शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (20:17 IST)

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा, मिलिंद नार्वेकरांची बीबीसीला माहिती

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीबाबत बीबीसी मराठीने विचारले असता, ते म्हणाले "जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे. आम्ही डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहोत. जितेंद्र आव्हाड हे लवकरच बरे होऊन घरी येतील हा विश्वास आम्हाला आहे."
 
आव्हाड यांना मंगळवारी (21 एप्रिल) रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
मंगळवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांना अचानक खूप ताप आला आणि त्याचबरोबर श्वास घ्यायलादेखील त्रास होत होता. त्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण ज्यूपिटर हॉस्पिटलने मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याचं समजतं.
 
आव्हाड हे सध्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांच्या प्रकृतीबद्दल प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे. 'जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीला आराम मिळावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना,' असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही जितेंद्र आव्हाड त्यांच्या मुंब्र-कळवा या मतदारसंघात फिरत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांना कोव्हिड-19 ची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी १३ एप्रिलला घरी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं होतं.
 
त्यावेळी कोरोनाची चाचणी केली आहे आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण या क्वारंटाईन काळात आठव्या दिवशीच त्यांना ताप आणि श्वासाचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना तसंच आव्हाड यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोव्हिड-19 झाल्याचं समोर आलं होतं.
 
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत
जितेंद्र आव्हाड यांची मुलगी 16 मार्चला स्पेनहून भारतात आली. तिला कोव्हिडची लागण झाल्याचं आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने 15 एप्रिलला दिलं होतं.
 
पण हे वृत्त खोटं असल्याचा दावा आव्हाड यांच्याकडून करण्यात आला होता. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या वृत्तवाहिनीवर कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं.
 
"मी पूर्णपणे बरा असून सुरक्षितही आहे. माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे," असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी 15 एप्रिलला केलं होतं.
 
त्यांनी कोरोना चाचणी रिपोर्टही ट्वीट केला होता आणि काही चॅनेल्स त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांवर टीकेची झोड उठवली होती.
 
होम क्वारंटाईन असताना १७ एप्रिलला जितेंद्र आव्हाड यांनी भाडेकरूंसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. "भाड्याच्या घरात राहणार्‍या लोकांचं प्रमाण जास्त असून काहींना या कोरोनाच्या परिस्थितीत नियमित भाडे देणे शक्य नाही. यावेळी घरमालकांनी भाडे वसूली किमान ३ महिने पुढे ढकलावी आणि त्यांना घर सोडण्यास सांगू नये," असं आव्हाड यांनी म्हटलं होतं.
 
दरम्यान जितेंद्र आव्हाड सोलापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जागी आता दत्ता भरणेंना पालकमंत्री करण्यात आलं आहे.