गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 1 जुलै 2019 (11:07 IST)

मुंबईत 6 तासांमध्ये 63 मिलीमीटर पाऊस, येत्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रविवार मध्यरात्रीपासून दादर, मुलुंड, ठाणे आणि परिसरात पाऊस पडत आहे. मुंबई आणि परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
 
मुंबई आणी मुंबईला लागून असलेल्या गुजरातच्या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांनी या भागाचं उपग्रह चित्रही जारी केलं आहे.
 
सायन, किंग्ज सर्कलमधल्या सखल भागात आज सकाळी बरंच पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे.
 
सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या मुलांना त्या पाण्यातून मार्ग काढत जावं लागलं.
 
मुंबईत रात्री साडेअकरा ते सकाळी साडेपाच या सहा तासांमध्ये तब्बल 63 मिलीमीटर पाऊस झाल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.
 
कर्जत- खंडाळ्यादरम्यान मालगाडीचे घरसलेले डबे आणि पावसाची संततधार यामुळे मुंबईतली उपनगरीय रेल्वे वाहतूक सुद्धा उशीरानं सुरू आहे.
 
माटुंगा आणि सायन स्थानकामध्ये रेल्वे रुळांवर पाणी आलं आहे.
 
पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे.
 
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जूनमध्ये सामान्य स्वरुपाचा पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मात्र अजून पुरेशा पावसानं हजेरी लावलेली नाही.
 
मुंबईचा 'वेग' पावसामुळे मंदावला
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळदार पावसाला सुरूवात झाली. मुंबईतील हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, परळमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तसंच जोगेश्वर, कुर्ला, अंधेरी, वाकोला, पालघर येथेही पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
 
आज आठवड्यातील पहिलाच दिवस सोमवार असल्याने मुंबईकर आपापल्या कामांवर निघाले होते. मात्र रेल्वे रुळांवर पाणी साचलाने रेल्वे लोकलसेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे, हार्बर रेल्वे १०-१५ मिनिटे उशीराने सुरू आहे. घाटकोपर ते कुर्ला या स्थानकांदरम्यान लोकल्स सुमारे २० मिनिटे थांबत आहेत.
 
ओव्हरहेड वायर तुटली
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची चांगलीच तारंबळ उडाली. जोरदार पाऊस आणि वारा यांमुळे मरीनलाईन्स लोहमार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाचे बांबू ओव्हरहेड वायरवर पडल्याने वायर तुटली.
 
शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यांमधून चालत जावं लागत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील काही शांळांनी आज सुटी जाहीर केली आहे.
 
नवी मुंबईतील वाशी, पनवेल, खारघर भागातही चांगलाच पाऊस पडत आहे. तर वाशी आणि खारघर येथील काही भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.