‘अँजेलिना जोली सारखं’ दिसण्याचा नाद भोवला: इराणच्या इन्स्टाग्राम स्टारला 'ईशनिंदेप्रकरणी अटक'
सहर तबार हिला पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली ती तिने अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी केलेल्या अट्टाहासामुळे.
आता सहर तबार हे नाव पुन्हा चर्चेत आहे, कारण या इन्स्टाग्राम स्टारला अटक झाल्याचं वृत्त 'तस्नीम' या वृत्तसंस्थेने दिलंय.
अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी सहरने तब्बल 50 प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा होती. भरपूर एडिट केलेले हे फोटो तिने पोस्ट केल्यानंतर गेल्यावर्षी ते व्हायरल झाले होते.
खप्पड गाल, गाल फुगवून आणलेलं हसू, एखाद्या कार्टूनसारखं वरच्या दिशेला वळलेलं नाक, असा या इन्स्टाग्रामरचा फोटो व्हायरल झाला होता.
बीबीसीचे मध्य पूर्वेतले विश्लेषक सबॅस्टियन अशर सांगतात, जेव्हा 22 वर्षांच्या सहर तबारने जगाचं लक्ष वेधलं तेव्हा अनेकांनी तिला अँजेलिना जोलीची 'झाँबी' आवृत्ती किंवा 'गरिबांची अँजेलिना जोली' म्हटलं होतं.
अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी आपण अनेक कॉस्मेटिक सर्जरी केल्याचं तिने जाहीर केल्यावर तर अनेकांनी काळजी व्यक्त केली होती. इन्स्टाग्रामवरची तिची प्रसिद्धी आणि फॉलोअर्स यामध्ये झपाट्याने वाढ झाली.
आपला भुतासारखा हा अवतार मेकअप आणि डिजिटल एडिटिंगच्या मदतीने साध्य करत असल्याचंही तिने सूचित केलं होतं. तिने स्वतःला अगदी एखाद्या 'आर्ट इन्स्टॉलेशन'सारखं जगापुढे सादर केलं होतं.
पण तिला अटक का झाली?
लोकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतर सहर तबारला प्रशासनाने अटक केल्याचं तस्नीम वृत्तसंस्थेने म्हटलंय.
ईशनिंदा, हिंसेला चिथावणी, बेकायदेशीररीत्या मालमत्ता मिळवणं, देशातील ड्रेसकोड भंग करणे आणि तरुणांना भ्रष्ट करण्याचे आरोप तिच्यावर आहेत. तेव्हापासून तिचा इन्स्टाग्राम अकाऊंटही डिलीट करण्यात आलेला आहे.
यापूर्वीही इराणमध्ये अनेक ऑनलाईन इन्फ्ल्युएन्सर्स आणि फॅशन ब्लॉगर्सवर कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
सबर तबारच्या अटकेचं वृत्त आल्यापासून अनेकांनी प्रशासनावर टीका केली आहे. एका ट्वीटमध्ये तर असं म्हटलंय की हे सगळं करण्याऐवजी सहरने चोरी किंवा खुनासारख्या तुलनेने कमी वादग्रस्त असणाऱ्या गोष्टी करायला हव्या होत्या.