बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

कन्हैया कुमारने खरंच हनुमानाचा अपमान केला आहे का? फॅक्ट चेक

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बेगुसरायचे उमेदवार कन्हैया कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी हिंदू देवता हनुमानाचा अपमान केल्याचा दावा करण्यात येत आहे.
 
या 25 सेकंदांच्या व्हीडिओमध्ये कन्हैया बोलताना दिसत आहेत, "हनुमान हा कष्टकरी वर्गाचा देव आहे. तुम्हाला तो कुठेही दिसतो. त्याने दुसऱ्याच्या बायकोसाठी लंका जाळली. सुग्रीव रामाचा मित्र होता. त्याला फसवण्यासाठी ते तयार झाले होते."
 
चौकीदार स्क्विंटी नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हीडिओ एका कॅप्शनसकट ट्विट केला आहे. "हनुमानाने दुसऱ्याच्या बायकोसाठी लंका जाळली असं म्हणणं अपमानास्पद आहे. हा फक्त हिंदूच नाही तर स्त्रियांचाही अपमान आहे. हे लोक स्त्रियांवर अत्याचार होताना पाहतात." या ट्विटर पेजवर हा व्हीडिओ 50,000 पेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. तो हजारपेक्षा अधिक वेळा फेसबुक आणि ट्विटरवर शेअर झाला आहे.
 
हा दावा गोंधळात टाकणारा आहे असं आमच्या लक्षात आलं.
 
कन्हैया कुमार यांनी या व्हीडिओत बोललेली वाक्य खरी आहेत. मात्र ती वेगळ्या अर्थाने वापरलेली आहेत. त्यांच्या व्हायरल क्लिपमधील काही भाग दाखवण्यात आला आहे.
 
वास्तव
ही 25 सेकंदांची व्हायरल क्लिप कन्हैया यांच्या एका भाषणातून घेतली आहे. ही क्लिप News Of Bihar या नावाने 30 मार्च 2018 ला अपलोड करण्यात आली आहे. यू ट्यूब पेजनुसार कुमार यांनी साडे नऊ मिनिटांचं एक मोठं भाषण मोतिहारीत दिलं होतं. तेव्हा ते All India Student's Federation (AISF) चे सदस्य होते. ही संस्था कम्युनिस्ट पक्षाशी निगडीत संस्था आहे.
 
मोठ्या क्लिपमध्ये काय म्हणाले...
 
"हनुमानाने दुसऱ्याच्या बायकोसाठी संपूर्ण लंका जाळली आणि इथे हनुमानाच्या नावाखाली लोकांची घरं जाळली जातात. या देशात रामाची परंपरा जपली जाते. सावत्र आईसाठी आयुष्यातल्या सर्व सुखांचा त्याग करण्याचीही तयारी इथल्या लोकांची असते."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणतात, "योगीजी जंगलातून भगवी वस्त्र घालून आले आहेत. आता त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते रामाचं भक्त असल्याचं सांगतात. रामाने आपली गादी सोडली आणि तो वनवासात गेला. हा फरक तुम्ही समजून घेण्याची गरज आहे."
 
हिंदू-मुस्लीम यांच्यातल्या संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणतात, "रामाला त्याच्या मैत्रीपेक्षा नैतिकता जास्त महत्त्वाची होती. मात्र या लोकांनी रामाच्या नावाखाली सर्व सीमा आखल्या आहेत." पण खोडसाळपणे हा व्हीडिओ एडिट करून त्यांनी देवाचा किंवा स्त्रियांचा अपमान केलाय असं दाखवण्यात आलं आहे.
 
त्यामुळे व्हीडिओत दाखवण्यात आलेला कन्हैयाकुमार यांचा हा दावा दिशाभूल करणारा आहे.