बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (18:32 IST)

सोनाली शिंगटे : पायाला वजनं बांधून पळणाऱ्या मुलीचा राष्ट्रीय कबड्डीपटू बनण्याचा प्रवास

भारताची आघाडीची कबड्डीपटू सोनाली विष्णू शिंगटे हिने जेव्हा प्रशिक्षण सुरू केलं, तेव्हा तिच्याकडे बूटही नव्हते आणि ते विकत घेण्याची तिच्या कुटुंबाची परिस्थितीही नव्हती.
 
पण तिच्यासमोर एवढं एकमेव आव्हान नव्हतं. तिला 100 मीटर्स धावण्यासाठीही धडपड करावी लागायची.
 
पाय आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी तिला धावावं लागत होतं. पायाला वजन बांधून धावावं, व्यायाम करावा लागत होता.
 
या सगळ्या मेहनतीनंतर किंवा संध्याकाळचे सामने झाल्यानंतर सकाळी होणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तिला मध्यरात्री उठावं लागत होतं.
 
कोणत्याही परिस्थितीत खेळाचा अभ्यासावर परिणाम होऊ द्यायचा नाही, असं तिच्या कुटुंबीयांनी बजावलं होतं.
 
अभ्यासाबद्दलचा आग्रह सोडला, तर सोनालीच्या कुटुंबाने आहे त्या परिस्थितीत कायमच तिला पाठिंबा दिला.
 
सोनालीचे वडील हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. तिची आई खानावळ चालवायची.
 
नंतर सोनालीनं भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला विजयही मिळवून दिला.
 
क्रिकेटकडून कबड्डीकडे...

सोनाली शिंगटे हिचा जन्म 27 मे 1995 साली मुंबईतल्या लोअर परळ इथं झाला. तिने महर्षी दयानंद कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं.
 
लहानपणी तिला क्रिकेटमध्ये खूप रस होता, पण सोनालीच्या कुटुंबाला क्रिकेट खेळण्यासाठी तिला पाठिंबा देणं परवडणारं नव्हतं.
 
नंतर तिनं कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर अक्टिव्हिटी म्हणून कबड्डी खेळायला सुरूवात केली. पण त्याकडे ती फार गांभीर्यानं पाहत नव्हती.
 
कॉलेजच्या दिवसात तिनं राजेश पडावे यांच्याकडे कबड्डीचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. ते तिथल्या स्थानिक शिव शक्ती महिला संघाचे प्रशिक्षक होते.
 
पडावे यांनीच तिला बूट दिले आणि इतर सामानही. सोनालीला कठोर प्रशिक्षण घ्यावं लागलं.
 
आपल्या कुटुंबासोबतच सोनाली तिचे प्रशिक्षक तसंच संघातील गौरी वाडेकर आणि सुवर्णा बारटक्के यांसारख्या सीनिअर खेळाडूंनाही आपल्या यशाचं श्रेय दिलं.
 
आतापर्यंतची कामगिरी

काही वर्षांतच सोनाली शिंगटे यांना वेस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. तिथेच प्रशिक्षक गौतमी अरोसकर यांनी सोनालीला तिची कौशल्य सुधारायला मदत केली.
 
2018 मधली फेडरेशन कप टूर्नांमेंट सोनाली शिंगटे हिच्यासाठी 'टर्निंग पॉइंट' ठरली. त्यावेळी ती इंडियन रेल्वे संघाचा भाग होती. त्यावेळी इंडियन रेल्वेनं हिमाचल प्रदेशचा पराभव केला होता. याच हिमाचल प्रदेशनं 65 व्या राष्ट्रीय कबड्डी विजेतेपद स्पर्धेत रेल्वेचा पराभव केला होता.
 
ही स्पर्धा सोनाली शिंगटेसाठी महत्त्वाची ठरली कारण या स्पर्धेनंतर तिची भारतीय राष्ट्रीय प्रशिक्षण कँपसाठी निवड झाली. त्यानंतर जकार्ता इथं झालेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघातही तिची निवड झाली.
 
जकार्तामध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती भाग होती आणि याच संघाने 2019 साली काठमांडू इथं झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. ही दोन पदकं सोनालीसाठी खूप मोठं यश वाटतं.
 
महाराष्ट्र सरकारनं सोनालीच्या कबड्डीमधील कामगिरीची दखल घेऊन शिव छत्रपती पुरस्कारानं तिचा सन्मान केला.
 
पुढच्याच वर्षी 67 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सोनालीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आलं.
 
सोनाली शिंगटे हिला आता आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सामन्यांमध्ये खेळून भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे.
 
भारतात महिला कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरुषांच्या प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महिलांसाठीही व्यावसायिक कबड्डी लीग सुरू करावी अशी सोनाली शिंगटे यांचं म्हणणं आहे.
 
(हा लेख सोनाली विष्णु शिंगटे ईमेलद्वारे बीबीसीला दिलेल्या उत्तरांवर आधारित आहे.)