1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

काश्मीर : बस दरीत कोसळली, 30 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती

kashmir bus accident
- रियाज मसरूर
काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यामध्ये आज सकाळी एक मिनी बस दरीमध्ये कोसळली.
 
या घटनेत तीसहून अधिक लोकांचे प्राण गेले असावेत अशी भीती जम्मू मधील रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
 
किश्तवाड जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त अंगरेज सिंह राणा यांनी 20 लोकांचे प्राण गेल्याचे स्पष्ट केलं आहे. परंतु काही जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं स्थानिक लोक आणि रुग्णालयातील सुत्रांनी सांगितलंय.
 
या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवल्याचं सांगण्यात येतं. ही बस किश्तवाडवरून केशवन या गावाकडे चालली होती.
 
किश्तवाड श्रीनगरपासून 300 किलोमीटर अंतरावर आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या तीन जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा आहे. इथले रस्ते पर्वत-डोंगर कापून तयार करण्यात आले आहेत. या प्रदेशाला चिनाब खोरं असंही म्हटलं जातं.
 
इथल्या रस्त्यांची स्थिती चांगली नाही. अशा प्रकारचे बस अपघात गेल्या काही वर्षांमध्ये इथे झाले आहेत. अशा अपघातांमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले आहेत.
 
गेल्या आठवड्यातही एक बस दरीत कोसळली होती. त्या अपघातात नऊ मुलींनी प्राण गमावले होते. या बसमध्ये एकूण 11 विद्यार्थी होते.
 
बचावकार्य सुरू असून दरीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलांना स्थानिक पोलीस मदत करत आहेत, असं किश्तवाडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या अपघातावर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दुःख व्यक्त केलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

फोटो- ट्विटर