मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:25 IST)

कोरोना व्हायरस : कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या गरोदर महिलांना गर्भपात करण्याचा सल्ला का दिला जातोय?

अनघा पाठक
काजल (बदलेलं नाव) सात वर्षं बाळासाठी प्रयत्न करत होती. शेवटी गर्भ राहिला. नवरा-बायको दोघेही खूप आनंदात होते. रूटिन चेकअपसाठी आपल्या गायनॅककडे गेल्यानंतर काजलने सांगितलं की तिला कोव्हिड होऊन गेला.
 
"मॅडम, कोव्हिड हो गया, लेकिन अब मैं बिल्कुल ठीक हू. मी सगळी औषधं घेतली, आणि आता मला काही लक्षण नाहीत." काजलने कोणत्या गोळ्या घेतल्या हे तिच्या गायनॅकने पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. गरोदरपणात अजिबात घेतलेली चालणार नाहीत अशी औषधं तिने भरपूर प्रमाणात घेतली होती. तिला डॉक्टरांनी गर्भपात करायला सांगितला.
 
नाशिकमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलेला हा अनुभव. "मी तिला म्हटलं की प्रेग्नंसी कंटिन्यूच करायची नाही. शेवटी ती ओक्साबोक्शी रडायला लागली, पण तिला खूप खूप समजावल्यानंतर, तिच्या नवऱ्याने तिची समजूत घातल्यानंतर ती तयार झाली."
 
त्यांच्या दुसऱ्या एका पेशंटला त्यांनी हाच सल्ला दिला पण ती तयार झाली आणि पुन्हा डॉक्टरांकडे आलीच नाही.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. पण का?
 
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते कोव्हिड-19 वर उपचारासाठी जी औषधं दिली जातात ती बाळासाठी हानिकारक असतात त्याने बाळात व्यंग निर्माण होऊ शकतं. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात.
 
"अनेक कोरोना संसर्ग झालेल्या महिला आपल्या गायनॅकला आपण पॉझिटीव्ह झाल्याची माहिती देत नाहीत आणि जनरल फिजिशियन त्यांना गोळ्या देऊन मोकळे होतात. या महिलाही कोर्स पूर्ण करतात. अशात मग आम्ही महिलांना गर्भपात करायचा सल्ला देतोय. मी माझ्या काही पेशंटचे गर्भपात केलेही आहेत. अर्थात गरोदरपणाच्या पहिल्या टप्प्यातच हे शक्य आहे. पण परिस्थिती फार विचित्र आहे," डॉ पवार म्हणतात.
गरोदरपणातल्या पहिल्या तीन महिन्यांना ऑर्गनोजेसेसिस असं म्हटलं जातं म्हणजे या काळात बाळाचे अवयव तयार होत असतात. या काळात जर काही औषधं दिली गेली तर बाळाच्या अवयवांमध्ये व्यंग तयार होतं. कधी हृदय नीट तयार होत नाही तर कधी हातापायाची नीट वाढ होऊ शकत नाही.
डॉ पवार सांगतात, "कोरोना सगळ्यांसाठीच नवीन आहे, त्यामुळे याचा सायंटिफीक डेटा समोर यायला अजून एखाद दोन वर्षं जातील त्यामुळे कुठलाच गायनॅक हे सांगू शकणार नाही की बाळावर या औषधांचे काय साईड इफेक्ट होणार आहेत.
 
पण एक नक्की, की कोरोनाच्या ट्रीटमेंटमध्ये दिली जाणारी अनेक औषधं, उदाहरणार्थ फॅबी फ्लू, बाळासाठी खूप हानिकारक असतात. ती दिलेली चालतच नाहीत. अशा गोळ्यांची ट्रीटमेंट ज्या आयांनी घेतलीय त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही गर्भ ठेवू नका.
 
पण ज्या महिलांचं गरोदरपण दुसऱ्या टप्प्यात गेलंय म्हणजे चार-पाच महिने झालेत, अशांच्या बाबतीत गर्भपाताचाही पर्याय नाही, मग धोका पत्कारून त्यांची प्रेग्नंसी कंटिन्यू करतोय. बाळावर काय परिणाम होतात हे येणारा काळच सांगेल."
 
पण थांबायला कोणाला सांगायचं हाही प्रश्न आहेच. ज्या महिला विशी-पंचविशीत आहेत त्यांना थांबणं किंवा आता गर्भपात करून पुढे चान्स घेणं शक्य आहे, पण ज्या महिलांना हार्मोनल प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांचं वय वाढत आहे, ज्या महिलांना अनेक वर्षांनंतर गर्भ राहिला आहे अशांना थांबणंही शक्य नाही आणि गर्भपात करणंही.
 
नऊ महिन्यांचा कठीण काळ
"मला सातवा महिना लागला आणि माझी आई कोरोनाने गेली. त्यावेळी पोटातल्या बाळाचं वजन फक्त 7 किलो होतं. मी गरोदर राहिल्यापासून काहीना काही प्रॉब्लेम येतच होते. खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं. मानसिक तणाव, दुःख या सगळ्यांतून जात होते आणि अशात आठव्या महिन्यात कळलं की मी पण कोरोना पॉझिटिव्ह आहे.
इतर बायकांचं काही ऐकू येतं होतं, की काही बायका त्या पीरियडमध्येच मृत्यू पावल्या, काहींना हॉस्पिटलही मिळत नव्हतं, मला भीती वाटायला लागली की आपल्यावरही तशीच वेळ येते का. या बाळाची वाट आम्ही नवरा-बायको अनेक वर्षं पाहात होतो आणि आता काय करावं सुधरत नव्हतं. सतत धास्ती, सतत भीती... "
 
हे शब्द आहेत कोरोना काळात आई झालेल्या रेश्मा रणसुभे यांचे. गेल्या दीड वर्षांच्या काळात आई बनू पाहाणाऱ्या, बनलेल्या किंवा त्यासाठी उपचार घेणाऱ्या अनेक महिला अशाच धास्तीत जगत आहेत. आईबाबा होऊ पाहाणारे कशाला, त्यांच्यावर उपचार करणारे स्त्रीरोग तज्ज्ञांवरही दडपण आहे.
"आम्ही अनेक पेशंटला सध्या सांगत आहोत की तुम्ही प्रेग्नंसी प्लॅन करू नका. हे मागच्या वर्षीही आम्ही सांगत होतो. पण जागतिक साथीचा शेवट काही दृष्टीक्षेपात नाहीये. आयव्हीएफ थांबलंय. पण दुसरीकडे ज्या महिलांची लेट प्रेग्नंसी आहे, ज्यांचं वय 35-37 अशी आहेत त्या जास्त काळ थांबू शकत नाही.
 
त्यांना कसं सांगणार की तुम्ही थांबा. आम्ही शक्य तेवढी काळजी घेतोय, प्रत्येक पेशंटची केस लक्षात घेऊन त्यांना सल्ले देतोय. पण या काळातलं गरोदरपण, बाळंतपण प्रचंड अवघड आहे," डॉ पवार नमूद करतात.
 
"आपण ट्रीटमेंट तर देतोय पण आईच्या जीवाला धोका तर नाही होणार ना, बाळात व्यंग तर नाही तयार होणार ना, किंवा अगदी आपण त्यांना ट्रीटमेंट देत असताना आपल्याला संसर्ग होणार नाही ना असे एक ना हजार प्रश्न आमच्याही डोक्यात आहेत. कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे," असंही त्या पुढे म्हणतात.
 
'बाळाला लांब कसं ठेवू?'
नाशिक शहरातल्याच झुबिया शेख यांची काही महिन्यांपुर्वी डिलेव्हरी झाली. तोपर्यंत त्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला नव्हता. पण डिलेव्हरीनंतर बाळाला तेलमालिश करायला येणाऱ्या बाईमुळे त्या पॉझिटिव्ह झाल्या. हे कळल्या कळल्या त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला ते बाळाला पाजू कसं?
"डॉक्टर्स म्हणायच्या बाळाला वरच दे, लांब ठेव. पण बाळाला लांब कसं ठेवू? कसंतरी मनावर दगड ठेवून मी, दोन मास्क लावून, बाळाला पाजायचे आणि मग घरातल्यांकडे द्यायचे. मला सुदैवाने गंभीर संसर्ग झाला नव्हता आणि काही दिवसात मी बरी झाले, पण तेवढे दिवसही बाळापासून लांब राहणं माझ्यासाठी दिव्य होतं. त्यात आपल्यामुळे बाळाला काही होणार नाही ना, ही भीती पदोपदी जाणवायची."
थांबलेल्या आयव्हीएफ ट्रीटमेंट
आईबाबा होऊ पाहणारे, पण नैसर्गिकरित्या मुलांना जन्म न देऊ शकलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ ट्रीटमेंटचा एक मार्ग असतो. पण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत या ट्रीटमेंटचं प्रमाण अतिशय कमी झालं आणि अनेक जोडप्यांच्या आशा हिरावल्या.
 
रचनाच्या (बदलेलं नाव) बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. "शेवटची संधी आमच्या हातात होती, आता तीही निसटली," एवढं एकच वाक्य ती कसंबसं सांगते.
डॉ. नंदिनी पालशेतकर स्त्रीरोग तज्ज्ञांची संघटना FOGSI च्या माजी अध्यक्ष आहेत आणि मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलच्या आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत.
 
त्यांच्यामते लॉकडाऊनच्या काळात आयव्हीएफचा आकडा शून्यावर आला होता, जगभरातही सांगितलं गेलं की या ट्रीटमेंट थांबवा पण हळूहळू त्या पुन्हा सुरू होत आहेत.
 
"ज्या महिलांची लग्न उशिरा झालीत किंवा ज्या महिलांना आयव्हीएफ हा एकच पर्याय शिल्लक आहे, त्या दोन-दोन वर्षं वाट पाहू शकत नाहीत ना. आयव्हीएफ लांबलंय याला इतरही कारण आहेत. एक म्हणजे लोक बाहेर पडू शकत नाहीत, दुसरं म्हणजे लोकांच्या हातात येणारा पैसाही कमी झालाय. इकोनॉमिच डाऊन झालीये, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अशात ही ट्रीटमेंट अनेकांना परवडत नाहीये. त्यामुळेही फरक पडतोय," त्या म्हणतात.
 
हताश होण्याचं कारण नाही
आसपास अशी परिस्थिती असली तरी अगदीच हातपाय गाळून जाणं किंवा हताश होण्याचं काही कारण नाही असंही डॉ. पालशेतकर ठामपणे सांगतात. "अशा गोष्टींमुळे पॅनिक व्हायचं काही कारण नाही, मी आवर्जून सांगते की तुम्ही सकारात्मक राहा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा."
झिका व्हायरसच्या काळात संसर्ग झालेल्या महिलेने गर्भपात करावा अशा मार्गदर्शक सूचना होत्या कारण त्या व्हायरसमुळे बाळाला पोटात संसर्ग होत होता आणि बाळात व्यंग उत्पन्न होत होतं. पण अशा काही सूचना कोरोना व्हायरसच्या बाबतीत नाहीयेत, अशी माहिती डॉ. पालशेतकर देतात.
 
त्या पुढे असंही म्हणतात की गरोदरपणाच्या काळात एखाद्या महिलेला कोव्हिड झाला तरी अशी अनेक औषधं आहेत जी सुरक्षित आहेत. ती नक्कीच वापरता येऊ शकतात.
 
"मी माझ्या पेशंटला ती औषधं दिली आहेत आणि देवकृपेने त्यांच्यात मला कधी कुठले साईड इफेक्ट दिसले नाहीत. मी तरी आजवर माझ्या कुठल्याही पेशंटला गर्भपात करण्याचा सल्ला दिला नाही किंवा तशी वेळ आली नाही. मला वाटतं आता डॉक्टरांनाही अंदाज आलाय की या केसेसमध्ये काय करायचं."
पहिल्या पाच आठवड्यात अनेक औषधं देता येतात असं त्यांचं म्हणतात. पण त्या हेही मान्य करतात की अमेरिकेत झालेल्या अभ्यासातून समोर आलंय की गरोदर स्त्रियांना कोव्हिड झाला तर तो धोकादायक ठरू शकतो.
 
"म्हणूनच आम्ही मागणी करतोय की गरोदर महिलांना प्राधान्याने लशी द्या. लशींनी काहीही धोका होत नाही असं आधीच अभ्यासातून समोर आलेलं आहे."
 
पण तरी देशात असलेल्या लशींच्या तुटवड्यात सगळ्या गरोदर महिलांना लशी कशा द्यायच्या हा प्रश्न आहेच.
 
ताप येऊ देऊ नका
कोव्हिड झालेल्या महिलांमध्ये वेळेआधी प्रसुती होण्याचं प्रमाण जास्त आहे, असं डॉक्टरांना दिसून आलेलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी यूकेत झालेल्या एका अभ्यासातही दिसून आलं की प्रसुतीच्या जवळपास जर महिलांना कोव्हिड झाला तर बाळ जन्मतःच मृत असण्याची किंवा वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त असते.
 
"पूर्ण वाढ झालेला गर्भ साधारण 38 आठवड्यांचा असतो. त्याच्या आधी प्रसुती झाली तर ती वेळेआधी झाली असं म्हणतात. तापामुळे अशी वेळेआधी प्रसुती किंवा काही केसेसमध्ये गर्भपातही होऊ शकतो. त्यामुळे जर कोणी पेशंट गरोदर असतील आणि त्यांना कोव्हिड झाला तर मी त्यांना सांगते की ताप येऊ देऊ नका. ताप वाढला तर कॉम्प्लिकेशन होऊन धोका वाढतो," डॉ पालशेतकर अधिक माहिती देतात.
 
पण तरीही घाबरून जाऊ नका, योग्य ती ट्रीटमेंट घ्या, असं सांगायला त्या विसरत नाहीत.