1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 27 जून 2024 (10:19 IST)

मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून लाज वाटते- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई लोकल ट्रेनमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून लाज वाटते, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
 
गर्दी असलेल्या गाड्यांमधून पडून किंवा रुळावरील इतर अपघातांमुळे होणारे मृत्यू यावर दाखल केलल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे.
 
ही अत्यंत गंभीर समस्या आहे, असं न्यायालयानं म्हटलंय. यतीन जाधव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.
 
मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, “मुंबईची परिस्थिती दयनीय आहे म्हणून ते मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही उच्च अधिकाऱ्यांना जबाबदार धरतील.”
 
"जनहित याचिकामध्ये अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे आणि त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना त्यावर लक्ष द्यावे लागेल. तुम्ही असे म्हणू शकत नाही की आम्ही हे करू शकत नाही किंवा मोठ्या संख्येने लोक प्रवास करत असल्यामुळे करू शकत नाही, असंही तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही लोकांना गुरांसारखे वाहून नेतात, ज्या पद्धतीने प्रवाशांना प्रवास करायला लावले जाते, त्याची आम्हाला लाज वाटते.”
 
मुंबईमधील लोक, त्यातील प्रवाशांचं काय म्हणणं आहे, यावर बीबीसी मराठीनं काही दिवसांपूर्वी सविस्तर बातमी केली होती. ती पुन्हा शेयर करत आहोत.
 
रेल्वे स्थानक : डोंबिवली.
सोमवारचा दिवस आणि सकाळी 7.59 ची फास्ट लोकल.
प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी.
 
आज लेटमार्क लागू नये म्हणून ट्रेन आल्यानंतर जीव मुठीत धरून, या गर्दीतून वाट काढत ही लोकल पकडावी लागणार होती. त्यासाठी पाठीवरची बॅग पुढे अडकवली होती. फोन बॅगेत ठेवला होता. लेडीज डब्बा जिथे येतो, तिथून बरोबर दहा पावलं आधीच पूजा थांबली होती.
 
जेणेकरून ट्रेन आल्यानंतर साईडच्या हॅंडलला पकडून थोडं पुढे धावता येईल आणि दरवाजाच्या एका बाजूची जागा पकडून आत शिरता येईल.
 
लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर येत असल्याची घोषणा झाली आणि पूजानं स्वत:ला पुन्हा एकदा सावरून ट्रेनमध्ये चढण्यासाठी सज्ज केलं.
 
लोकल आल्यानंतर ती थांबण्याआधीच महिलांची गर्दी अंगावर आली. या गर्दीतल्या धक्क्यानं पूजा प्लॅटफॉर्मवर पडली. अनेकजणींनी तिला ढकलून लोकल पकडली. पूजाला त्या गर्दीतून वाट काढता आली नाही. तिच्या पायाला जबर मार लागला.
 
डोंबिवलीला राहणाऱ्या पूजा व्हटकरबाबत घडलेल्या घटनेला दोन वर्ष झाली. पण पायाचं दुखणं अजूनही गेलेलं नाही, असं त्या सांगतात.
 
पूजा सांगतात, "पूर्वीसारखं आता ट्रेनमध्ये चढता येत नाही. आम्ही कसं जायचं? वेळेच्या तास-दीड तास आधी निघूनही ऑफिसमध्ये वेळेत पोहोचता येत नाही. इतक्या वेळा कुठेना कुठे लागतं, जखमा होतात, कपडे फाटतात. पण यावर कोणीही पर्याय शोधत नाही."
 
29 एप्रिल 2024 ची घटना.
डोंबिवलीत राहणारी रिया राजगोर ही 26 वर्षांची तरूणी तिच्या ठाण्याच्या ऑफिसला जायला निघाली. सकाळची वेळ असल्यामुळे डोंबिवलीत सगळ्या लोकल ट्रेनना गर्दी ठरलेली असते. एका फास्ट लोकलमध्ये रिया कशीबशी चढली.
 
फास्ट लोकलचं डोंबिवलीनंतर पुढचं स्थानक ठाणे आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्यामुळे ती दरवाजाला लटकत राहिली दरवाजात गर्दी करून असलेल्या महिलांना आतमध्ये ढकलण्याचा तिने प्रयत्नही केला. पण तो अयशस्वी ठरला.
 
डोंबिवलीच्या पुढे कोपर स्टेशनच्या दरम्यान लोकलने वेग घेतला आणि रियाचा दरवाज्याजवळून तोल गेला. रिया चालत्या लोकलमधून रेल्वे ट्रॅकवर पडली आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.ही झाली मध्य रेल्वेची परिस्थिती.
 
तिकडे पश्चिम रेल्वेची परिस्थितीही यापेक्षा काही वेगळी आहे, असं नाही. पण तिथला संघर्ष वेगळा आहे.
 
विरारला राहणारा ऋषिकेश गोसावी. गेली 7-8 वर्ष विरारहून अंधेरीला प्रवास करतात.
 
ऋषिकेश सांगतात, "कोणत्याही वेळेत गेलं तरी लोकलची गर्दी ही पाचवीला पूजल्यासारखी असते. रोज चढताना हातापायाला लागत असतं. कसंतरी आम्ही वाट काढत ट्रेनमध्ये शिरतो. त्यात मोठा संघर्ष परत येताना असतो. ट्रेनला गर्दी असते. आतमध्ये शिरण्यासाठी जागा असली तरी काही टोळक्यांकडून दरवाजे ब्लॉक करणं सुरू होतं.
 
"बोरिवलीला उतरणारा माणूस विरार ट्रेनमध्ये दिसला तर त्याला उतरू न देणे, येताना अंधेरी , बांद्र्याहून चढू न देणे असे अनेक प्रकार घडतात. काही अलिखित नियम बनवतात. ते पाळायला भाग पाडतात.
 
"पोलीस असतात, पण काहीही हस्तक्षेप करत नाहीत. जी नवीन माणसं आहेत त्यांना हे नियम माहिती नसतील तर त्यांनी कसा प्रवास करायचा? रोजच्या जगण्यातला संघर्ष हा लोकल प्रवासापासून सुरू होतो आणि दिवसाच्या शेवटी त्याच गर्दीने भरलेल्या लोकल प्रवासाने होतो. यावर काहीतरी मार्ग काढला पाहीजे."
 
हे आणि यापेक्षाही भीषण अनुभव मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या लाखो प्रवाशांचे आहेत आणि ते रोजचे आहेत.
 
पण लोकल ट्रेनशिवाय दुसरी सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे रोज या संघर्षाला सामोरं जाण्याशिवाय या लाखो मुंबईकरांकडे गत्यंतर नाही!
 
गर्दी कमी झाली, तरी दर दिवशी तीन मृत्यू?
लोकल ट्रेनच्या 12 डब्यांची प्रवासी क्षमता साडेतीन हजारापर्यंत असते. त्यात बसलेले आणि उभे असलेले असे दोन्ही प्रवासी. प्रत्यक्षात मात्र या आकड्याहून अधिक प्रवासी गर्दीच्या वेळी एका लोकल ट्रेनमधून प्रवास करतात.
 
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे प्रवासी मिळून दररोज जवळपास 75 लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. कोरोना काळानंतर ही गर्दी कमी काही प्रमाणात कमी झाल्याचं रेल्वेच्या आकडेवारीमधून दिसून येतंय.
 
या आकडेवारीवरून लक्षात येईल की, कोरोनापूर्व काळात 34 लाखांहून अधिक प्रवासी पश्चिम रेल्वेतून प्रवास करत होते. पण हा आकडा 2023-24 मध्ये पूर्ववत झाला नाही.
 
कोरोनानंतर जवळपास 7 लाख 13 हजार प्रवासी कमी झाल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे
 
मध्ये रेल्वेवर दररोज 3.82 लाख प्रवासी कमी झाल्याचं ही आकडेवारी सांगते.
 
ही गर्दी कशामुळे कमी झाली? तर रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार, मेट्रोसारख्या पर्यायी व्यवस्थेमुळे ही गर्दी कमी झाल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर विविध नवीन प्रकल्पांमुळे ही गर्दी विभागली गेली असू शकते.
 
कोरोनानंतर अनेक कंपन्यांकडून लोकांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेही एक कारण असू शकतं. पण याबाबत ठोस कारणं सांगता येणार नाहीत, असंही रेल्वे प्रशासनाला वाटतं.
 
ही गर्दी कमी झाली हे जरी खरं असलं तरी प्रवाशांचा प्रवास मात्र सुकर झालेला नाही. त्याचबरोबर लोकल प्रवासादरम्यान होणारे मृत्यूही थांबले नाहीत .
 
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, दरदिवशी पश्चिम रेल्वेवर 3 मृत्यू होतात.
 
2023 या वर्षात एकूण 936 मृत्यू झाले आहेत. त्याचबरोबर 984 लोक जखमी झाले आहेत. यानुसार दरदिवशी जवळपास 3 जणांचा मृत्यू होत असल्याचं दिसतंय.
 
यात फक्त प्रवास करताना नाही तर इतरही मृत्यूंचाही यात समावेश आहे.
 
पश्चिम रेल्वेवर अनेक मृत्यू हे रूळ ओलांडताना किंवा आत्महत्या अशा पद्धतीचे जास्त आढळून येतात, असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
डोंबिवलीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळच्यावेळी प्रचंड गर्दी गर्दी असते.
 
डोंबिवली सोडलं की, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा, याठिकाणी फारसे व्यवसायिक केंद्र नसल्यामुळे लोकांची उतरण्याची संख्या कमी आहे. त्याबरोबर या भागात नव्या वसाहतींमुळे लोकसंख्या वाढली आहे.
 
ज्या प्रवाशांना लोकलमध्ये चढायचे आहे, अशांना गर्दीमुळे चढता येत नाही. पण ज्यांना शक्य आहे ते प्रवासी या ट्रेनमध्ये चढतात.
 
कळवा स्टेशनला ट्रेन पोहोचेपर्यंत प्रवाशांची संख्या सरासरी पाच ते साडेपाच हजार इतकी वाढते, असं आकडेवारीतून समोर आलंय. त्याचबरोबर लोकल ट्रेन मुंब्र्यांकडून कळव्याकडे जाताना खाडीपूलावर वळण येत. त्यावेळी प्रवाशांचा भार एका बाजूला येतो. या वळणाचं अंतर सहा मिनिटांचं आहे.
 
त्यामुळे जे प्रवासी गर्दीमुळे दरवाज्याजवळ लटकत असतात त्यापैकी अनेकांना या खाडीपूलाजवळ तग धरणं कठीण जातं. त्यामुळे या पट्यादरम्यान मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असल्याची प्रवासी संघाचं म्हणणं आहे.
 
आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर 2022 आणि 2023 या दोन वर्षात फक्त मुंब्रा आणि कळवादरम्यान 31 जणांचे लोकल ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.
 
महिला प्रवाशांच्या मागण्या अपूर्णच आणि सुरक्षा वाऱ्यावर
रोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या एकूण प्रवासी संख्येपैकी 20-22% महिला प्रवासी प्रवास करतात. 1982 साली मध्य रेल्वेवर महिलांचा पहिला फर्स्ट क्लासचा डबा तयार करण्यात आला. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आली.
 
महिलांसाठी फर्स्ट क्लासचे डबे धरून एकूण पाच डबे राखीव असतात. पण त्यातही प्रवास करणं कठीण जातं.
 
महिला प्रवासी संघटनेच्या लता होर्डीकर सांगतात, “दहा बारा वर्षांपूर्वी प्रवासी महिलांची संख्या कमी होती. पण आता प्रत्येक महिला गरज म्हणून बाहेर पडतेय. ही संख्या वाढलीये. पण गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे फर्स्ट क्लासच्या डब्यात काहीही बदल झालेला नाही. 15 डब्यांच्या गाड्यांमध्ये दोन डबे महिलांसाठी वाढवण्यात आले आहेत. पण सर्व गाड्या 15 डब्याच्या नाहीत. जर सर्व गाड्या 15 डब्यांच्या झाल्या तर फरक पडू शकतो.”
 
महिला प्रवाश्यांसाठी विशेष महिला लोकल चालवल्या जातात.
 
1992 साली पश्चिम रेल्वेवर पहीली महिला विशेष लोकल सुरू करण्यात आली. त्यानंतर मध्य रेल्वेवर या महिला विशेष लोकलचा उपक्रम सुरू केला.
 
सध्या मध्य रेल्वेवर एकूण 4 आणि पश्चिम रेल्वेवर एकूण 10 महिला विशेष लोकल सुरू आहेत. त्या सर्व गाड्यांना मिळणारा प्रतिसाद हा चांगला असल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. पण एसी लोकलमध्ये महिला विशेष गाडी सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. त्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे.
 
महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सीसीटीव्ही कॅमेरे हे स्टेशन्सवर आणि महिला डब्यात लावण्यात आले आहेत. पण तरीही गर्दुले, पुरूष फेरीवाले यांचा त्रास होत असल्याचं काही महिलांचं म्हणणं आहे. अनेकदा टोल फ्री नंबरवर फोन केला तर तो उचलला जात नसल्याचीही तक्रार केली जाते.
 
याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पद भरती झाली नसल्यामुळे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे या तक्रारी होत असल्याचं बोललं जातंय. पण रेल्वे प्रशासनाकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
 
प्रकल्पांना विलंब, पण उत्तरं कोण देणार?
रेल्वेचं 2023-24 या वर्षाचं बजेट 2.44 लाख कोटी इतकं आहे. त्यापैकी 789 कोटी हे मुंबई उपनगरातील रेल्वे प्रकल्पाच्या विस्तारासाठी देण्यात आहेत.
 
अनेक प्रकल्प रखडल्यामुळे किंवा विलंब झाल्यामुळे लोकल ट्रेन प्रवाशांचे प्रश्न सुटत नसल्याचं चित्र आहे.
 
रेल्वे प्रवासी संघटनेचे केतन शहा सांगतात, "मुंबईच जगात नाव आहे, पण कोणातही राजकीय पक्ष असो त्यांनी मुंबई लोकलला तितक्याच ताकदीची पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही. हजारो कोटींचा महसूल सरकारला मुंबई लोकल ट्रेनमधून मिळतो. मग त्या प्रवाश्याचा विचार का केला जात नाही?
 
"खासदारांनी त्यांची सुरक्षा सोडून गर्दीच्या वेळी प्रवास करून दाखवावा. निवडणूकीच्या वेळी फक्त ट्रेनमधून सुरक्षारक्षक घेऊन प्रवास करण्याची शोबाजी केली जाते. तुम्ही कोस्टल रोड बनवू शकता, अंडरग्राऊंड मेट्रो करू शकता, मग 'एलिव्हेटेट रेल कॉरिडोअर' का करू शकत नाही? अनेक प्रकल्प रखडले आहेत. ते कधी मार्गी लावले जाणार आहेत, हे खासदारांनी आणि प्रशासनाने सांगावे."
 
2014 साली कल्याण-नवी मुंबई जोडण्यासाठी कळवा-ऐरोली एलिव्हेटेड कॉरिडोअर प्रकल्प हाती घेण्यात आला. जे प्रवासी कल्याण- डोंबिवलीहून नवी मुंबईकडे प्रवास करतात अश्या प्रवाशांना ठाणे स्टेशनवरून लोकल बदलावी लागते. त्यामुळे ठाणे स्टेशनवर प्रचंड गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी हा प्रकल्प मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून हाती घेण्यात आला होता.
 
2016 मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं. 9 वर्ष उलटूनही या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात आलेलं नाही.
 
या प्रकल्पात दिघा स्टेशनचे काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पाअंतर्गत येणार्या झोपटपट्टी रहिवाशांनी स्थलांतराला विरोध दर्शवला आहे. जोपर्यंत रहिवाश्यांचे स्थलांतर होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याचं मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं.
 
या प्रकल्पाची किंमत 420 कोटी इतकी आहे.
 
2015 साली विरार डहाणू चौपदरीकरणासाठी 3555 कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली. या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेचा विस्तार होईल आणि याचा फायदा पालघर, बोईसर आणि डहाणूवासियांना होणार आहे.
 
या प्रकल्पाचं इतक्या वर्षांनंतर 23% काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.
 
2015 साली तत्कालीन सुरेश प्रभू यांनी कर्जत स्टेशनची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पनवेल-कर्जत या नव्या मार्गिकेला मंजूरी दिली. 29.9 किमी या मार्गिकेवर पनवेल, चौक, मोहापे, चिखले ही स्टेशन्स असतील.
 
हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचं सांगितलं जात आहे.
 
हार्बर रेल्वेचे अंधेरी ते गोरेगाव या विस्तारित प्रकल्पाची घोषणा 2009 साली करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम 2017 साली पूर्ण करण्यात आले.
 
एप्रिल 2018 पासून प्रत्यक्षात हार्बर लोकल गोरेगावपर्यंत धावू लागली. आता या हार्बर मार्गिकेचा बोरीवलीपर्यंत विस्तार करण्याची योजना असून 825.58 कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. जून 2027 पर्यंत या प्रकल्पाचं विस्तारिकरण पूर्ण करण्याचा मानस आहे.
 
प्रवासी संघटनेचे मधू कोटियान सांगतात, "हे प्रकल्प घोषीत करण्यात आले आहेत. एका प्रकल्पाला 9-10 वर्ष लागतायेत. इतक्या मंद गतीने काम सुरू आहे. यामुळे प्रकल्पाच्या किमतीत हजारो कोटींची वाढ झाली आहे. कल्याणपर्यंत चार मार्गिका आहेत. पण कल्याणच्या पुढे कर्जत-कसारा या दोन मार्गिका होतात. त्यामुळे कल्याण स्टेशनवर लोड येतो.
 
"आम्ही या सगळ्या बाबी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून देतो, आम्ही निवेदनं देतो पण ते दिल्लीला या मागण्या कळवू सांगतात. आजपर्यंत एकदाही याचे लिखित उत्तर आलेले नाही. दिल्लीहून रेल्वे पाहणी पथक येतं. जे सुट्टीच्या दिवशी पाहणी करतं. सुट्टीच्या दिवशी पाहणी करून, लोकांशी चर्चा न करून तुम्ही काय अहवाल देणार? हा खरा प्रश्न आहे."
 
दररोज जीव मुठीत धरून वर्षानुवर्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांशीही आम्ही चर्चा केली. त्यांच्या काय अपेक्षा काय आहेत? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक निवडणुकीवेळी आमच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातात. पण प्रत्यक्षात खासदार मात्र निवडणूक येते तेव्हाच दिसतात. त्यानंतर आमच्या अपेक्षा हवेत विरतात ही नाराजी प्रवाशांमध्ये आहे.
 
पण प्रवाशांशी बोलताना, त्यांनी रेल्व मंत्रालय आणि स्थानिक खासदारांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या, त्या खालीलप्रमाणे :
 
गर्दीचं नियोजन करणं गरजेचं आहे.
लोकलच्या फेऱ्या वाढवल्या पाहीजेत.
एसी लोकल सर्व प्रवाश्यांना परवडत नसल्यामुळे एसी लोकलला साध्या लोकलचे डब्बे जोडले पाहीजेत.
टिटवाळा बदलापूर पंधरा डब्यांच्या गाड्या सुरू करा.
लेडीज फर्स्ट क्लासचे डबे मोठे करा. फर्स्ट क्लासच्या इतक्या छोट्या डब्यात गर्दीच्या वेळी सेकंड क्लासपेक्षा जास्त गर्दी असते.
अनेकदा टीसी उपलब्ध नसल्यामुळे फर्स्ट क्लासमध्ये तिकीट नसलेले किंवा सेकंड क्लासमधले अनेक लोक प्रवास करतात. त्यामुळे फर्स्ट क्लाससाठी जास्त पैसे मोजूनही सेकंड क्लाससारखा प्रवास करावा लागतो.
रात्री प्रवास करताना गर्दुल्यांचा किंवा नशेखोरांचा त्रास होतो. त्याकडे रेल्वे पोलीसांनी लक्ष देणं गरजेचं आहे.
जेष्ठ नागरिकांसाठी याआधी तिकीटात सूट होती. ती सूट पुन्हा दिली पाहिजे.
महिलांसाठी वाढीव स्वच्छतागृह आणि त्याच्या स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी.
एस्केलेटर्स अनेकदा बंद असतात. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना ब्रिज चढून जाण्यासाठी अडचणी येतात. त्याकडे लक्ष देण्यात यावं.
लोकल प्रवाशांच्या या अपेक्षा रास्त आहेत. पण मुंबईत लोकल ट्रेनऐवजी इतर प्रवासाचे पर्याय फारसे सोईस्कर का नाहीत?
 
याबाबत परिवहन तज्ञ अशोक दातार सांगतात, “लोकल ट्रेनने 75 लाख प्रवासी प्रवास करतात, तसेच बसने जवळपास 35 लाख प्रवासी रेज प्रवास करतात. मेट्रो-1 ने रोज जवळपास पाच लाख आणि मेट्रो 2 ने साधारण 3 लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. खासगी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त आहे पण ते तुलनेने महाग आणि ट्रॅफीकमुळे वेळखाऊ आहे. पार्कींकसाठी जागा नाही, पार्कींग मिळाली तर त्यासाठी कमीतकमी 200 रूपये मोजावे लागतात. हा खर्च प्रत्येकाला परवडत नाही.
 
“जर आपण सार्वजनिक वाहतूकीच्या तिकीट दराचा विचार केला तर लोकलच्या सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक किलोमीटरसाठी 20 पैसे मोजावे लागतात, फर्स्ट क्लाससाठी एका किलोमीटर मागे 2.85 पैसे लागतात. पासधारकांचा प्रवास यापेक्षा स्वस्त आहे. मेट्रोच्या तिकीटाचा दर पाहिला तर प्रत्येक किलोमीटरसाठी 3-4 रूपये लागतात.
 
“एसी लोकल या मेट्रो तिकीट दरांच्या तुलनेने स्वस्त आहेत. त्यामुळे स्वस्त दर, लोकलच्या सततच्या फेऱ्या, प्रवासासाठी लागणारा कमी वेळ या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईत लोकल ट्रेन ही सर्वात सोईस्कर आहे. पण गर्दीचं नियोजन करण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याशिवाय आणि लोकलमध्ये नव्याने तंत्रज्ञान विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही”.
 
निवडणूक येते तेव्हाच रेल्वे प्रवासी आठवतात?
मोदी सरकारमध्ये रेल्वे मंत्रालय सांभळलेले भाजप नेते पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून निवडणूक लढवत आहेत.
 
निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पियुष गोयल यांनी म्हटलं की, पश्चिम रेल्वे उपनगरात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी कठीण जातं. कारण कोकणात जाणाऱ्या गाड्या या ठराविकस्टेशनवरून सुटतात. त्यामुळे बोरिवलीतून कोकणात जाता यावे यासाठी लवकरच कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूक सेवा सुरू करण्यात येईल त्याचबरोबर हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंतचा विस्तार प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल.
 
मुंबई-ठाण्यातले बहुतांश उमेदवार रेल्वे प्रवाशांशी बोलताना दिसतायत. कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी महिला लोकल प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी महिलांना दिलं.