मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी?; संजय निरुपम यांची मिलिंद देवरांवर टिका

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्याबरोबर काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यानंतर तीनच दिवसांमध्ये देवरा यांनीही मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी मिलिंद देवरा यांचे नाव न घेता 'हा राजीनामा म्हणजे वरच्या पदावर जाण्याची शिडी असावी', अशी शंका उपस्थित केली आहे.
 
मिलिंद देवरा यांनी राजीनामा देताना आगामी विधानसभा निवडणुकीत नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यांची स्थापना करण्यात यावी असेही सुचवले आहे.
 
हा निर्णय पक्षाचे सरचिटणिस मल्लिकार्जून खर्गे, के.सी. वेणूगोपाल आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडेही पाठवल्याचेही देवरा यांच्या कार्यालयाने स्पष्ट केल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
 
तर, "जनमताचा आदर करून आणि उत्तरदायीत्व स्वीकारून मी माझ्या काँग्रेस सरचिटणिसपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सोपवला आहे", असे ट्वीट ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केले आहे.
 
ही जबाबदारी आपल्याकडे सोपवल्याबद्दल आणि लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी ट्विटमध्ये राहुल गांधी यांचे आभारही मानले आहेत.
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाला. संपूर्ण राज्यात पक्षाला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. मुंबईमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.
 
मिलिंद देवरा स्वतः दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघामधून शिवसेनेचे अरविंद सावंत सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन लोकसभेत गेले आहेत.
 
राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले होते. आता मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
देवरा यांच्या राजीनाम्यानंतर संजय निरुपम यांनी राजीनाम्यात त्यागाची भावना अंतर्भूत असते पण इथं राष्ट्रीय पातळीवरचं पद मागितलं जात आहे. हा राजीनामा आहे की वर जाण्याची शिडी? अशा कर्मठ लोकांपासून पक्षानं सावध राहिलं पाहिजे असं त्यांनी ट्विट केलं आहे. इतकंच नव्हे तर देवरा यांनी सुचवलेली तीन सदस्यांच्या समितीची सूचनाही चुकीची आहे असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. यामुळे पक्षाचं अधिक नुकसान होईल असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
 
देवरा कुटुंबीय आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे राजकारण
देवरा कुटुंबाचा आणि मुंबईच्या राजकारणाचा जुना संबंध आहे. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा 1968 साली मुंबई महानगरपालिकेत निवडून गेले. त्यानंतर 1977 साली ते शहराचे महापौर झाले.
 
1984, 1989, 1991, 1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुरली देवरा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातूनच विजय झाला होता. तसेच ते दीर्घकाळ मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी कार्यरत होते.
 
'ऐनवेळी अध्यक्षपदी नेमणं हीच मोठी चूक'
मिलिंद देवरा यांना ऐन निवडणुकीच्यावेळेस अध्यक्षपदी नेमलं हीच काँग्रेसची मोठी चूक होती असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीकडे व्यक्त केलं.
 
ते म्हणाले, लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मिलिंद देवरा यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवलं गेलं. जी व्यक्ती स्वतः निवडणूक लढवत आहे त्या व्यक्ती एकाचवेळी स्वतःचा प्रचार आणि मुंबई शहर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कशी पार पाडू शकेल याचा विचार करायला हवा होता. दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत जर मतदारसंघांत विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी एक वर्ष आधीपासून तयारी करायला हवी होती."
 
राजीनामा देऊन पक्षासमोरील प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला मिळतील का असे विचारले असता अकोलकर म्हणाले,
 
"कोणीच कशी जबाबदारी घेत नाही अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी त्रागा व्यक्त केल्यानंतर हे राजीनामे दिले जात आहेत. पुन्हा राजीनामे देऊन प्रश्न सुटतील का याचे उत्तर कोणीतरी द्यायला हवे. कर्नाटकामध्ये पक्षाच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, तिथला प्रश्न घेऊन कोणाकडे जायचे हेच पक्षातल्या लोकांना माहिती नाही.
 
ज्यांनी जबाबदारीसाठी पुढे आले पाहिजे त्यांनी राजीनामे दिले तर कसे चालेल? काँग्रेस पक्ष सध्या निर्नायकी अवस्थेत जाऊन पोहोचला आहे."
 
राजीनामा म्हणजे पळवाट
काँग्रेसच्या नेत्यांनी आता राजीनामे देणं म्हणजे जबाबदारीतून काढलेली पळवाट आहे असं मत राजकीय घडामोडींचे अभ्यासक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं. "मुंबईचा प्रदेशाध्यक्ष बदला अशी अट घालून निवडणूक लढवणारी व्यक्ती आता राजीनामा देऊन कशी मोकळी होऊ शकते?" असा प्रश्न देशपांडे उपस्थित करतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "काँग्रेसमध्ये नेत्यांना आता समोर काहीच दिसत नाही, जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही आणि मेहनत करण्यासाठीही कोणी तयार नाही असं दिसतं त्यामुळेच ही स्थिती पक्षावर ओढावलेली आहे. आता पक्षाची जबाबदारी घ्यायला नेत्यांनी पुढे सरसावायला हवं होतं. पण तसं होताना दिसत नाही."