गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2019 (16:05 IST)

वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड विरुद्धच्या पराभवासाठी महेंद्रसिंग धोनीला खलनायक ठरवणं योग्य आहे का?

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला. इंग्लंडने केलेल्या 338 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला आले. मात्र, भारताला इंग्लंडने दिलेले आव्हान कठीण जाणार असल्याचे सुरुवातीच्या काही ओव्हरमध्येच स्पष्ट झालं.
 
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये समोरील आव्हान अशक्यप्राय गोष्ट वाटू नये म्हणून मोठं लक्ष्य गाठण्यासाठी सुरुवातही दमदार असायला हवी. मात्र, भारताच्या बाबतीत तसं झालं नाही. इंग्लंडने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा भारताने पाठलाग तर केला, मात्र भारतीय संघाला यश मिळालं नाही.
 
भारताच्या या पराभवानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला लक्ष्य करण्यात येऊ लागलं. भारतापेक्षा पाकिस्तानातून धोनीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानात धोनी ट्विटरवर टॉप ट्रेण्ड आहे.
 
इंग्लंड क्रिकेट टीमचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी रविवारी भारत-इंग्लंड सामन्याचं समालोचन करत होते. टीम इंडिया खेळत असताना, शेवटच्या पाच ओव्हरवेळी नासिर हुसैन हे सुद्धा धोनीच्या फलंदाजीवर काहीसे नाराज झाले होते. ते म्हणाले, "धोनी काय करत आहे? किमान त्यानं प्रयत्न तरी करायला पाहिजे."
 
शेवटच्या पाच ओव्हरकडून आशा
नासिर हुसैन यांनी धोनीबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही सहमती दर्शवली. सौरव गांगुली हेही नासिर हुसैन यांच्यासोबत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचं समालोचन करत होते.
 
धोनीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नासिर हुसैनही पाकिस्तानात ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत. मात्र, यावेळी नासिर हुसैन आणि सौरव गांगुली हे विसरले की, 338 धावांचा पाठलाग हा काही शेवटच्या पाच ओव्हरमध्ये होऊ शकत नाही.
 
पहिल्या 10 ओव्हरमध्ये भारताची खराब कामगिरी
भारताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 10 ओव्हरमध्ये केवळ 28 धावा केल्या. त्याचवेळी, शेवटच्या पाच ओव्हरमध्ये धोनी आणि केदार जाधवने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. शिवाय, 20 एकेरी धावा केल्या. तसेच, सहा चेंडूंमध्येही एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे भारताने पहिल्या 10 ओव्हर आणि शेवटच्या पाच ओव्हरमध्ये ज्या प्रकारची धावसंख्या केली, त्यावरुन भारताचा विजय कठीण असल्याचे स्पष्ट झालं होतं.
 
पहिल्या पॉवरप्लेमध्ये तर भारताची धावसंख्या अपेक्षेपेक्षा कमी होती. रोहित शर्मा प्रत्येक सामन्यात सुरुवातील मैदानात टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळीही त्याने तसेच केले. रोहित शर्माला हे चांगलं ठाऊक होतं की, आपल्यासमोरील आव्हान काही लहान नाही. विश्वचषकात पहिल्या पॉवरप्लेमध्ये 28 धावा आणि एक विकेट ही सर्वात धीम्या गतीने केलेली सुरुवात ठरली.
 
रोहित शर्मा फलंदाजीच्या सुरुवातीलाच भाग्यवान ठरला. कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये जो रुटने सेकंड स्लीपध्ये रोहित शर्माचा कॅच सोडला. त्यामुळे एकंदरीतच भारताने आपल्या पराभवाची पटकथा सुरुवातीलाच लिहिली होती. पहिल्या 10 ओव्हरमध्ये पाच चौकार लगावले, मात्र 42 चेंडूत एकही धाव घेता आली नाही.
 
विराट कोहलीला काय म्हणाला?
 
भारतीय फलंदाजांच्या सुरुवातीच्या कामगिरीवर विराट कोहली म्हणाला, "पहिली विकेट गेल्यानंतर आम्ही सतर्क होतो. सुरुवातीलाच विकेट गेल्यानंतर एकप्रकारचा दबाव येतो. आम्ही केएल राहुलची विकेट सुरुवातीलाच गमावलं होतं. पहिल्या 10 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची कामगिरी उत्तम होती."
 
महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी फलंदाजीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, रोहित शर्माने आपल्या प्रतिक्रियेतून धोनी आणि केदार जाधव यांचा एकप्रकारे बचाव केला आहे. रोहित शर्मा म्हणाला, "माही आणि केदारने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्लो पीचमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. अर्थात, इंग्लंडच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, असं कौतुक तुम्ही नक्कीच करु शकता."
 
विराट आणि रोहितच्या खेळीशी तुलना केली असता, धोनीवर संथ गतीने खेळण्याचा आरोप केला जाऊ शकत नाही. रोहित शर्माने 109 चेंडूत 102 धावा केल्या, तर कोहलीने 76 चेंडूत 66 धावा केल्या. म्हणजेच, दोघांनीही जास्त चेंडूत कमी धावा केल्या. त्याचवेळी धोनीने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. धोनी एकमेव खेळाडू ठरला, ज्याने कालच्या सामन्यात इंग्लंडविरोधात षटकार ठोकला. दुसरीकडे, इंग्लंडच्या फलंदाजांनी तब्बल 13 षटकार ठोकले.
 
महेंद्रसिंह धोनीची ओळख कायमच एक 'सर्वोत्तम फिनिशर' अशीच राहिली आहे. म्हणजेच, लक्ष्याचा पाठलाग करत असताना शेवटच्या काही ओव्हरमध्ये धोनी वेगवान धावसंख्या उभारुन विजय मिळवतो, असा भारताच्या अनेक सामन्यांचा इतिहास आहे. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, सामन्याची झालेली खराब सुरुवात फिनिशर म्हणून त्याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये भरुन काढावी.
 
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये टीम इंडियाला जिंकण्यासाठी 71 धावांची गरज होती. म्हणजेच प्रत्येक चेंडूत दोनपेक्षा जास्त धावा करणं आवश्यक होत्या, जे इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शक्य नव्हतं.
 
धोनीच निशाण्यावर का?
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासूनच महेंद्रसिंह धोनीवर टीका होत आहे. या सामन्यात भारत पराभवाच्या उंबरठ्यावरुन परतला आणि विजय मिळवला होता. अफगाणिस्तानविरोधात धोनीने 52 चेंडूत 28 धावांची खेळी केली होती. मात्र, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या सर्व फलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास कर्णधार विराट कोहलीची खेळी सोडल्यास कुणीही फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. रोहित शर्मा तर 10 चेंडूत एक धाव करुन माघारी परतला होता.
 
वेस्ट इंडीजविरोधातील सामन्यातील खेळीवरुनही धोनीवर टीका करण्यात आली होती. या सामन्यात धोनीने 61 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, रोहित शर्मा मात्र 23 चेंडूत 18 धावा करुन माघारी परतला होता आणि कोहलीने 82 चेंडूत 72 धावा केल्या होत्या.
 
पाकिस्तानात धोनीवर टीका का?
इंग्लंड विरोधातील सामन्यात टीम इंडिया पराभूत झाल्याने पाकिस्तानला फटका बसला. कारण पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तानी टीम चौथ्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर गेली आहे. त्यामुळे इंग्लंडविरोधात महेंद्रसिंह धोनीने चांगली खेळी केली नसल्याने पाकिस्तानातही त्याच्यावर टीका होत आहे.
 
विश्वचषकात पाकिस्तानकडे आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये नऊ पॉईंट्स, तर इग्लंडकडे आठ सामन्यांमध्ये 10 पॉईंट्स आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा आता केवळ एक-एक सामना उरला आहे.
 
बांगलादेशविरोधातील आगामी सामना पाकिस्तानने जिंकला, तर त्यांचे 11 पॉईंट्स होतील आणि इंग्लंडने आगामी सामना जिंकला, तर त्यांचे 12 पॉईंट्स होतील. याच कारणामुळे भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताने विजय मिळवला असता, तर ते पाकिस्तानच्या पथ्थ्यावर पडलं असतं. मात्र, भारत कालच्या इंग्लंडविरुद्ध सामन्यात पराभूत झाला आणि पाकिस्तानला धक्का बसला.