सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:26 IST)

जो बायडन : बराक ओबामांचे सहकारी ते अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष

पीटर बॉल
जो बायडन यांचा आज (20 जानेवारी) शपथविधी आहे. या शपथविधीनंतर ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष होतील,
 
वॉशिंग्टन डी. सी. मधल्या कॅपिटल इमारतीच्या पायऱ्यांवर शपथविधी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील.
 
जो बायडन हे परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन डीसी मधला अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जीभेवर साखर ठेवून बोलणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे.
आपल्या वकृत्व कौशल्याने ते चुटकीसरशी लोकांची मनं जिंकतात. बायडन यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी सहजपणे सामान्य माणसात मिसळतात. खाजगी आयुष्यात बायडन यांनी अनेक चढ-उतार पाहिलेत आणि अनेक संकटं झेलली आहेत. समर्थकांच्या मते या बायडन यांच्या जमेच्या बाजू आहेत.
 
पण विरोधकांच्या मते बायडन यांचं वय झालंय. राजकीय नेते म्हणून त्यांच्यातलं चातुर्य आता संपलेलं आहे. ते चिडखोर आहेत आणि आपल्या भाषणात गंभीर चुकाही करतात, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
कुशल वक्ता
जो बायडन यांचं निवडणूक प्रचाराशी जुनं नातं आहे. 47 वर्षांपूर्वी त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1973 साली ते सिनेट सदस्य म्हणून निवडून गेले होते, तर 1987 साली म्हणजे तब्बल 33 वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले होते.
त्यामुळे बायडन यांच्याकडे मतदारांना आकर्षित करण्याची कला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, त्यांची अडचण अशी आहे की, बोलण्याच्या ओघात ते अनेक गंभीर चुका करतात.
 
लोकांसमोर बोलताना बरेचदा ते भावनेच्या भरात वाहून जातात. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या त्यांच्या प्रयत्नात ते याच कारणामुळे लगेच बाहेर फेकले गेले होते. बायडन तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत.
 
1987 साली बायडन यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी आपल्या प्रचार सभांमध्ये ते सांगायचे, "माझे पूर्वज वायव्य पेन्सिल्वेनियामधल्या कोळशाच्या खाणीत काम करायचे." ते असंही सांगायचे की माझ्या पूर्वजांना ते करण्याची संधी कधीच मिळाली नाही ज्याच्यावर त्यांचा हक्क होता आणि याचं शल्य त्यांच्या मनात आहे.
मात्र, प्रत्यक्षात बायडन यांच्या पूर्वजांनी कधीच कोळसा खाणीत काम केलेलं नाही. नील किनॉक नावाच्या एका ब्रिटीश नेत्याची नक्कल करत त्यांनी ही खोटी कथा रचली होती. (अशाच प्रकारे त्यांनी इतरही अनेक नेत्यांची वक्तव्यं आपल्या नावावर खपवल्याचे आरोप आहेत.)
 
त्यांची अशी खोटी वक्तव्यं अमेरिकेच्या राजकारणात 'जो बॉम्ब' या नावाने (कु) प्रसिद्ध आहेत.
 
2012 साली आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी बढाया मारताना एका प्रचारसभेत ते बोलून गेले, "मित्रांनो, मी आठ राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे आणि त्यापैकी तिघांशी माझे जवळचे संबंध (intimate) होते." मात्र, बोलण्याच्या ओघात intimately शब्द वापरल्याने तीन राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांचे शारीरिक संबंध होते असा अर्थ ध्वनित झाला.
 
बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ते उपाध्यक्ष होते. त्यावेळी 'आम्ही अर्थव्यवस्थेबाबत चुका करण्याची शक्यता तीस टक्के असल्याचं' म्हणत त्यांनी लोकांना धडकी भरवली होती.
 
बायडन ओबामांविषयी बोलताना म्हणाले होते, "ओबामा मुख्य प्रवाहातील पहिले असे आफ्रिकन-अमेरिकी नागरिक आहेत जे उत्तम वक्ते आहेत, चमकदार आणि स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि दिसायलाही देखणे आहेत." यावरून बराच वाद झाला होता. मात्र, तरीही ओबामा यांनी त्यांना उपाध्यक्ष केलं.
अशाप्रकारची वक्तव्य करूनसुद्धा बायडन यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये बरेच लोकप्रिय होते. मात्र, एका कृष्णवर्णीय मुलाखतकाराला दिलेल्या मुलाखतीत बायडन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.
 
शार्मलेन थॉ गॉड यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "ट्रम्प आणि मी यापैकी कुणाची निवड करायची, असा पेच तुम्हाला पडत असेल तर तुम्ही कृष्णवर्णीय नाही."
 
बायडन यांच्या या बेताल वक्तव्यावर अमेरिकेच्या प्रसार माध्यमांमधून बरीच टीका झाली. बायडन यांच्या निडवणूक प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या टीमला लोकांना हे समजवून सांगण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले की बायडन कृष्णवर्णीय मतदारांना कमी लेखत नाहीत.
 
बायडन यांच्या अशाच बेताल वक्तव्यांमुळेच न्यूयॉर्क मॅगझिनच्या एका पत्रकाराने लिहिलं होतं, "बायडन यांनी बेताल बोलू नये, यावरच त्यांची संपूर्ण प्रचार मोहिम केंद्रित झाल्याचं जाणवतं."
प्रचार मोहिमांचा अनुभव असणारे नेते
बायडन आपल्या भाषणांमध्ये अशी बेताल वक्तव्यं करत असले तरी त्यांचे वक्तृत्व उत्तम आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येक शब्द तोलून मापून एखाद्या रोबोटप्रमाणे बोलणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आजच्या भाऊगर्दीत बायडन आजही स्वयंस्फूर्तीने बोलतात.
 
 
बायडन सांगतात की, लहानपणी ते तोतरं बोलायचे. त्यामुळे त्यांना टेलिप्रॉम्प्टवर लिहिलेलं वाचणं अवघड जातं आणि म्हणूनच मी जे बोलते ते मनापासून बोलतो.
 
जो बायडन यांच्या भाषणात अशी काही जादू आहे ज्यामुळे ब्लू कॉलर नोकरीपेशा वर्गात उत्साह संचारतो. भाषणानंतर बायडन अगदी सहजपणे समोरच्या गर्दीत मिसळतात. कुणाशी हस्तांदोलन करतात, कुणाच्या पाठीवर थाप देतात, कुणाची गळाभेट घेतात. सेल्फी काढतात. भाषणानंतर श्रोत्यांमधला त्यांचा वावर एखाद्या वृद्ध रॉकस्टारसारखा असतो, जो बरेच दिवसांनंतर आपल्या चाहत्यांसमोर आला असावा.
 
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री आणि अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीत असणारे जॉन केरी न्यूयॉर्कर मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत बायडेनविषयी म्हणाले होतं, "बरेचदा लोक त्यांच्या भाषणामुळेच भारावून त्यांच्याकडे आकर्षित होतात. मात्र, काही वेळा ते स्वतःच लोकांना ओढून त्यांची गळाभेट घेतात. ते मन जिंकणारे नेते आहेत. ते बनावट नाही. ते कसलंच ढोंग करत नाहीत. अगदी सहजपणे लोकांमध्ये मिसळतात."
 
बायडन यांच्यावरचे आरोप
गेल्यावर्षी आठ महिलांनी पुढे येत जो बायडन यांच्यावर असभ्य स्पर्श, आलिंगन आणि चुंबन घेण्याचे आरोप केले होते. तसंच अमेरिकेतल्या काही न्यूज चॅनेल्सने जो बायडन यांच्या काही क्लिप्स दाखवल्या होत्या ज्यात ते सभांमध्ये महिलांशी अगदी जवळून संवाद साधत असल्याचं दिसतंय. या क्लिप बघितल्यावर ते काही महिलांच्या केसांचा वास घेत आहेत, असंही वाटतं.
या आरोपांचं उत्तर देताना जो बायडन यांनी म्हटलं की, आपण भविष्यात महिलांशी बोलताना अधिक खबरदारी बाळगू.
 
मात्र, तारा रिड नावाच्या एका महिलेने बायडन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तीस वर्षांपूर्वी बायडन यांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांनी आपला लैंगिक छळ केला होता, असं रिड यांचं म्हणणं आहे.
 
या आरोपाचं बायडन यांनी खंडन केलं होतं. त्यांच्या प्रचार टीमनेही असं काही घडलं नसल्याचं याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
मात्र, डझनभराहूनही अधिक महिलांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, असा युक्तिवाद बायडन यांचे समर्थकही करू शकतात.
 
अमेरिकेत #MeToo आंदोलन सुरू झालं तेव्हापासून बायडनसह डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांचा यावर भर राहिला आहे की समाजाने स्त्रियांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशावेळी बायडेन यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देऊन ते नाकारण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यामुळे महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्यांची निराशा होऊ शकते.
 
एका मुलाखतीत तारा रीड यांनी म्हटलं, "बायडन यांचे सहकारी माझ्याविषयी अतिशय अश्लाघ्य भाषेत बोलतात. सोशल मीडियावरही माझ्याविषयी भयंकर बोलत आहेत."
 
"ते स्वतः बोललेले नाहीत. मात्र, त्यांच्या प्रचारात जे सांगितलं जातं की त्यांच्याजवळ जाणं सुरक्षित आहे तर ते तसं नाही. हा शुद्ध दांभिकपणा आहे."
जो बायडन यांच्या प्रचार टीमने हे आरोप फेटाळले आहेत.
 
चुका टाळणे
सामान्यांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे पूर्वी बायडेन यांना त्रासही झाला आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांना वाटतं की त्यांच्या याच स्वभावाचा यावेळी फायदा होईल आणि ते आपल्या जुन्या चुकांच्या जंजाळातून बाहेर येतील.
 
अमेरिकेच्या राजकारणाचा बायडन यांना प्रदीर्घ अनुभव आहे. वॉशिंग्टनमध्ये ते दीर्घकाळापासून सक्रीय आहेत. अमेरिकी संसदेचं वरिष्ठ सभागृह असणाऱ्या सिनेटमध्ये बायडन तीन दशकांपासून सक्रीय आहेत. शिवाय बराक ओबामा यांच्या कार्यकाळात ते तब्बल 8 वर्ष उपाध्यक्ष होते. राजकारणात एवढा दांडगा आणि दीर्घ अनुभव फार कमी लोकांच्या नशीबात असतो.
 
अल् गोर (अमेरिकी संसदेचं कनिष्ठ सभागृह असणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 8 वर्षांचा अनुभव, सिनेमध्ये 8 वर्षांचा अनुभव आणि 8 वर्ष उपाध्यक्ष पदाचा अनुभव), जॉन केरी (सिनेटमध्ये 28 वर्षांचा अनुभव) किंवा मग हिलेरी क्लिंटन (फर्स्ट लेडी म्हणून 8 वर्षांचा अनुभव, सिनेटमध्ये 8 वर्षांचा अनुभव आणि 4 वर्ष परराष्ट्र मंत्रीपदाचा अनुभव)...डेमोक्रेटिक पक्षाच्या या सर्व अनुभवी नेत्यांना त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांकडून पराभव पत्कारावा लागला होता.
अमेरिकन मतदारांनी अनेकदा सिद्ध केलं आहे की ते त्याच नेत्याला प्राधान्य देतात जो नेता हा दावा करतो की जो वॉशिंग्टनच्या राजकारणाचा भाग नाही आणि वॉशिंग्टनच्या विद्यमान व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरला आहे. स्वतःला आउटसाइडर किंवा वॉशिंग्टनच्या राजकारणाबाहेरचा असल्याचं सांगणारा नेताच बहुतेकदा लोकांच्या पसंतीला उतरत असतो.
 
अमेरिकेच्या सर्वोच्च राजकारणात जवळपास 50 वर्ष घालवणारे बायडन मात्र हा दावा कधीच करू शकत नाहीत आणि म्हणूनच राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव हा बायडेन यांच्याविरोधातला मुद्दा बनणार का अशीही चर्चा होती.
राजकीय इतिहासाचे साक्षीदार
गेल्या काही दशकात अमेरिकेच्या राजकीय इतिहासात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे बायडन स्वतः साक्षीदार राहिलेत किंवा त्यावर त्यांनी भाष्य तरी केलं आहे. मात्र, बायडन यांनी त्या काळात जे निर्णय घेतले ते कदाचित या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार नाहीत.
अमेरिकी मुलांमधला वर्णद्वेष कमी करण्यासाठी 1970 च्या दशकात त्यांना सहशिक्षण म्हणजेच एकत्र शिकवण्याची कल्पना मांडण्यात आली होती. त्यावेळी बायडन यांनी या कल्पनेला विरोध करणाऱ्यांची साथ दिली होती. त्यावेळी दक्षिण अमेरिकेतल्या राज्यांमधल्या पालकांचा आपल्या मुलांना बसमध्ये बसवून कृष्णवर्णीयबहुल भागांमधल्या शाळेत पाठवयाला विरोध होता.
 
यावर्षीच्या निवडणूक प्रचारादरम्यान बायडन यांच्या त्या भूमिकेवरून त्यांना वारंवार लक्ष करण्यात आलं.
 
रिपब्लिकन पक्षाचे नेते कायम बराक ओबामा यांच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री असलेले रॉबर्ट गेट्स यांच्या वक्तव्याचा हवाला देतात. रॉबर्ट गेट्स म्हणाले होते, "जो बायडन न आवडणं अशक्य आहे. मात्र, अडचण अशी आहे की गेल्या चार दशकांमध्ये परराष्ट्र धोरण असो किंवा देशाच्या सुरक्षेविषयीचे मुद्दे या सर्व बाबतीत बायडेन कायम चुकीच्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले आहेत."
 
कौटुंबिक संकटं
बायडन यांच्यावर अनेक कौटुंबिक संकटं कोसळली आहेत.
बायडन पहिल्यांदा सिनेटची निवडणूक जिंकून शपथग्रहणाची तयारी करत होते त्यावेळी त्यांच्या पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांची दोन्ही मुलं बो आणि हंटर गंभीर जखमी झाली होती.
 
त्यानंतर 2015 साली बो यांचं वयाच्या 45 व्या ब्रेन ट्युमरने निधन झालं.
 
इतक्या कमी वयात जवळची माणसं गमावल्यामुळे अनेकांना त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. लोकांना वाटतं की, एवढे मोठे राजकारणी असूनही आणि सत्तेच्या इतक्या जवळ असूनही बायडन यांना वैयक्तिक आयुष्यात ती दुःख भोगावी लागली जी सामान्य माणसंही भोगत असतात.
 
मात्र, बायडन यांच्या कुटुंबाची दुसरी कहाणी याहून पूर्णपणे वेगळी आहे. विशेषतः त्यांचा मुलगा हंटर यांची.
सत्ता, भ्रष्टाचार आणि खोटेपणा
जो बायडन यांचा मुलगा हंटर यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लॉबिंगचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाने त्यांचं आयुष्य बेलगाम झालं.
 
हंटर यांना दारू आणि ड्रग्जच व्यसन असल्याचं आणि ते स्ट्रीप क्लबला जात असल्याचं म्हणत त्यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कोकेन सेवनाप्रकरणी दोषी आढळल्यानंतर अमेरिकी नौदलाने त्यांना नोकरीवरून बेदखल केलं होतं.
न्यूयॉर्कर मॅगेझिनला दिलेल्या एका मुलाखतीत हंटर यांनी एका चिनी उद्योजकाने आपल्याला हिरा भेट केल्याचं मान्य केलं होतं. यानंतर चीन सरकारने त्या उद्योजकावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली होती.
 
हंटर यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची जी माती केली त्याचा फटका बायडन यांच्या राजकीय जीवनालाही बसला. गेल्याचवर्षी हंटर यांनी जेमतेम आठ दिवसांपूर्वी ओळख झालेल्या मुलीशी लग्न केलं. इतकंच नाही तर बायडेन यांच्या गडगंज उत्पन्नावरूनही बायडन यांना लक्ष्य केलं जातं.
 
व्यसनाधीनतेच्या समस्येचा सामना करणाऱ्यांप्रती अनेक अमेरिकी नागरिकांना सहानुभूती असते, तशी ती हंटर यांच्याप्रतीही असू शकते. मात्र, त्यांनी ज्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या केल्या त्यावरून हेदेखील सिद्ध होतं की बायडनसारख्या उच्चपदस्थ राजकीय नेत्यांच्या मुलांना ते व्यसनी असूनही कशाप्रकारे मोठ-मोठ्या नोकऱ्या मिळतात.
 
महाभियोग
हंटर यांनी गलेलठ्ठ पगाराच्या ज्या नोकऱ्या केल्या त्यापैकी एक युक्रेनमधली होती. बायडन यांच्या मुलाच्या या नोकरीवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांवर हंटर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, असा दबाव आणला होता.
युक्रेनच्या अध्यक्षांना केलेल्या या फोनकॉलमुळेच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग खटल्याची सुरुवात झाली होती. मात्र, ही राजकीय खेळी ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून खाली खेचण्यात अपयशी ठरली. कदाचित बायडन यांना वाटत असावं की, या राजकीय दलदलीत अडकलो नसतो तर बरं झालं असतं.
 
परराष्ट्रविषयक घडामोडी
बायडन यांचा प्रदीर्घ डिप्लोमॅटिक अनुभव बघता परदेशाशी संबंधित कुठलाही घोटाळा बायडन यांचं मोठं राजकीय नुकसान करणारा ठरू शकतो. बायडन सिनेटच्या परराष्ट्रविषयक समितीचे माजी अध्यक्ष आहेत. शिवाय, ते कायमच अशी फुशारकी मारत असतात की, गेल्या 45 वर्षांत मी जवळपास सर्वच बड्या जागतिक नेत्यांना भेटलो आहे.
 
राष्ट्राध्यक्षपदासाठी बायडन यांच्या गाठीशी पुरेसा अनुभव असल्याचं अमेरिकेच्या मतदारांना वाटत असलं तरी या आधारावर किती मतदार त्यांच्या पारड्यात मत टाकतील, हे मात्र सांगता येत नाही.
 
बायडन 1991 च्या आखाती युद्धाच्याविरोधात होते, तर 2003 साली इराक युद्धाच्या बाजूने होते. मात्र, पुढे इराकमध्ये अमेरिकी हस्तक्षेपावर त्यांनी कडाडून टीकाही केली आहे.
 
अशा मुद्द्यांवर बायडन यांनी कायमच सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकी कमांडोंनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानात दडून बसलेला अतिरेकी ओसामा बिन लादेन ठार झाला होता. मात्र ही कारवाई करू नये, असा सल्ला त्यावेळी बायडन यांनी ओबामा यांना दिला होता.
 
विशेष म्हणजे अल-कायद्याचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला जो बायडनशी फार काही घेणंदेणं नव्हतं किंवा बायडन त्याच्या खिजगणतीतही नव्हते, असं म्हणता येईल. अमेरिकी गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएने लादेनशी संबंधित काही दस्तावेज सार्वजनिक केले होते. त्यात लादेनने आपल्या अतिरेक्यांना बराक ओबामा यांना लक्ष्य करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यात जो बायडन यांचा उल्लेख कुठेच नव्हता.
त्यावेळी बायडन अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. लादेनला वाटायचं की, ओबामा यांच्या हत्येनंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा बायडन यांच्या हाती जाईल. मात्र, लादेनच्या मते, बायडन ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम नव्हते आणि ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर मोठं राजकीय संकट निर्माण होईल.
 
अनेक विषयांवर बायडन यांची मतं डेमोक्रेटिक पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांपेक्षा वेगळी आहेत. डेमोक्रेटिक पक्षाच्या या तरुण समर्थकांना बर्नी सँडर्स किंवा एलिझाबेथ वॉरेन यांच्यासारख्या नेत्यांचे कट्टर युद्धविरोधी विचार जास्त भावतात. अनेक अमेरिकी नागरिकांना असंही वाटतं की बायडेन जरा जास्तच शांतीदूत असल्याचं दाखवतात.
 
हे तेच अमेरिकी नागरिक आहेत ज्यांनी यावर्षी जानेवारीत ड्रोन हल्ल्याद्वारे इराणी जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या करण्याचा आदेश देण्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं उघडपणे समर्थन केलं होतं.
 
परराष्ट्र विषयक मुद्द्यांवर बायडन यांची भूमिका मध्यममार्गी राहिली आहे. त्यामुळे बरेचसे डेमोक्रेटिक कार्यकर्ते खट्टू झाले होते. मात्र, बायडन यांना वाटलं की अशाप्रकारे मध्यममार्ग स्वीकारल्यामुळे ते त्या मतदारांना आकर्षित करू शकतील जे ट्रम्प आणि बायडन यापैकी कुणाला निवडावं, या द्विधेत आहेत.
 
आजपासून चार वर्षांपूर्वी 2016 साली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं रहायचं की नाही, या पेचात असताना बायडन म्हणाले होते, "मी मरेन तेव्हा माझ्या मनात ही सल अजिबात असणार नाही की मी राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो नाही."
 
आता बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.