शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (13:48 IST)

JNU आंदोलन: फ्री काश्मीरचं बॅनर झळकवणाऱ्या मुलीवर कारवाई होणार: गृहमंत्री

"मी काश्मिरी नाहीय. मी मुंबईत जन्मलीय, इथंच वाढलीय. काल माझ्या फोटोवरुन जे पसरवलं गेलं, तो मुर्खपणा आहे," असं स्पष्टीकरण फ्री काश्मीरचे पोस्टर झळकवलेल्या मुलीनं दिलं असलं तरी यावरून राजकारण पेटलं आहे.
 
या मुलीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सांगितलं.
 
मेहेकला स्पष्टीकरण द्यावं लागण्याचं कारण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटमध्ये आहे. फडणवीसांनी मेहेकचा ANI नं शेअर केलेला एक व्हीडिओ रिट्वीट केला आणि या सर्व वादाला तोंड फुटलं.
 
या व्हीडिओत मेहकच्या हातात 'फ्री काश्मीर'चा पोस्टर आणि गुलाबाचं फुल पकडून उभी असल्याची दिसते.
 
हाच व्हीडिओ रिट्विट करत फडणवीसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. फडणवीस म्हणतात, "नेमकं कशासाठी आंदोलन? 'फ्री काश्मीर'च्या घोषणा कशासाठी? फुटीरतावाद्यांना आपण मुंबईत सहन कसं करु शकतो? मुख्यमंत्री कार्यालयापासून दोन किलोमीटरवर आझादी गँगकडून 'फ्री काश्मीर'च्या घोषणा? उद्धवजी, तुमच्या जवळ घडणाऱ्या या भारतविरोधी मोहिमेला सहन करणार आहात?"
फडणवीसांनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्विटरवरुन महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.
 
आरोप-प्रत्यारोप सुरू
"मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ JNU च्या समर्थनासाठी आंदोलनं होतं, तिथं 'फ्री काश्मीर'चं फलक दाखवलं जातं आणि या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. मला भीती आहे की, ठाकरे सरकार याविरोधात कुठलीच कारवाई करणार नाही," असं किरीट सोमय्या म्हणाले.
 
या टीकेनंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या सहआयुक्तांकडे या पोस्टरबाबत तक्रार करुन तपासाचीही मागणी केलीय. या आंदोलनाला परवानगी होती की नाही, याबाबत चौकशीचीही मागणी सोमय्यांनी केली असून, चौकशीचं आश्वासन मुंबई पोलिसांनी त्यांना दिलंय.
 
या सर्व टीकांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "मी वृत्तपत्रांमध्ये वाचलं की, ज्यांनी 'फ्री काश्मीर'चे फलक पकडले होते, त्या आंदोलकांनी स्पष्टीकरणं दिलंय की, काश्मीरला इंटरनेट सेवा, मोबाईल सेवा आणि इतर गोष्टींपासून मुक्त करावं. मात्र, काश्मीरला भारतापासून स्वातंत्र्याची कुणी गोष्ट करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही."
 
राऊतांच्या प्रतिक्रियेला पुन्हा किरीट सोमय्यांनी उत्तर दिलंय. ते म्हणतात, "शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेटवे ऑफ इंडिया येथील भारतविरोधी 'काश्मीर को चाहिये आझादी' निदर्शनाचे समर्थन केले आहे. शिवसेनेला काश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती तडजोड करणार?"
 
'फ्री काश्मीर'चा फलक आणि गुलाबाचं फुल पकडून उभी असलेल्या मेहकवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत असताना, स्वत: मेहकनं पुढे येत स्पष्टीकरण दिलंय.
'त्या फोटोवरुन जे पसरवलं, ते चूक'
माझं नाव मेहेक मिर्झा प्रभू असं असून, मी लेखिका आहे, असं मेहेक तिच्या व्हीडिओत सांगते.
 
मुंबईत जन्म आणि तिथंच वाढलेली मेहेक सांगते "काल माझ्या फोटोवरुन जे घडलं, तो निव्वळ मूर्खपणा आहे. लोकांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या, त्या तर आणखी त्रासदायक होत्या. त्या फोटोवरुन जे पसरवलं गेलं, ते पूर्णपणे चुकीचं आहे."
 
"मी काश्मिरी नाहीय, मुंबईकर आहे," असं सांगत मेहक त्या दिवशीचा म्हणजेच 6 जानेवारीच्या आंदोलनाचा संपूर्ण वृत्तांत सांगते.
 
मेहक मिर्झा प्रभू
ती म्हणते, "सहा जानेवारीला संध्याकाळी सातच्या सुमारास मी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळील आंदोलनस्थळी पोहोचले. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या इतर अनेकजणांसारखंच मीही आंदोलनात सहभागी झाले. तिथं अनेक ग्रुप होते, कुणी गाणी गात होते, घोषणा देत होते."
 
पण मग 'फ्री काश्मीर'चं ते फलक हाती कसं आलं, ते कुठून आलं, ज्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये टीका-प्रतिटीका सुरु झाल्यात. त्याबाबतही मेहक सविस्तर सांगते.
 
'द्वेष पसरवू नका. एवढं घाबरुन आपण नको राहायला.'
"जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आम्ही तिथं उभे होतो. त्याबाबत बोलत होतो. तिथं फिरत असताना मला दिसलं की, काहीजण वेगवेगळ्या मुद्द्यांबाबत फलक रंगवत होते. तिथं बाजूला एक फलक पडलं होतं, त्यावर लिहिलं होतं, 'फ्री काश्मीर'.
"मी ते पाहिल्यावर, माझ्या मनात आलं की, आपण इथं आलोय ते घटनेनं दिलेल्या मूळ स्वातंत्र्याबाबत चर्चा करण्यासाठी. आणि इंटरनेट बंदीमुळं गेल्या पाच महिन्यांपासून हा हक्क काश्मीरपासून हिरावला गेलाय. ते आपले आहेत, असं आपण म्हणत असू, तर त्यांना मुलभूत हक्क मिळाले पाहिजेत. जसं आपल्याला मिळतायत. याच हेतूनं मी फलक उचलला. माझ्या हातात त्यावेळी फुलंही होती. त्याचा अर्थ असा होता की, सगळ्यांनी मिळून शांतता अबाधित ठेवूया. हा माझा एकमेव हेतू होता," असं मेहक म्हणते.
 
"फ्री काश्मीर लिहिलेल्या त्या फलकाचा अर्थ चुकीचा काढला गेला. मी कुठल्या तरी गटाशी संबंधित आहे, मला पैसे देऊन उभं केलंय, असे आरोप झाले. मात्र, तसं नाहीय," असंही स्पष्ट करत मेहक विनंती करते - 'द्वेष पसरवू नका. एवढं घाबरुन आपण नको राहायला.'