सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (11:57 IST)

अजित पवारांच्या 1000 कोटींच्या मालमत्तेवर आयकर विभागाची टाच

अजित पवारांशी संबंधित 1000 कोटींच्या 5 मालमत्तांवर आयकर विभागानं टाच आणली आहे, एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
 
त्यामध्ये दक्षिण मुंबईतील पार्थ पवार यांच्याशी संबंधित कार्यालय, दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील रिसॅार्ट, साखर कारखाना आणि शेतजमीन टाच आणण्यात आलीये.
काही दिवसांपूर्वीच आयकर विभागानं अजित पवार यांच्या बहिणींच्या घर आणि कार्यालयांवर छापे मारले होते.
 
टाच आणण्यात आलेल्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने पैसे आणण्यात आल्याचा आयकर विभागाचा दावा आहे.
 
काही दिवसांपूर्वीच ITने अजित पवारांशी संबंधित काही ठिकाणी छापे मारले होते. यात 184 कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली होती. या प्रकरणी आज कारवाई करण्यात आली आहे.
 
मविआच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न - संजय राऊत
हे सर्व ठरवून चाललं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांना त्रास द्यायचा, त्यांना बदनाम करायचं काम सध्य सुरू आहे. अजित पवारांशी संबंधित लोकांवरही आज कारवाई झाली आहे. भाजपचे लोकं सगळे जंगलात राहतात का? त्यांच्या काही प्रॉपर्टी नाही किंवा त्या सगळ्या वैध मार्गानं मिळवलेल्या आहेत का, असं राऊत म्हणाले.
 
आम्ही अनेकांबाबत माहिती ईडीला दिली आहे. त्याला आजवर हात लागलेला नाही. त्यांची कुटुंबं ही कुटुंब आहेत मग आमची कुटुंब रस्त्यावर आली आहेत का? भाजपनं सुरू केलेलं हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटेल असं राऊत म्हणाले.