मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (16:43 IST)

कंगना राणावत - उर्मिला मातोंडकर वाद : 'भाजपला खूष करण्याच्या नादात माझ्यावर 25-30 केसेस आल्या'

उर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत पुन्हा एकदा आमने-सामने आल्या आहेत. दोघींमध्ये मुंबई, महाराष्ट्रावरून रंगलेलं शाब्दिक युद्ध सर्वांनी पाहिलंय. यावेळी मात्र, हा वाद सुरू झालाय उर्मिला यांनी खरेदी केलेल्या जागेवरून.
 
उर्मिला यांच्या एका खरेदी व्यवहाराववर कंगनाने निशाणा साधला आहे. मग, उर्मिला यांनी ही कंगनाला 'जागा मेहनतीच्या पैशाने घेतली' असं उत्तर दिलं आहे.
 
नेमका वाद काय आहे?
उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईत ऑफिससाठी जागा खरेदी केली. 'पिंकविला' या वेबसाइटने ही बातमी दिली.
 
ज्यात, शिवसेनेत शामिल झाल्यानंतर उर्मिला यांनी काही आठवड्यातच मोक्याच्या ठिकाणी 3 कोटी रूपयांना जागा खरेदी केल्याचं म्हटलंय.
'पिंकविला'च्या या रिपोर्टनंतर कंगना राणावत यांनी ट्विटरवरून उर्मिला यांच्यावर निशाणा साधला. कंगना यांनी ही बातमी ट्विटरवर शेअर केली. ज्यानंतर उर्मिला-कंगना वादाचा दुसरा अध्याय सुरू झाला.
 
कंगना राणावत यांचा हल्ला
 
कंगना ट्विटरवर म्हणतात, "उर्मिलाजी. मी स्वत:च्या मेहनतीने बनवलेलं घर कॉंग्रेस तोडून टाकत आहे. खरंच, भाजपला खूष करण्याच्या नादात माझ्या हाती 25-30 केसेस आल्या. मी तुमच्यासारखी समजुद्दार असते तर, कॉंग्रेसला खूष केलं असतं. किती मूर्ख आहे मी, नाही का?"
जागेच्या वादावर उर्मिलाची प्रतिक्रिया
उर्मिला यांनी खरेदी केलेल्या जागेची बातमी 'मुंबई मिरर' वृत्तपत्रानेही छापली आहे.
 
याबाबत आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांनी एक व्हीडीओ जारी केला.
 
त्या म्हणतात, "ही बातमी अर्धसत्य आहे. चुकीच्या पद्धतीने छापण्यात आली आहे. मार्च महिन्यात मी अंधेरीतील घर विकलं. पण लॉकडाऊनमुळे मला काही विकत घेता आलं नाही. या पैशातूनच हे ऑफिस खरेदी करण्यात आलं आहे. यासंबंधी सर्व कागदपत्र रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये उपस्थित आहेत."
"माझं मनोबल तोडण्याचा प्रयत्न होत असेल तर हे शक्य नाही. मी खोटं काम कधीच केलं नाही आणि करणार नाही," असं त्या पुढे म्हणतात.
"जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. मी सर्व कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी येईन. बॉलीवूडमध्ये 25-30 वर्षं मेहनत केल्यानंतर मी अंधेरीत विकत घर विकत घेतलं. हा फ्लॅट मार्च महिन्याच्या सुरूवातीला मी विकला. या मेहनतीच्या पैशातूनच ऑफिस विकत घेतलं आहे," असा पलटवार उर्मिला मातोंडकर यांनी केला.
 
"राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर मी घर विकत घेतलं होतं. हे तुम्हाला जरूर दाखवायचं आहे."
 
कंगना राणावत यांच्यावर पलटवार करताना उर्मिला मातोंडकर यांनी केंद्र सरकारतर्फे कंगनाला देण्यात आलेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
उर्मिला पुढे म्हणतात, "आमच्यासारख्या लाखो टॅक्स भरणाऱ्यांच्या पैशातून सरकारने तुम्हाला 'Y' प्लस सुरक्षा दिली आहे. कारण, नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोला अनेक नावं देण्याचं तुम्ही आश्वासनं दिलं होतं. या नावांची वाट संपूर्ण देश पहातो आहे. माझी विनंती आहे की तुम्ही ही लिस्ट घेऊन यावं. तुमच्या उत्तराची मी वाट पाहत आहे."
 
शिवसेना विरुद्द कंगना वादानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कंगना राणावत यांना सुरक्षा दिली होती.
 
'हे तर भाजपचेच षडयंत्र'
उर्मिला-कंगनाच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. 'महाराष्ट्रद्रोही भाजपचा खरा चेहरा समोर आणल्याबद्दल कंगनाचे अभिनंदन करायला हंव.' असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
"कंगना सर्वकाही भाजपच्या सांगण्यावरून करत होती याचा कबुलीनामा स्वत: कंगनाने दिला आहे." हे भाजपचे षडयंत्र होते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
 
कंगनाच्या ट्विटनंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. सचिन सावंत यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
 
ते म्हणाले, "कंगनाच्या ट्विटवरून हे स्पष्ट होत आहे की सर्व कारस्थान भाजपचे होते. महाराष्ट्राची बद्नामी, पाकव्याप्त काश्मिरसोबत मुंबईची तुलना करणे, पोलिसांवर टीका करणे, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे हे सर्व कारस्थान भाजपने रचले होते हे आता स्पष्ट होत आहे. कंगनाची स्क्रिप्ट भाजपने तयार केली होती हे सुद्धा स्पष्ट होत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत."
 
उर्मिला-कंगना वाद
सप्टेंबर महिन्यात बॉलीवूडच्या या दोन अभिनेत्रींमध्ये याआधीही शाब्दिक युद्ध रंगलं होतं.
 
कंगना यांनी महाराष्ट्राची तुलना 'पाकव्याप्त' काश्मीरसोबत केली होती. 'फक्त कृतघ्नच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीराशी करू शकतात,' असं म्हणत उर्मिला यांनी कंगना यांच्या वक्तव्यावर टीका केली होती.
 
महाराष्ट्र ड्रग्जचं केंद्र बनलाय असं कंगना म्हणाल्या होत्या. त्यानंतर उर्मिला यांनी, ड्रग्जचा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे. कंगनाने हिमाचलमधून ही लढाई सुरू करावी असं वक्तव्य केलं होतं.