शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (17:09 IST)

1 जूननंतरही राज्यात लॉकडाऊन वाढणार - राजेश टोपे

राज्यातील लॉकडाऊनला पंधरा दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज (28 मे) पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "लॉकडाऊन 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण या संदर्भातली नियमावली 1 जून रोजी जारी केली जातील."
 
ते पुढे म्हणाले, "जिथं रुग्ण जास्त आणि बेड कमी उपलब्ध आहेत तिथे लॉकडाऊन जास्त प्रमाणात शिथिल केलं जाणार नाही. पण जिथं कमी रुग्ण आहेत, त्या ठिकाणांसंदर्भात 1 जून रोजी गाई़डलाईन जारी केल्या जातील."
 
पुण्यातला वीकेंड लॉकडाऊन काढून टाकण्यात आला आहे. शनिवार, रविवार सकाळी 7 ते 11 अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार, असंही ते म्हणाले.
 
दरम्यान, सरसकट लॉकडाऊन उठवण्याचा विषय अजिबात नाही. हा लॉकडाऊन तसाच राहून त्यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 27 मे रोजी स्पष्ट केलं होतं.
 
गुरूवारी (1 मे) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.
 
"आताचा व्हायरसचा प्रकार बघता लॉकडाऊन सरसकट उठवण्याचा निर्णय घेता येणार नाही," असं टोपे यांनी स्पष्ट केलं. तसंच 21 जिल्ह्यांमध्ये राज्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त असण्याचं प्रमाण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सुद्धा त्यांनी सांगितलं.
 
ग्लोबल टेंडरला काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. पण त्यासाठी केंद्र सरकारने लसीचं राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याची गरज आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं . म्युकरमायकोसिसच्या रूग्णांकडे कोणत्याही प्रकारचं रेशनकार्ड असेल त्यांचा एकही रूपयाचा खर्च होणार नाही, अशी व्यवस्था राज्य सरकारने केलेल्याचं त्यांनी जाहीर केलं .
 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सध्याचं लॉकडाऊन 16 मे ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे.
 
येत्या 1 जूनपासून व्यापार सुरू झालाच पाहिजे- व्यापारी संघटना
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेले निर्बंध 1 जूनपासून उठवण्याच्या मागणीने राज्यात जोर धरला आहे.
 
लॉकडाऊनमुळे व्यापारी अडचणीत आले असून येत्या 1 जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे, अशी मागणी व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तसंच राज्य सरकारकडे केली आहे.
 
'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' चे राष्ट्रीय संघटन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबत एक निवेदन राज्य सरकारकडे पाठवलं आहे.
 
महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू आहेत. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील व्यापार बंद राहिल्यास येथील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भीती आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, अशी भीती ललित गांधी यांनी व्यक्त केली.
 
याशिवाय, व्यापारी वर्गाला विविध सवलती देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.