बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (14:48 IST)

महाराष्ट्र पाऊसः ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस का पडतोय? यंदा 15 डिसेंबरपर्यंत पाऊस पडणार?

राहुल गायकवाड  
''मी घरी नव्हतो, सोलापूरकडे निघालो होतो, मित्रांकडून कळालं सोलापुरात तुफान पाऊस पडतोय. त्यात पुणे - सोलापूर हायवेवर पाणीच पाणी झालं होतं. मला घरी जाता येणं शक्य नव्हतं. शेवटी रात्री मित्राच्या घरी राहावं लागलं.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी सोलापूरमध्ये गेलो तर सर्वत्र चिखल आणि घरांमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं. मी गेल्या 40 वर्षात असा पाऊस सोलापुरात पडलेला पाहिला नाही,'' पेशाने शिक्षक असलेले आणि मूळचे सोलापूरचे असलेले बिभीषण जाधव सांगत होते.
 
हा केवळ बिभीषण यांचाच अनुभव नाही तर सोलापूरमधल्या अनेकांच्या याच भावना आहेत. आंध्रच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचा प्रवास पश्चिमेकडे सुरु झाला आणि वाटेत असलेल्या अनेक जिल्ह्यांना त्याने अक्षरशः झोडपून काढले.
 
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतोय. आंध्रमधून सुरू झालेला पाऊस मराठवाड्याच्या मार्गाने पुण्यात येऊन धडकला.
 
येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये राहणाऱ्या विजय जगताप यांच्या घरात एक फुटापर्यंत पाणी शिरलं होतं. अशीच परिस्थिती त्यांच्या आजूबाजूच्या घरांमध्ये होती. जगताप गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तेथे राहतात.
 
एवढ्या वर्षात घरात कधी फारसे पाणी आले नाही. परंतु गेल्या चार-पाच वर्षांपासून मुसळधार पाऊस झाल्यानंतर घरात पाणी शिरत असल्याचे ते सांगतात. बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे घरात आलेलं पाणी ते गुरुवारी दुपारपर्यंत काढत होते, त्यातच पावसाची संतधार सुरुच होती, त्यामुळे पुन्हा घरात पाणी शिरतं की काय? अशी चिंता त्यांना सतत सतावत आहे.
 
बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जगताप यांच्याप्रमाणेच पुण्यातील सखल भागांमधील अनेक सोसायट्या तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. अश्निशमन दलाकडे शहरात विविध 45 ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारे पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंबिल ओढ्याला पूर आला आणि या पुरात अनेकांचे जीव देखील गेले.
 
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस हजेरी लावतोय. सिंहगड रस्ता, वारजे चौक एवढंच काय तर शिवाजी रस्त्याला आता नद्यांचे स्वरुप प्राप्त होत आहे.
 
यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट असतानाच पावसाळ्याच्या सुरुवातील निसर्ग चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना देखील राज्याला करावा लागला आहे. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पावसाळी वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुसळधार पाऊस का पडतोय? या प्रश्नाचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
या विषयी बीबीसीने ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. कुलकर्णी यांच्या मते ''ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पडणे तसे असामान्य आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आंध्रच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे पट्टे तयार होत असतात, परंतु ते जमिनीकडे सरकताना विरुन जातात.
 
यंदा मात्र त्यांचा प्रवास हा पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे होताना दिसत आहे. गेल्या शंभर वर्षांचा अभ्यास केला तर असे घडलेले दिसत नाही. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसून येत आहे.
 
मान्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल होत आहे का?
 
मान्सूनचा पॅटर्न आणि काळ बदलला असून तो समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत हवामान तज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे मांडतात. यंदा 15 ऑगस्टनंतर खऱ्या अर्थाने मान्सून सुरु झाला असून तो पुढील चार महिने अर्थात 15 डिसेंबरपर्यंत असेल असे जोहरे सांगतात. त्यानंतर देखील परतीचा पाऊस होऊ शकतो, असा दावा देखील त्यांनी बीबीसीशी बोलताना केला.
 
जोहरे म्हणाले, ''पृथ्वीच्या विद्युत तसेच चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल अचानक घडत आहेत. त्यामुळे वातावरणात भोवऱ्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि ढगफुटीसारखा पाऊस होतो. वातावरणातील बदलानुसार मोसमी पावासाच्या हालचालीही अचानकपणे बदलल्या आहेत. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रासह, देशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील काळात, कोकणात पावसात घट होऊन मराठवाडा ,विदर्भामधील दुष्काळी भागांमध्ये देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.'' वातावरणातील हे बदल समजून घेण्याची गरज असल्याचेही ते सांगतात.
 
मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पहिल्यांदाच होतोय?
हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळ आहे का? याबाबत डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, याला चक्रीवादळ म्हणता येणार नाही.
 
चक्रीवादळात वाऱ्याचा वेग साधारण ताशी 64 किलोमीटर एवढा असतो. या वाऱ्यांचा वेग तितका नाही. त्याचबरोबर हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर तयार होत आहे.
 
चक्रीवादळामध्ये हे अंतर अधिक असते. त्यातच चक्रीवादळासाठी गरजेचे असणारे वातावरण यात दिसत नाही, त्यामुळे याला चक्रीवादळ म्हणता येणार नाही.
 
हवामान बदलाचा हा परिणाम
गेल्या वर्षी पुण्यात सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन त्याचे पाणी अनेकांच्या घरात शिरले होते. त्यातच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.
 
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसामध्ये वाढ झाली आहे. याचे कारण हवामानात होणारे बदल आणि जागतिक तापमानात होणारी वाढ असल्याचे डॉ. कुलकर्णी सांगतात.
 
''पावसाळा आता ऑक्टोबरपर्यंत वाढत गेला आहे. हा हवामानातील बदलाचा परिणाम आहे. गेल्या 15 वर्षांचा अभ्यास केला तर ऑक्टोबरमधील पाऊस हा वाढत चालला आहे. तापमानात वाढ होत आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर हवेतील बाष्प धरण्याची क्षमता वाढते आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते.
 
1980 पासून ऑक्टोबरमध्ये पडणाऱ्या पावसात बदल होत आहे, परंतु गेल्या दोन वर्षांपासून हा पाऊस आता मोठ्याप्रमाणावर वाढताना दिसत आहे. हा बदल आता पुढेही असाच चालू राहणार आहे, आणि आपल्याला आता याच्याशी जुळवून घ्यावे लागणार आहे.'' असे कुलकर्णी नमूद करतात.