधून हा प्रश्न सोडवावा, असं वक्तव्य चीननं केलं आहे.
 
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या बरोबर आधीच होत आहे का, असा प्रश्न मंगळवारी (8 ऑक्टोबर) पत्रकारांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला केला. या दोन्ही दौऱ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
 
पाकिस्तानचे पंतप्रधान या भेटीत काश्मीर मुद्द्यावर नक्कीच बोलतील, असं पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये म्हटलं जातंय.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नियमित पत्रकार परिषदेमध्ये मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटलं, "काश्मीरच्या मुद्द्यावर आमचं मत बदललेलं नाहीये. आमचं मत तितकंच स्पष्ट आहे. भारत- पाकिस्ताननं काश्मीर आणि अन्य मुद्द्यांवर संवाद साधायला हवा. त्यातूनच दोन्ही देशांमधला विश्वास वाढेल आणि संबंध सुधारण्यास मदत होईल."
 
चीननं दिला होता पाकिस्तानला पाठिंबा
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. भारतानं जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर चीननं त्यावर प्रतिक्रिया दिली होती. भारतानं काश्मिरच्या परिस्थितीत कोणताही बदल करू नये, असं मत चीननं व्यक्त केलं होतं.
 
पाकिस्ताननं हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नेलं, तेव्हाही चीननं त्याला पाठिंबा दर्शवला होता.
 
इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी चीनचे राजदूत याओ जिंग यांनी या मुद्द्यावर चीन पाकिस्तानच्या पाठिशी उभा राहील, असं सांगितलं होतं.
 
"आम्ही काश्मिरी लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत," असंही याओ जिंग यांनी म्हटलं होतं. परंतु आता दोन्ही देशांनी एकमेकांशी संवाद साधून हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका चीनने घेतली आहे.
 
गेंग शुआंग यांनी पाकिस्तान चीनचा 'राजकारणातील महत्त्वाचा प्रवासी' असल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तान आणि चीनच्या नेत्यांमध्ये नेहमीच संवाद घडत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
शुआंग यांनी पाकिस्तानबरोबर आमचा राजकीय पातळीवरील विश्वास मजबूत आणि व्यावहारिक असल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे त्यांनी भारतही आपला महत्त्वाचा शेजारी देश असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
"भारत आणि चीन विकसनशील देश आहेत. दोन्ही देशांच्या बाजारपेठा प्रगतीपथावर आहेत. गेल्या वर्षी वुहान येथे भारत आणि चीनमध्ये सुरु झालेले संबंध आता दृढ झाले आहेत. दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांच्या साहाय्याने पुढे वाटचाल करत आहेत, तसंच मतभेद संवेदनशीलतेने हाताळत आहेत," असं शुआंग यांनी म्हटलं.
 
इम्रान यांचा दौरा चीनसाठी किती महत्त्वाचा?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन दौऱ्याविषयी विचारले असता, गेंग शुआंग यांनी म्हटलं, "पंतप्रधान इम्रान खान यांचा चीन दौरा आमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग, पंतप्रधान ली केचियांग आणि चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते ले जांग शू या भेटीत इम्रान खानशी संवाद साधतील. दोन्ही देश परस्पर हितसंबंधांसाठी एकमेकांशी सविस्तर चर्चा करतील.''
 
गेंग शुआंग यांनी असंही म्हटलं, "भारत आणि चीन अशा दोन्ही देशांतील संबंधित विभाग तडजोडींसाठी प्रयत्न करतील.''
 
चीनच्या परराष्ट्र खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत.
 
दरम्यान, चीनचे राजदूत सुन वेइडाँग यांनी ट्विटरवरून भारतीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
तसंच आणखी एका ट्विटमध्ये वेइडाँग यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पंचशील सिद्धांताचा उल्लेख केला.
 
त्यांनी म्हटलं, "आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता वाढत आहे. यामुळे भारत आणि चीननं आंतरराष्ट्रीय आणि अन्य क्षेत्रातील मुद्द्यांवर आपले हितसंबंध जपणं गरजेचं आहे. पंचशील करारावर ज्याप्रमाणे दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली होती, त्याप्रमाणेच आताही वागणं गरजेचं आहे. आता हाच पंचशील सिद्धांत आंतरराष्ट्रीय संबंधांचा पाया झालेला आहे.''
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानातील चीनच्या राजदूतांचं विधान सर्वात संदिग्ध ठरलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'च्या मते शनिवारी (5 ऑक्टोबर) भारताने चीनवर तीव्र भूमिका घेतली होती.