शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (15:29 IST)

कोरोना व्हायरस गुपचुप पसरवणाऱ्या 'सायलेंट स्प्रेडर्स'चं गूढ

डेव्हिड शुकमन
कोरोना विषाणूचं संकट जसं पाय रोवतं आहे तसतसं शास्त्रज्ञांना या विषाणूची विचित्र आणि काळजीत टाकणारी लक्षणं आढळू लागली आहेत.
 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफ, ताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.
 
कितीजणांना अशा लक्षणं न आढळणाऱ्या आणि न जाणवणाऱ्या छुप्या प्रसारकांद्वारे कोरोना झाला आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, असं वैज्ञानिकांना वाटतं. सायलेंट स्प्रेडर्स अर्थात छुपे प्रसारकच हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरवत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्त्वाचं आहे.
 
19 जानेवारीला सिंगापूरमधल्या चर्चमध्ये भाविक जमले होते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाकरता हा कार्यक्रम जागतिक केंद्रस्थान ठरू शकतो याची तिथे जमलेल्यांपैकी कुणालाही कल्पना नव्हती. रविवार होता आणि प्रथेप्रमाणे प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. 'द लाईफ चर्च अँड मिशन्स' इथं तळ मजल्यावर वय वर्ष 56 म्हणचे वार्धक्याकडे झुकलेलं एक जोडपं आलं. ते त्या सकाळीच चीनहून दाखल झाले होते.
 
कार्यक्रमाच्या ठिकाणी ते उपस्थित होते. दोघांचीही तब्येत व्यवस्थित दिसत होती त्यामुळे हे जोडपं कोरोना विषाणूचं प्रसारक असेल अशी शंकाही कोणाला आली नाही. त्यावेळी प्रदीर्घ काळ झालेला कफ हेच कोव्हिडचं प्रमुख लक्षण होतं. त्याद्वारेच हा विषाणू पसरू शकतो असा समज होता.
 
विषाणूची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत म्हणजे प्रादुर्भाव होण्याचा प्रश्नच नाही असा तर्क त्यावेळी कोणीही काढणं साहजिक होतं.
 
प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच ते जोडपं निघून गेलं. मात्र काही दिवसातच गोष्टी झपाट्याने बदलू लागल्या आणि त्याही अनाकलनीय पद्धतीने. जोडप्यापैकी महिला 22 जानेवारीला आजारी पडली. दोनच दिवसातच पतीही आजारी पडले. ते दोघेही कोरोनाचं जागतिक केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरातून आले होते. त्यामुळे त्यांना बरं नाहीसं होणं आश्चर्यकारक नव्हतं.
 
मात्र त्याच आठवडयात तीन स्थानिकांना आजाराचा संसर्ग झाला. त्यांच्यात कोरोनाची लक्षणं अशी नव्हतीच. सिंगापूरमधल्या डॉक्टरांनाही कोड्यात टाकणाऱ्या केसेस होत्या. या मंडळींना कोरोनाचा संसर्ग झाला तरी कसा हे शोधून काढताना डॉक्टरांना अनेक नव्या गोष्टी समजल्या.
 
आजाराचे 'डिटेक्टिव्ह'
"आम्ही पुरते गोंधळून गेलो," असं डॉ.व्हरनॉन ली सांगतात. डॉक्टर ली हे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयात संसर्गजन्य रोगांचे प्रमुख आहेत. एकमेकांशी ओळख नसलेल्या लोकांना एकमेकांच्या माध्यमातून या आजाराचा संसर्ग झाला. त्यांच्यात कोणतीही लक्षणं नव्हती. हे रुग्ण दाखल होताच आम्ही चक्रावून गेलो कारण कोरोनाची जी सर्वमान्य लक्षणं होती ती या रुग्णांमध्ये जराही आढळली नाही असं डॉक्टर ली यांनी सांगितलं.
 
डॉक्टर ली, त्यांचे सहकारी, पोलीस तसंच विशेष तपास पथकाने एक सखोल चौकशी केली. हे रुग्ण कुठे, केव्हा कसे गेले, आले याचा नकाशाच तयार केला. यातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची पद्धत रुढ झाली. जगभरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वापर केला जात आहे. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं ठरतं. प्रचंड वेगाने आणि परिणामकारक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरता सिंगापूरची जगात प्रशंसा होते आहे.
 
दरम्यान, या दांपत्याच्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग झाल्याचं कळताच चर्चच्या 191 सदस्यांना संपर्क करण्यात आला. यापैकी 142 जण त्या रविवारच्या प्रार्थनेला उपस्थित होते. सिंगापूरमधील ज्या दोनजणांना त्या दांपत्याच्या बरोबरीने कोरोना झाला त्यांना हुडकून काढण्यात आलं.
 
ते एकमेकांशी बोलले असावेत. भेटले असावेत. चर्चमधील कार्यक्रमादरम्यान ते जोडपं आणि सिंगापूरमधील त्या दोन स्थानिकांचं काही ना काही संभाषण झालं असावं असं डॉ. ली यांना वाटतं. कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला असावा याबाबत थोडी माहिती मिळू शकली.
 
मात्र कोणतीही लक्षणं नसताना चीनमधून आलेल्या या दांपत्याच्या माध्यमातून विषाणू नेमका कसा पसरला हे कळू शकलं नाही.यापेक्षाही मोठं कोडं पुढे आहे. सिंगापूरमधल्या तिसऱ्या व्यक्तीला अर्थात 52 वर्षांच्या एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र ही महिला चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित नव्हती. ही महिला त्याच चर्चमधील अन्य एका कार्यक्रमाला उपस्थित होती.
 
पुरावा ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
तपास करणाऱ्या टीमने चर्चचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग चेक केलं. त्यावेळी त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. कोरोनाचा संसर्ग झालेली ती व्यक्ती म्हणजे ती महिला चर्चमध्ये प्रार्थनेला उपस्थित होती. चीनहून परतलेलं जोडपं ज्या खुर्चीवर बसलं होतं त्याच खुर्चीवर ती महिला काही तासांनंतर बसली होती.
 
चीनमधून आलेल्या त्या जोडप्याने कोणतीही लक्षणं दिसत नसताना, आजारी वाटत नसताना त्यांच्याही नकळत विषाणूचा प्रसार केला होता. कदाचित तो विषाणू त्यांच्या हातावर असेल. त्यांनी त्या हाताने खुर्चीला स्पर्श केला असेल. कदाचित त्यांच्या श्वासात तो विषाणू असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र याचे परिणाम दूरगामी आहेत.
 
डॉ. ली विषाणू नेमका कसा पसरला याबाबत अनेक गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे हे पडताळून पाहत आहेत. स्वत:च्या नकळत विषाणूचा प्रसार कसा होतो आहे हे त्यांना शोधून काढायचं आहे. कोरोनाने जगात थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग कसा होतो आहे याविषयी सगळीकडे अभ्यास, संशोधन सुरू आहे. लक्षणं न आढळणाऱ्या व्यक्तीकडून विषाणूचा संसर्ग कसा होतो हे उमगल्यास ते जगभर उपयुक्त ठरू शकतं. कारण आजही कोरोनाची लक्षणं असणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.
 
लक्षणं दिसण्यापूर्वीच प्रसार
प्री-सिम्पटमॅटिक ट्रान्समिशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला संसर्ग होणं मात्र त्याच्या शरीरात कफ, ताप किंवा तत्सम लक्षणं न दिसायला सुरुवात झालेली नाही. अभ्यासानुसार हे स्पष्ट झालं की 24-48 तासात जेव्हा संसर्गाची लक्षणं खऱ्या अर्थाने दिसू लागतात. त्यावेळी संसर्ग अतिशय संवेदनशील टप्प्यात असतो. हे समजणं महत्त्वाचं आहे कारण आजारी असल्याचं कळताच, तुमच्या संपर्कात आलेल्या माणसांना घरीच थांबवता येऊ शकतं.
 
जेणेकरून संसर्ग वाढत असताना त्या माणसांना घरीच क्वारंटीन केलं जाऊ शकतं. त्यांना लक्षणं दिसण्याआधीच त्यांना विलग केलं जाऊ शकतं. मात्र कफमुळे व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकेतून तुषाराद्वारे विषाणू न पसरता संसर्ग अन्य व्यक्तीला कसा होतो हा अद्यापही वादग्रस्त मुद्दा आहे.
 
एक मुद्दा असा की केवळ श्वास घेणं-सोडणं किंवा एखाद्याशी बोलणंही विषाणूच्या संसर्गाकरता पुरेसं ठरू शकतं. विषाणू छातीच्या वरच्या भागात निर्माण होत असेल तर उच्छवासातून तो बाहेर पडू शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती बोलत असताना दुसरं कोणीतरी जवळ उभं असेल तर त्याला लागण होऊ शकते.
 
संसर्गासाठी आणखी एक कारण म्हणजे स्पर्शाने. एखाद्या व्यक्तीच्या हातावर विषाणू असेल, त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हात लावला किंवा दाराला, हँडलला स्पर्श केला तर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू वेगाने पसरतो आहे हे उघड आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे न कळलेली माणसं सार्वजनिक जीवनात सहजपणे वावरू शकतात जे इतरांसाठी धोकादायक ठरू शकतं.
 
काही लोकांमध्ये लक्षणंच दिसत नाहीत
ही आणखी गूढ आणि विचित्र प्रकारची परिस्थिती आहे. याला शास्त्रज्ञांकडेही ठोस उत्तर नाही. लक्षणं दिसू लागण्याआधी माणसांद्वारे संसर्ग होऊ शकतो. परंतु काहीजणांना संसर्ग झाल्यानंतरही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
 
त्यांना असिमटमॅटिक म्हटलं जातं. तुम्ही त्या विषाणूचे वाहक असता मात्र तुम्हाला कोणताही त्रास जाणवत नाही. यासंदर्भातील एक प्रसिद्ध केस म्हणजे आयरिश महिला जी न्यूयॉर्क शहरात कुक म्हणून काम करत होती. या शतकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील ही गोष्ट आहे.
 
मेरी मलोन ज्या ज्या घरांमध्ये कामाला सुरुवात करत त्या त्या घरातली माणसं टायफॉईडने आजारी पडत. कमीत कमी तीन माणसं आजारी पडत, काहीवेळा संख्या जास्त असे. मात्र त्यांना स्वत:ला काहीही त्रास जाणवत नसे. अखेर त्यांच्या माध्यमातून विषाणू पसरतो आहे हे समजलं. त्या सायलेंट स्प्रेडर अर्थात छुप्या प्रसारक असल्याचं लक्षात आलं.
 
वार्ताहरांनी त्यांचं टायफॉईड मेरी असं नामकरण केलं. प्रशासनाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला आणि त्यांना 1938 पर्यंत 23 वर्ष, मृत्यू होईपर्यंत बंदिस्त ठेवलं होतं.
 
काय आहेत गृहितकं?
 
स्टाफ नर्स अमेली पॉवेल यांना त्या असिम्पॅटिक असल्याचं कळल्यावर धक्का बसला. त्यांना जेव्हा हे सांगण्यात आलं तेव्हा त्या केंब्रिज इथल्या एडनब्रूक हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. डॉक्टरांनी त्यांना स्वॉबचा रिझल्ट सांगितला.
 
त्यांचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं. प्रोटेक्टिव्ह किट परिधान करून त्यांचं काम सुरू होतं. मात्र त्याचं कशाचंचं महत्त्व राहिलं नाही जेव्हा त्या स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.
 
मला विश्वासच बसला नाही. रिझल्ट चुकीचा आहे, तो माझा नसेल असं वाटलं. मी अगदी व्यवस्थित आहे असं त्या म्हणाल्या.
 
त्यांना काम सोडून थेट आयसोलेशन वॉर्डात भरती व्हावं लागलं.
 
मला काळजी वाटू लागली कारण या विषाणूमुळे रुग्णांची ढासळत जाणारी परिस्थिती मी पाहिली आहे. हे माझ्याबाबतीतही घडेल का याची मला काळजी वाटू लागली. मात्र त्यांना कोणत्याही क्षणी त्रास झाला नाही. मला जराही काही वेगळं वाटलं नाही-मी घरी व्यायाम करत होते, खाणंपिणं व्यवस्थित सुरू होतं, झोप व्यवस्थित लागत होती- सगळंकाही व्यवस्थित.
 
अशा छुप्या पद्धतीने किती लोकांना विषाणूचा संसर्ग झाला आहे हे शोधून काढणं अवघड आहे.
 
अमेली पॉवेल यांना विषाणूचा संसर्ग झाला हे समजू शकलं कारण त्या हॉस्पिटलचा भाग होत्या. हजारपेक्षा जास्त व्यक्तींना कोणतीही लक्षणं नव्हती आणि तरीही ते पॉझिटिव्ह आढळले.
 
जपान नजीकच्या किनाऱ्यावर नांगर टाकून उभं असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरच्या 700 जणांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नाहीत मात्र ते कोरोना पॉझिटिव्ह होते.
 
संशोधकांच्या मते, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी एक तृतीयांश लोकांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत.
 
वॉशिंग्टनमधल्या एका केंद्रात अर्ध्याहून अधिकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले मात्र कोणामध्येही कोणतीही लक्षणं आढळली नाहीत.
 
कोणतंही विश्वासार्ह संशोधन नाही
लक्षणं न आढळणाऱ्या केसेससंदर्भात जगभरात संशोधन सुरू आहे. अशा केसेसची संख्या 5 ते 80 टक्के एवढी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक कार्ल हेनेघन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनाचा हा निष्कर्ष आहे.
 
लक्षणं न आढळणाऱ्या रुग्णांसंदर्भात एकही विश्वासार्ह ठाम स्वरुपाचं संशोधन नाही. कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी होत असेल तर लक्षणं नसलेल्या मात्र आजाराचे वाहक असलेल्या व्यक्तींकडून होणारा संसर्ग कसा रोखणार?
 
छुप्या प्रसारकांचा धोका
नर्स अमेली पॉवेल यांना वाटणारा धोका काळजीत टाकणारा आहे. त्यांच्या माध्यमातून नकळतपणे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो.
 
माझ्यामार्फत कोरोना विषाणूचा प्रसार झाला असं मला वाटत नाही कारण त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र मी किती काळापासून कोरोना पॉझिटिव्ह आहे हे माहिती नाही, त्याची भीती वाटते. लक्षणं नसलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून संसर्ग पसरतो का याची आम्हाला माहिती नाही. हे सगळंच विचित्र आहे. याबाबत अगदी थोडी माहिती उपलब्ध आहे.
 
चीनमधल्या एका अभ्यासाच्या मते, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, लक्षणं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जास्त आहे. हा यंत्रणेसाठी इशारा आहे. सायलेंट स्प्रेडर्स अर्थात छुप्या प्रसारकांची संख्या वाढणं धोकादायक ठरू शकतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखायचा असेल तर सायलेंट स्प्रेडर्सना रोखायला हवं.
 
डायमंड प्रिन्सेस बोटीवरील केसेसचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडून होणारा संसर्ग कमी तीव्रतेचा असतो. मात्र त्यांच्या माध्यमातून अधिकाअधिक लोकांना या आजाराची लागण होऊ शकते.
 
छुप्या संसर्गाची काळी बाजू
नॉरविचमधले शास्त्रज्ञ अख्ख्या शहराची चाचणी करून घेणार आहेत. लक्षणं न आढळणाऱ्या व्यक्ती कोरोना पॅन्डेमिकच्या केंद्रस्थानी असू शकतात असं प्राध्यापक नील हॉल यांना वाटतं. लाईफ सायन्स रिसर्च सेंटर अर्थात इर्लहम इन्स्टिट्यूटचे ते प्रमुख आहेत. संपूर्ण शहराची चाचणी करून घेण्याच्या उपक्रमासाठी त्यांनीच पुढाकार घेतला आहे.
 
न दिसणारा विषाणू जगभर धुमाकूळ घालतो आहे. त्याचं स्वरुप, त्याचा प्रसार याविषयी काहीही कळत नाहीये.
 
सार्वजनिक आरोग्य यंत्रणांद्वारा हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना या प्रामुख्याने कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या व्यक्तींना समोर ठेऊन आहेत. मात्र छुप्या प्रसारकांना रोखण्यासाठी यंत्रणाच नाही. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे याची माहिती नसलेल्या व्यक्ती बस किंवा ट्रेनने प्रवास करत असतील किंवा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत असतील तर त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग पसरणार असं डॉ. हॉल यांना वाटतं.
 
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लक्षणं असणारी माणसं येतात. त्याने निम्मा प्रश्न सुटू शकतो.
 
कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांच्या मते कोणाच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होतो हे न समजल्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई अधिकच आव्हानात्मक झाली आहे.
 
कोरोनाचा संसर्ग रोखायचं असेल तर चाचण्या करणं आवश्यक आहे. ब्रिटनमधील खासदारांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना यासंदर्भात शिफारस केली आहे.
 
लक्षणं न आढळणाऱ्या व्यक्तींमार्फत हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावू शकतो. आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची नियमितपणे चाचणी घेण्यात यावी. कारण ते रुग्णांची सेवा करत असतात.
 
ब्रिटनपासून दूर असलेल्या चीनमधल्या वुहान म्हणजेच कोरोनाचं केंद्रस्थान असलेल्या शहरातही मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात आल्या.
 
6.5 दशलक्ष लोकांच्या चाचण्या अवघ्या नऊ दिवसात घेण्यात आल्या. मास स्क्रीनिंग प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला होता. अशा उपक्रमाद्वारे लक्षणं न आढळणारे मात्र कोरोना पॉझिटिव्ह केसेस टिपता येतील.
 
लॉकडाऊन शिथिल करणं
जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. अधिकाअधिक माणसं सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करू लागली आहेत. मार्केट्स उघडू लागली आहेत. अशावेळी विषाणूचा संसर्ग फैलावण्याची शक्यता आहे. गर्दीत कोणामध्ये लक्षणं आहेत आणि नाहीत हे कळू शकणार नाही.
 
म्हणूनच जगभरातील सरकारं नागरिकांना नियमांचं पालन करण्याविषयी वारंवार सांगत आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी त्वरित स्वत:ला विलग करावं. सोशल डिस्टन्सिंग हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. हे ज्या ठिकाणी शक्य नसेल तिथे तुम्ही मास्क परिधान करणं आवश्यक आहे.
 
सिंगापूरमध्ये घडलेल्या विषाणू प्रसाराविषयी अमेरिकेच्या सरकारने माहिती दिली. मुद्दा केवळ तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा नाही तर तुमच्यापासून बाकीच्यांना सुरक्षित ठेवण्याचाही आहे. विशेषत: तुम्हाला संसर्ग झाला असेल पण लक्षणं दिसत नसतील.
 
आरोग्य क्षेत्रात कार्यरत लोकांच्या मते, मास्कमुळे लोक, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग तितक्या सजगतेने फ़ॉलो करतील असं वाटत नाही. युके सरकारने या नियमांच्या परिणामकारकतेबाबत नागरिकांना आवाहन केलं आहे.
 
मास्क कोरोनासारख्या संसर्गाला सर्वस्वी रोखू शकेल असं नक्कीच नाही परंतु हा विषाणू फैलावतो कसा हे अद्याप आपल्याला स्पष्टपणे कळलेलं नाही. अशा परिस्थितीत आपल्याला जेवढी काळजी घेतील तेवढी आपण घेऊच शकतो.