गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 2 एप्रिल 2019 (12:35 IST)

लोकसभा निवडणूक : राहुल गांधींमधील बदल मोदींचा पराभव करेल?

जेव्हा इंदिरा गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या तेव्हा त्यांचं वय 42 वर्षं होतं. तर संजय गांधींनी वयाच्या 30व्या वर्षी पहिली निवडणूक लढवली होती. राजीव गांधी जेव्हा राजकारणात आले, तेव्हापर्यंत त्यांनी फक्त 36 उन्हाळे पाहिले होते.
 
2004ला जेव्हा राहुल गांधी राजकारणात आले तेव्हा भारतीय राजकारणाच्या मानकांनुसार ते लहानच होते. कारण तेव्हा त्यांचं वय 34 वर्षं होतं.
 
विशेष म्हणजे दीड दशकं राजकारणात घालवल्यानंतर आणि वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही त्यांना राजकारणात लहानच समजलं गेलं.
 
2008ला राजनाथ सिंह यांना एका मुलाखतीत राहुल गांधींचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचा उल्लेख 'बच्चा' असा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राहुल म्हणाले होते, "त्यांच्या दृष्टिकोनातून जर मी लहान असेन तर त्यांना आवडो अथवा न आवडो या देशातील 70 टक्के लोकसंख्या 'लहान' आहे."
 
भारतीय राजकारणात तरुणाईला अपरिपक्वतेशी जोडून पाहिलं जातं. पण भारतीय राजकारणाचा अभ्यास असणारे असं मानतात की राहुल गांधी आता या "लेबल"मधून बाहेर पडले आहेत आणि आता ते देशाच्या सर्वोच्च नेर्तृत्वाचे दावेदार आहेत.
इंदिरा गांधींचे लाडके
राहुल गांधींना राजकारणाचे बाळकडू आजी इंदिरा गांधींकडून मिळालं आहे. राहुल गांधींचा जन्म 19 जून 1970 ला झाला. त्यांच्या जन्मानंतर इंदिरा गांधींना त्यांची मैत्रिण डोरोथी नॉर्मन यांनी पत्र लिहिलं होतं. त्यात त्या लिहितात, "राहुलच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आता कमी झाल्या आहेत. पण त्याची 'डबल चिन' मात्र अजूनही आहे."
 
इंदिरा गांधी यांचं चरित्र लिहिणाऱ्या कॅथरीन फ्रँक लिहितात, "इंदिरा गांधी सकाळी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. त्यावेळी राहुल आणि प्रियंका त्यांच्या सोबत असतं. रात्रीही राहुल आणि प्रियंका त्यांच्या रूममध्ये झोपत असत."
उच्च शिक्षण
राहुल गांधींचं शिक्षण डून स्कूलमध्ये झालं. त्यानंतर दिल्लीतील प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते अमेरिकेत गेले. त्यांनी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना फ्लोरिडातील एका कॉलेजमधून 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयातील अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागला.
 
त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध ट्रिनिटी कॉलेजमध्ये 1995ला त्यांनी 'डेव्हलपमेंट स्टडीज'मधून एमफील केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लंडनमधील मॉनिटर ग्रुप या कंपनीत नोकरी स्वीकारली. ब्रँड स्ट्रॅटजीमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत ते नाव बदलून काम करत होते. त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना ते इंदिरा गांधींचे नातू आहेत, हे माहितीही नव्हतं.
 
2002ला ते भारतात आले. त्यांनी मुंबईत बॅकॉप्स सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी सुरू केली होती. 2004ला त्यांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा प्रतिज्ञापत्रात त्यांनी या कंपनीत 83टक्के शेअर असल्याचं नमूद केलं होतं.
 
बॉक्सिंगची आवड
2008च्या उन्हाळ्यात भारताचे त्या काळातील सर्वांत प्रसिद्ध बॉक्सिंग कोच आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ओमप्रकाश भारद्वाज यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणातून एक फोन आला. त्यांना सांगण्यात आलं की 10 जनपथवरून 'साहेब' तुमच्याशी बोलणार आहेत. काही वेळाने पी. माधवन यांनी भारद्वाज यांना फोन केला आणि सांगितलं, की राहुल गांधींना तुमच्याकडून बॉक्सिंग शिकायचं आहे. भारद्वाज यासाठी तयार लगेच तयार झाले. राहुल गांधी यांचं चरित्र लिहिणारे जतिन गांधी लिहितात, "भारद्वाज यांना फीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर भारद्वाज यांनी घरातून 'पिक' करावं आणि ट्रेनिंगनंतर घरी 'ड्रॉप' करावं, इतकीच मागणी केली." 12 तुघलक लेन इथं लॉनवर हे ट्रेनिंग चालत असे. आठवड्याला 3 दिवस असं काही आठवडे हे ट्रेनिंग सुरू होतं.
 
या काळात हे ट्रेनिंग पाहाण्यासाठी सोनिया, प्रियंका, प्रियंकांची मुलं माएरा आणि रेहान नेहमी जात असत.
 
भारद्वाज राहुल यांना आदरार्थी बोलवत तेव्हा राहुल त्यांना सांगायचे, "मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही मला राहुलच म्हणा." राहुल गांधी भारद्वाज यांना सोडण्यासाठी गेटपर्यंत येत आणि त्यांनी स्वतः मला प्यायला पाणीही आणून दिलं होतं," अशी आठवण ते सांगतात.
 
जलतरण, स्क्वॉश, पॅराग्लायडिंग, नेमबाजी अशा खेळांतही ते पारंगत आहेत. कितीही व्यग्र असले तरी ते व्यायामासाठी वेळ काढतात. एप्रिल 2011ला मुंबईत झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी ते मुंबईतील न्यूयॉर्क रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचे काही मित्रही होते. रेस्टॉरंटच्या मॅनेजरने त्यांच्याकडून बिल घ्यायला नकार दिला. त्यावेळी राहुल गांधी यांनी जबरदस्तीने 2223 रुपये बिल मॅनेजरकडं दिलं. आजही दिल्लीतल्या प्रसिद्ध खान मार्केटमध्ये राहुल गांधी कॉफी प्यायला जातात. आंध्र भवन इथंही जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी ते जात असतात.
 
मुंबईत लोकलने प्रवास
एकदा त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला चुकवून मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलने प्रवास केला होता. प्लॅटफॉर्मवर थांबून त्यांनी लोकलची वाट पाहिली होती. लोकांना त्यांनी अभिवादनही केलं.
 
या सगळ्या प्रवासात ते माधम्यांशी बोलले नाहीत. या प्रवासात त्यांनी एटीएमच्या रांगेत उभं राहून पैसे ही काढले.
अजूनही अविवाहित
राहुल यांचं वय 48 असून त्यांनी अजून लग्न केलेलं नाही. ते या विषयावर बोलत नाहीत. 2004ला वृंदा गोपीनाथ यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मैत्रिणीचं नाव व्हेरोनिका आहे.
 
त्यांनी सांगितलं होतं, "ती व्हेनेझुएलाची नसून स्पॅनिश आहे. तसेच ती रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस नसून वास्तुविशारद आहे. अर्थात ती वेट्रेस असती तरी मला फरक पडला नसता. ती माझी सर्वांत चांगली मैत्रीण आहे."
 
त्यानंतर लोकांनी त्यांच्या गर्ल फ्रेंडबद्दल कयास बांधण्याचा प्रयत्न केला. पण याबद्दल काही समोर आलेलं नाही.
 
पप्पू नाव चिकटलं
राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले तेव्हा ते फार बहिर्मुख नव्हते. सोनिया गांधी यांच्या मागे ते उभे असायचे. प्रियंका हात उंचावून अभिवादन करत असतं, तेही राहुल यांना जमत नव्हतं. त्यांना नीट बोलता येत नाही, अशी अफवा उठवण्यात आली होती.
 
त्यानंतर उजव्या विचारांच्या संघटनांनी राहुल यांचा उल्लेख 'पप्पू' असा करायला सुरुवात केली. या गोंधळात त्यांनीही या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी 2008ला एक हिंदी सिनेमा गाजला होता. त्यात एक गाणं होतं, "पप्पू कान्ट डान्स". 2008मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूकही सुरू झाली. त्यावेळी निवडणूक आयोगाने एक मोहीम राबवली होती. 'पप्पू कान्ट व्होट' अशी मोहीम होती. याचा अर्थ असा होता की 'पप्पू' अशी व्यक्ती आहे जी महत्त्वाची कामं न करता निरुपयोगी कामात वेळ घालवते.
 
राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकएक राज्य गमावत होती. भाजप यावेळी त्यांची थट्टा करताना म्हणत असे, "आमचे 3 प्रचारक आहेत - नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी."
राहुल गांधी यांची राजकीय अपरिपक्वता
सुरुवातीच्या काळात राहुल यांच्या मागे काँग्रेसमध्येही त्यांची थट्टा होत असे. तुम्ही जितके झोलाछाप आणि अस्ताव्यस्त तेवढी तुमची राहुल यांच्या जवळ जाण्याची शक्यता जास्त, असं काँग्रेसमध्ये म्हटलं जायचं. त्यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहुल गांधी यांना भेटायला जाण्यापूर्वी हातातील रोलेक्सचं घड्याळ काढून ठेवत आणि पॉश कार दूर कुठं तरी पार्क करून रिक्षाने जात.
 
19 मार्च 2007ला त्यांनी देवबंद इथं एक भाषण केलं. ते म्हणाले होते, "1992ला जर नेहरू परिवार सत्तेत असता तर बाबरी मशीद पडली नसती." त्यावेळी नरसिंह राव यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत होती.
 
राहुल म्हणाले, "माझे वडील म्हणाले होते जेव्हा बाबरी मशीद पाडण्याची वेळ येईल तेव्हा मी मध्ये उभा असेन. बाबरी मशीद पाडण्यापूर्वी त्यांना मला मारावं लागेल."
 
राहुल यांचं हे भाषण त्यांची राजकीय अपरिपक्वता दाखवणारं होतं, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
पप्पूच्या प्रतिमेतून बाहेर आले राहुल
पण गेल्या काही दिवसांत परिस्थिती बदलू लागली आहे. याची पहिली झलक पहिल्यांदा पाहता आली जेव्हा राहुल गांधी बर्कले इथं कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले होते. तिथं त्यांनी 'भारताचं राजकारण आणि परराष्ट्र धोरण' यावर खुलेपणानं चर्चा केली. तिथून परत आल्यानंतर त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसू लागला.
 
कर्नाटकमध्ये त्यांनी विजय मिळवला नाही. पण तिथं त्यांनी भाजपला सरकार बनवू दिलं नाही. त्यानंतर हिंदी पट्ट्यातील 3 राज्यं त्यांनी जिंकली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत नरेंद्र मोदी यांनी जोर लावूनही तिथं त्यांनी भाजपला सत्तेतून बाहेर केलं. त्यानंतर असं वातावरण निर्माण झालं की भाजपला 2019ची लोकसभा जिंकण्याची संधी मिळणार नाही.
 
भाजपला त्याच भाषेत उत्तर
असं म्हटलं जातं, की तुम्ही जेव्हा रसातळाला जाता तेव्हा तुम्हाला वर येण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षांपूर्वी काँग्रेसचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पराभव झाला होता. काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या. ही संख्या इतकी कमी होती की काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळालं नाही.
 
काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये बदल केले. मंदिरात जाणं, कैलाश मानसरोवरला जाणं, स्वतःचं जानवं दाखवणं यात त्यांना कोणताही संकोच वाटत नाही. त्यांनी लोकांसमोर 'सॉफ्ट हिंदुत्व' सादर केलं. ते योगी आदित्यनाथ यांच्या आक्रमक हिंदुत्वापेक्षा हे हिंदुत्व वेगळं आहे.
 
प्रसिद्ध पत्रकार राधिका रामाशेषन म्हणतात, "पूर्वी असं सांगितलं जात होतं की भाजप म्हणजे काँग्रेस आणि गाय यांची बेरीज आहे. आता काँग्रेस पक्ष म्हणजे भाजप उणे गाय आहे."
 
तीन राज्यांत विजय
राहुल यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये परिवर्तन आलं आहे. ते देशाच्या शीर्ष नेतृत्वासाठी प्रबळ दावेदार बनले आहेत. ते पत्रकार परिषदांना समोर जातात आणि विनोदही करतात.
 
ते दिवस आता राहिलेले नाहीत, जेव्हा ते महत्त्वाच्या प्रसंगी परदेशात सुटीवर जात असत. संकटातील शेती, बिघडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि रफालवर त्यांनी मोदींवर तिखट हल्ले केले आहेत.
 
3 राज्यांत त्यांचा हुकमी एक्का होता, शेतकऱ्यांना कर्जमाफी. आता त्यांनी सत्तेत आलो तर गरिबांना वर्षाला 72,000 देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण त्यासाठी पैसे कुठून येतील हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.
 
गहलोत आणि कमलनाथ यांना जबाबदारी
राहुल गांधी यांची राजकीय परिपक्वता मध्य प्रदेश आणि राजस्थान इथं दिसून आली. राजस्थानात प्रदेशाध्यक्ष पदावर सचिन पायलट यांनी निवड केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अशोक गहलोत यांच्याकडे दिली. मध्य प्रदेशातही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती, पण मुख्यमंत्रिपदावर त्यांनी कमलनाथ यांना नेमलं.
 
कर्नाटकमध्ये पक्ष दुसऱ्या स्थानावर होता, पण त्यांनी जनता दल सेक्युलरसोबत आघाडी करून भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखलं. राज्यपाल वाजूभाई वाला यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी बोलवलं होतं. पण त्यांनी अभिषेक मनु सिंघवी यांना चंदीगढमधून बोलवून सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला. त्यातून भाजप सरकारला 48 तासांत पायउतार व्हावं लागलं.
कठीण कालखंड
राहुल आतापर्यंत कधी मंत्रीही झालेले नाहीत. अर्थात, त्यांनी मनात आणलं असतं तर ते कधीही मंत्री होऊ शकले असते. त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात कोणतही मोठं विकासकाम केलेलं नाही, असा त्यांच्यावर आरोप होतो. त्यांना जे पद मिळालं ते वारसा म्हणून मिळालं आहे, त्यासाठी त्यांनी कष्ट केलेले नाहीत.
 
पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत त्यांनी उडी घेतली असली तरी त्यांचे सहकारी आणि विरोधक सर्वांनाच हे माहिती आहे की या पदासाठी त्यांना कोणाताही पूर्वानुभव नाही. राजकारणात हा काही गुण म्हणून पाहिला जात नाही.
 
'ओपन' या नियतकालिकाचे संपादक एस प्रसन्नराजन सांगतात, "त्यांच्या समोरची सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे ते मोदींच्या काळात गांधी आहेत. हे त्यांच्यासाठी फार कठीण आहे."
 
राहुल गांधींना माहिती आहे की 5 वर्षं सत्तेत राहिलेल्या मोदींना 2019च्या लोकसभा निवडणुकीत सहज हरवता येणार नाही. पण 3 महिन्यांपूर्वी त्यांनी मोदींना हरवण्याची क्षमताही दाखवून दिली आहे, त्यामुळे त्यांना कमी समजून चालणार नाही.

रेहान फजल