शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (15:15 IST)

कोरोनाः ब्लॅक, व्हाईट, यलो फंगस म्हणजे काय आणि ते कसं ओळखतात?

कमलेश
भारतात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिसत असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शन्सचे अनेक रुग्ण समोर येऊ लागले.
 
आधी केवळ ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीचा धोका होता. त्यानंतर व्हाईट फंगस आणि गेल्या सोमवारी यलो फंगस इन्फेक्शनही आढळून आलं आणि लोकांमध्ये या वेगवेगळ्या फंगल इन्फेक्शन्सची घबराट निर्माण झाली.
 
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हर्ष ENT हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला या तिन्ही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाल्याचं आढळून आलं.
हर्ष ENT चे प्रमुख डॉ. बी. पी. एस. त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही अत्यंत दुर्मिळ केस आहे. डॉ. त्यागींकडे आलेल्या 59 वर्षांच्या एका रुग्णाची तपासणी केल्यावर त्यांना यलो फंगस, ज्याला वैद्यकीय भाषेत म्युकर सेप्टिक्स म्हणतात, असल्याचं आढळून आलं.
 
डॉ. त्यागी म्हणतात, "अशा प्रकारचं फंगस सामान्यपणे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. मी जेवढं वाचलं आणि इतर डॉक्टरांशी चर्चा केली त्यावरून ही पहिलीच केस असल्याचं दिसलं. या रुग्णात ब्लॅक आणि व्हाईट फंगसही आढळला."
 
या रुग्णाला कोव्हिडची लागण झाली होती पण त्यांना ऑक्सिजनची गरज भासली नव्हती. मात्र, फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्यांना स्टेरॉईड्‌स देण्यात आले होते. त्यांना डायबिटीजही आहे.
डॉ. त्यागी यांनी सांगितलं, "संबंधित रुग्णाला 8-10 दिवसांपासून थकवा होता. हलका ताप होता. भूक कमी झाली होती. नाकातून काळा-लाल स्राव येत होता आणि नाकाजवळ संवेदना (sensation) कमी होती. या रुग्णावर एन्डोस्कोपी केल्यावर त्यांच्यात हे तिन्ही फंगस आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली."
 
"हे फंगल इन्फेक्शन म्युकर मायकोसीसच्या श्रेणीतील असल्याचं म्हणू शकतो. म्युकर मायकोसीसमध्ये असणारे म्युकोरेल्स (फंगस) बरेचदा असा रंग घेतात."
 
रंग नव्हे तर फंगसचा प्रकार महत्त्वाचा
देशात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट भयंकर होती. मात्र ती ओसरत असतानाच काही राज्यांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या केसेस समोर येऊ लागल्या. वैद्यकीय भाषेत याला म्युकर मायकोसीस म्हणतात. कोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास जाणवू लागला.
सुरुवातीला गुजरात, महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातूनही केसेस येऊ लागल्या. त्यामुळे हॉस्पिटल्सना स्वतंत्र म्युकर मायकोसीस वॉर्ड बनवावे लागले.
 
त्यानंतर बिहारमध्ये व्हाईट फंगसचे चार रुग्ण आढळले. पुढे उत्तर प्रदेशातूनही तक्रारी आल्या.
 
त्यामुळे लोकांमध्ये या तिन्ही फंगल इन्फेक्शन्सविषयी भीती दिसून येतेय. मात्र, घाबरून जाण्यापेक्षा या इन्फेक्शन्सची माहिती घेऊन त्यापासून स्वतःचा बचाव करणं महत्त्वाचं.
 
यासंबंधी दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीही आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. फंगल इन्फेक्शनला रंगावरून संबोधल्याने संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे रंगावरून नाही तर त्यांच्या वैद्यकीय भाषेतील नावांवरुन संबोधलं गेलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं.
 
ते म्हणाले, "फंगल इन्फेक्शनसाठी ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, यलो फंगस असे अनेक शब्द वापरले जातात. मात्र, अनेक शब्दांवरून संभ्रम निर्माण होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या रंगाचं फंगस असू शकतं. मात्र, आपण एकाच फंगसला वेगवेगळी नावं देतो."
 
"ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांच्यात तीन प्रकारचे फंगल इन्फेक्शन दिसतात - म्युकर मायकोसीस, कॅन्डीडा किंवा एसपरजिलस फंगल इन्फेक्शन. सर्वात जास्त केसेस म्युकर मायकोसीसच्या आहेत. हा वातावरणात आढळतो. हा संसर्गजन्य नाही. हे इन्फेक्शन 92-95 टक्के त्या रुग्णांमध्ये आढळून आलं आहे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना स्टेरॉईड्स देण्यात आलेत."
 
गुरुग्राममधील फोर्टिस ममोरियल इन्स्टिट्युटमध्ये हेमॅटोलॉजीचे प्रधान संचालक डॉ. राहुल भार्गव हेदेखील आजाराला रंगाच्या नावावरून नाव देणं चुकीचं असल्याचं सांगतात.
 
डॉ. राहुल भार्गव सांगतात, "फंगसचा स्वतःचा रंग नसतो. म्युकर ग्रुपची रायजोपस ही फंगस (बुरशी) शरीरातील सेल्सला (पेशी) मारतात तेव्हा त्यावर काळ्या रंगाची छाप सोडतात. कारण त्या मृत पेशी असतात."
"या बुरशीला नाक आणि तोंडातून काढून मायक्रोस्कोपच्या खाली बघितल्यावर काठावर फंगस आणि आत मृत पेशी दिसल्या. तेव्हापासून रायजोपस फंगसला ब्लॅक फंगस नाव पडलं. हा म्युकर मायकोसीसचाच प्रकार आहे."
 
व्हाईट फंगसविषयी डॉ. राहुल भार्गव सांगतात, "कॅन्डिडा शरीरावर दह्यासारखी दिसते. त्यामुळे तिला व्हाईट फंगस हे नाव पडलं. फंगसचा आणखी एक प्रकार असतो - एसपरजिलस. ही अनेक प्रकारची असते. शरीरावर ती काळी, निळसर हिरवी, पिवळसर हिरवी किंवा करड्या रंगाचीही असते. मीडियामध्ये जी नावं दाखवत आहेत ती फंगसच्या शरीरावर दिसणाऱ्या रंगावरून ठेवलेली आहेत. मात्र, फंगस नेमक्या कोणत्या प्रकारची आहे, हे कळल्यावरच त्यावर योग्य उपचार करता येतात."
 
फंगल इन्फेक्शन का होतं?
सर्व प्रकारच्या फंगल इन्फेक्शनमध्ये एक बाब समान असते आणि ती म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत झाल्यावर फंगल इन्फेक्शन शरीरावर हल्ला चढवते.
 
सुदृढ आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांमध्ये फंगल इन्फेक्शन होत नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. फंगस म्हणजेच बुरशी वातावरणातच असते. मात्र, फंगल इन्फेक्शन खूप कमी जणांना होतं.
 
दिल्लीतील साकेत भागातील मॅक्स हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसीनचे संचालक डॉ. रोमेल टिक्कू यांनी कुणाला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, हे सांगितलं -
 
. सध्या कोरोना विषाणूची लागण होणं, हे फंगल इन्फेक्शनच्या केसेस वाढण्यामागे एक मोठं कारण आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये, मग ते त्यातून पूर्ण बरे झालेले असो किंवा नसो, म्युकर मायकोसीसच्या सर्वात जास्त केसेस आढळून येत आहेत.
 
ज्यांना डायबिटीज आहे आणि उपचारासाठी त्यांना स्टेरॉईड्स देण्यात आलेत त्यांना म्युकर मायकोसीस होण्याचा धोका सर्वाधिक आहे. मात्र, रुग्णाला डायबिटीज नसेल आणि त्याला स्टेरॉईड देण्यात आले असतील, अशांमध्येही म्युकर मायकोसीसच्या केसेस आढळल्या आहेत.
 
.ज्यांच्यावर कुठल्या प्रकारची ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे, त्यांनाही फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. याशिवाय, किमोथेरपी सुरू असलेले कॅन्सर रुग्ण किंवा जे डायलिसिसवर आहेत, अशा रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांनाही म्युकर मायकोसीसचा धोका असतो.
कोव्हिड-19 आजारात स्टेरॉईड्सने फुफ्फुसांमधली सूज कमी केली जाते. तसंच कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा जेव्हा अति-सक्रीय होते त्यावेळी शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ नये. तो तसा होऊ नये, यासाठीसुद्धा स्टेरॉईड्स देतात.
 
स्टिरॉईड्समुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि यामुळे डायबेटीक किंवा ज्यांना डायबिटीज नाही, अशांच्याही रक्तातली शुगर लेव्हल वाढते, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
 
फंगल इन्फेक्शनचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असतो. उपचारासाठी वेळेत निदान होणं गरजेचं असतं. त्यामुळे फंगल इन्फेक्शनची लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे.
 
वेगवेगळ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्या चर्चेच्या आधारावर आज जे फंगल इन्फेक्श्सन दिसून येत आहेत त्यांची लक्षणं इथे सांगण्यात आली आहेत.
 
म्युकर मायकोसीस म्हणजेच ब्लॅक फंगस
म्युकर मायकोसीस म्युकर किंवा रेसजोपस फंगसमुळे होतो. ही बुरशी सामान्यपणे माती, झाडं, खत, सडलेली फळं आणि भाज्यांमध्ये आढळते.
ही बुरशी सायनस, मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम करते. अगदी मोजक्या केसेसमध्ये गॅस्ट्रोइन्टेस्टाईनल ट्रॅकमध्येही (पचन संस्थेतील सर्व अवयव) आढळते.
 
यात ऑपरेशनचीही गरज पडू शकते. उपचारांमध्ये उशीर झाल्यास अनेकांचा डोळा किंवा जबडाही काढावा लागू शकतो.
 
फुफ्फुस किंवा गॅस्ट्रोइन्स्टेस्टाईनल ट्रॅकमध्ये हा संसर्ग झाल्यास लक्षणं उशिरा दिसतात आणि त्यामुळे अशा केसेसमध्ये धोका जास्त वाढतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. म्युकर मायकोसीसमध्ये मृत्यूदर 50% आहे.
 
याची लक्षणं आहेत - नाक बंद होणं, नाकातून रक्त किंवा काळा पातळ स्राव येणं, डोकेदुखी, डोळ्यात सूज किंवा दुखणे, धूसर दृष्टी आणि शेवटी आंधळेपण. नाकाजवळ काळे डाग येऊ शकतात. तिथली संवेदना कमी होते. फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्यावर श्वास घ्यायला त्रास आणि छातीत दुखणे, असा त्रास होतो.
 
म्युकर सेप्टिक्स
हा म्युकर मायकोसीसचाच एक प्रकार आहे. म्युकर मायकोसीस अनेक प्रकारचे असतात. यात ताप, नाकातून लाल किंवा काळ्या रंगाचा स्राव, अशक्तपणा आणि नाकाजवळ संवेदना कमी होण्यासारखी लक्षणं असतात.
 
कॅन्डिडा म्हणजेच व्हाईट फंगस
रोगप्रतिकारक क्षमता कमी असणारे, डायबेटिक किंवा डायबेटिक नसणारे आणि आयसीयूमध्ये दिर्घकाळ राहिलेल्या रुग्णांना याचा धोका असतो.
 
यात पांढरे पॅच (चट्टे) येतात. जीभेवर पांढरे डाग दिसतात. किडनी आणि फुफ्फुसामध्ये हे इन्फेक्शन होऊ शकतं. हे इन्फेक्शन म्युकर मायकोसीसएवढं गंभीर नसतं. यात मृत्यूदर 10 टक्क्यांच्या आसपास आहे. हे इन्फेक्शन रक्तात पसरलं तरच ते धोकादायक ठरू शकतं.
 
एसपरजिलस फंगल इन्फेक्शन
कोव्हिड रुग्णांमध्ये हा संसर्गही आढळून आला आहे. मात्र, केसेसची संख्या खूप कमी आहे. हे इन्फेक्शनही फुफ्फुसांवर परिणाम करतं. यात फुफ्फुसात कॅव्हिटी तयार होते.
 
आधीच एखादी एलर्जी असणाऱ्यांना हा संसर्ग होऊ शकतो. यातही न्युमोनिया झाला किंवा फंगल बॉल तयार झाला तर हे इन्फेक्शन धोकादायक ठरू शकतं.
 
बचावाचे उपाय कोणते?
या सर्व फंगल इन्फेक्शनपासून बचावाचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वच्छता ठेवणे. कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांनी धूळ-माती असणाऱ्या ठिकाणी जाऊ नये.
हाथ धुणे, ऑक्सिजन ट्यूब स्वच्छ ठेवणे, ऑक्सिजन सपोर्टसाठी वापरलं जाणारं पाणी स्टरलाईज्ड असणे उत्तम, अशाप्रकारची स्वच्छतेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात.
 
तर डॉ. राहुल भार्गव सांगतात की यापुढे कोव्हिड रुग्णावर उपचार करताना रक्तातली शुगर नियंत्रणात ठेवावी आणि स्टेरॉईड्सचा काळजीपूर्वक वापर करावा, याची विशेष खबरदारी घेतली जाईल. जे कोव्हिडवर उपचार घेत आहेत, जे कोव्हिडमधून बरे झालेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, अशांनी फंगल इन्फेक्शनची लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
सध्या देशभरात म्युकर मायकोसीसचे 9 हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत. मात्र, कॅन्डिडा आणि एसपरजिलस इन्फेक्शनच्या केसेस खूप कमी आहेत.