मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (15:35 IST)

कलम 370 : सरकारच्या निर्णयाबद्दल काय आहेत काश्मिरी पंडितांच्या भावना?

'या डोळ्यांनी केवळ दुःख, वेदना, मृत्यू, हिंसाचार आणि पलायनच पाहिलं होतं. या थकलेल्या डोळ्यांना हा दिवस दिसेल असं वाटलंही नव्हतं.'
 
58 वर्षीय काश्मिरी पंडित अशोक भान भावूक झाले होते. 19 जानेवारी 1990 ला अशोक भान यांना आपलं सगळं काही सोडून काश्मिरमधून पलायन करावं लागलं होतं. त्यांनी जम्मूमध्ये आश्रय घेतला.
 
त्या रात्री 'यत बनावो पाकिस्तान...'चे नारे मशिदींमधून उमटत होते. अशोक भान यांना ते प्रसंग आठवत होते.
ते सांगतात, "आजही 19 जानेवारीची संध्याकाळ आठवली की अंगावर काटा येतो. मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. जेव्हा मशिदींमधून आवाज यायला लागले तेव्हा माझे पाय थरथर कापायला लागले. मी ते सगळं शब्दांत मांडूही शकत नाही. काश्मिरी पंडितांना खोरं सोडून जावं लागेल अशी चर्चा सुरू झाल्यावर मनात पहिल्यांदा माझ्या घरातल्या लोकांचा विचार आला. ते कोठे जातील, काय खातील आणि आमच्या घरांचं काय होईल, असे प्रश्न मला पडले."
 
आता भान दिल्लीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहतात.
 
"मला काश्मिरला परत जायचं आहे. मी जेव्हा काश्मिर सोडलं, तेव्हा मी 27 वर्षांचा होतो. आता मी जवळपास साठीला आलो आहे. मात्र आमचं घर काश्मिरमध्येच आहे. काश्मीर हीच आमची माता आहे. तीस वर्षांपासून आम्ही म्हणत आहोत, की एक दिवस आम्ही काश्मिरला परत जाऊ. त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी ईदप्रमाणे आहे. आमचं स्वप्न साकार झालं आहे," असं भान सांगतात.
आज आमचे वडील हवे होते...
दिल्लीतील आयएनए मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला कपड्यांचं दुकान लावणाऱ्या अशोक कुमार मट्टू यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्तावावर आनंद व्यक्त केला.
 
या निमित्तानं त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. "माझे डॅडी आज हयात असायला हवे होते, एवढंच मला वाटतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं. या निर्णयामुळं ते खूप खूश झाले असते. आज जिथे कोठे काश्मिरी पंडित आहेत, ते ईद साजरा करत असतील. त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिवस असता."
 
जेव्हा आम्ही काश्मिरमधून बाहेर पडलो, तेव्हा पुन्हा हे आमचं घर होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. मात्र काश्मिर आमचं आहे, ही घोषणा आज सगळा देश देत आहे.
 
ज्यांच्यावर उपचार केले, त्यांनीच काश्मिरमधून हाकललं
1990 च्या आधी डॉ. एल. एन. धर काश्मिरच्या श्रीनगरमध्ये फिजिशियन म्हणून कार्यरत होते. डॉ. धर 1990 चा तो काळ आठवताना सांगतात, की 19 जानेवारीच्या आधीही बॉम्ब स्फोट व्हायचे. पण आम्ही त्याकडे लक्ष द्यायचो नाही.
 
ते सांगतात, "त्या रात्री काश्मिरमधील सर्व मशिदींमधून घोषणा देण्यात आली, की काश्मिरी पंडितांना हुसकवून लावा. काश्मिरी पंडितांकडे तीन पर्याय आहेत-एक म्हणजे इस्लामचा स्वीकार करणं. दुसरा पर्याय म्हणजे जीव गमावणं आणि तिसरा पर्याय म्हणजे काश्मिर सोडून जाणं."
 
"घर सोडण्याखेरीज आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा आम्हाला वाटलं, की दोन-तीन महिन्यात हे सगळं शांत होईल. आम्ही अक्षरशः रिकाम्या हातानं घर सोडून निघालो होतो. मात्र परिस्थिती चिघळतच गेली."
 
धर सांगतात, "इतक्या वर्षांमध्ये एवढी सरकारं आली गेली मात्र काहीच झालं नाही. त्यामुळेच आज आम्ही खूश आहोत."
 
कलम 370 हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र काश्मिरमध्ये परत जाण्याबद्दल काश्मिरी पंडितांच्या आशा अजूनही सरकारवरच केंद्रित आहेत.