शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (20:48 IST)

नरेंद्र मोदींचा राज्यांना सल्ला: 'छोट्या शहरांवर भर देऊन पीसीआर चाचण्या वाढवा

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडियो कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेतली.
देशभरात कोव्हिड चाचणी वाढवावी आणि प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी, असा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषकरुन छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लाही दिला. टिअर-2 आणि टिअर-3 शहरांमध्ये चाचण्या वाढवल्या नाही तर देशव्यापी आउटब्रेकची परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केला.
 
1. दवाई भी और कडाई भी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "हा मंत्र आपण पाळलाच पाहिजे आणि लोकांनीही याचं पालन करावं, यासाठी याचा वारंवार आग्रह धरायला हवा." कुठलाही आजार झाला की केवळ औषध घेऊन भागणार नसतं तर औषध घेतल्यानंतरही काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे कोव्हिड लस घेतली म्हणून मास्क वापरायची गरज नाही, शारीरिक अंतर पाळायची गरज नाही, असं करून चालणार नाही," असंही पंतप्रधान म्हणाले.
 
2.आरटीपीसाआर चाचण्या वाढवण्याची गरज
देशभरात आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, "आरटीपीसीआर चाचण्या वाढवायला हव्या. त्यामुळे नव्या केसेस लवकर ट्रेस होतील.
 
3.मायक्रो कंटेनमेंट झोन
प्रत्येक शहरात मायक्रो कंटेनमेंट झोन बनवायला हवे आणि स्थानिक प्रशासनाने त्यासाठी आग्रह धरावा, असंही पंतप्रधान भर देऊन म्हणाले. मुख्यमंत्र्यांशी बोलताना ते म्हणाले, "स्थानिक प्रशासनाने 'मायक्रो कंटेनमेंट झोन' बनवावे, यासाठी आपण आग्रह धरायला हवा. त्यांनी तिथेच काम करावं. त्यामुळे संसर्ग तिथेच रोखू शकतो आणि संसर्गाची व्याप्ती मर्यादित ठेवण्यात मदत मिळते."
 
4.लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी
पंतप्रधान म्हणाले, "लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मग ते खाजगी असो की सरकारी. (प्रेझेंटेशनच्या) सुरुवातीला जो नकाशा दाखवला त्यावरून असं दिसतं की अनेक भागात पुरेसे लसीकरण केंद्र नाहीत किंवा ते अॅक्टिव्ह नाहीत."
ते पुढे म्हणाले, "तंत्रज्ञान आपली खूप मदत करतंय. त्याचा उपयोग करून आपल्याला सुधारणा करायची आहे. जेवढी जास्त केंद्रं प्रोअॅक्टिव्ह असतील, मिशन मोडमध्ये काम करतील तेवढं लसींचं वेस्टेज कमी होईल, लसीकरण झालेल्यांची संख्या वाढेल आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल. त्यामुळे यावर भर द्यावा, अशी माझी इच्छा आहे."
 
5. व्हॅक्सिन वेस्टेज रोखावं
कोव्हिड-19 लसीची आज संपूर्ण जगाला गरज आहे. मात्र, त्या प्रमाणात उत्पादन होत नाहीय. अशावेळी लसीचा एक डोसही वाया घालवणं परवडणारं नाही. मात्र, भारतात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रकारही घडत आहेत. याविषयाकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आणि हे वेस्टेज तातडीने रोखण्याच्या सूचनाही केल्या.
 
6. लसीची एक्सपायरी डेट
पंतप्रधान म्हणाले, "लसीच्या एक्सपायरी डेटकडेही लक्ष देण्याची गरज आहे. जे डोस आधी आले आहेत ते आधी वापरले जावे आणि जे डोस उशिराने आलेत ते नंतर वापरले जावे."
 
7. मूलभूत उपायांची कठोर अंमलबजावणी
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मूलभूत उपायांची नव्याने कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, स्वच्छता पाळणे, हे मूलभूत उपाय आहेत. मात्र, हे नियम पाळण्यात थोडी ढिलाई होत असल्याचं चित्र आहे.
याचाच दाखला देत पंतप्रधान म्हणाले, "मास्क वापरणे, शारीरिक अंतर पाळणे, स्वच्छता राखणे यावर पुन्हा एकदा भर देण्याची गरज आहे. कठोरपणे अंमलबजावणी करायची गरज असेल तर जरूर करावी."
 
'देशव्यापी आउटब्रेकची भीती'
कोरोनाविरोधातल्या लढ्याला आता वर्ष पूर्ण होतंय. या वर्षभरात भारताने जे काम केलं त्याची जगभरात चर्चा असल्याचं, भारताचं उदाहरण दिलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारतात 96 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. जगातल्या बहुतांश कोरोना प्रभावित देशांना कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना करावा लागला. आपल्या देशातही काही राज्यांमध्ये केसेस कमी झाल्यानंतर अचानक वाढू लागल्या आहेत."
ते पुढे म्हणाले, "हेही बघायला मिळतंय की महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट खूप जास्त आहे आणि संख्याही खूप वाढतेय. जे आतापर्यंत एका अर्थाने सेफ झोन होते तिथेही कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. देशातले 70 जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट दीडशे टक्क्यांनी जास्त आहे. हे इथेच थांबवलं नाही देशव्यापी आउटब्रेकची परिस्थिती उद्भवू शकते. कोरोनाच्या या येऊ घातलेल्या दुसऱ्या लाटेला रोखावंच लागणार आहे."
बेरच ठिकाणी स्थानिक प्रशासन मास्क बाबत, फिजिकल डिस्टंसिंगबाबत फार गांभीर्य दाखवत नसल्याचं सांगत स्थानिक पातळीवर प्रशासनाबाबतच्या ज्या अडचणी असेल त्या सोडवणं सध्या खूप गरजेचं असल्याचा माझा सल्ला असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
याविषयी बोलताना ते म्हणाले, "ही गुड गव्हर्नंसची परीक्षा आहे. कोरोनाच्या लढ्यात आपण जे काही करून दाखवलं आहे त्यामुळे मिळालेला आत्मविश्वास अतिआत्मविश्वासात बदलायला नको आणि हे यश बेजबाबदारपणात बदलायला नको. जनतेमध्ये घबराट पसरवायची नाही. मात्र, सावधगिरी बाळगूत काही पावलं उचलून जनतेला त्रासातून मुक्तही करायचं आहे."
 
'छोट्या शहरांवर लक्ष देण्याची गरज'
पंतप्रधान म्हणाले, "एका गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज आहे आणि ते म्हणजे यावेळी आपले टिअर-2 आणि टिअर-3 शहरं, जी सुरुवातीला प्रभावित नव्हती, त्यांच्या जवळपासच्या परिसरात केसेस वाढत आहेत. कोरोनाच्या बाबतीत आपल्याला जे यश मिळालं त्यातलं एक कारण म्हणजे गावांना कोरोनापासून वाचवण्यात आपल्याला यश आलं होतं. मात्र, कोरोना टिअर-2 आणि टिअर-3 शहरात पोहोचला तर त्याला गावांमध्ये शिरायला वेळ लागणार नाही आणि गावांना सांभाळण्यात आपली यंत्रणा खूप कमी पडते. म्हणूनच छोट्या शहरांमध्ये चाचण्या वाढवण्याची नितांत गरज आहे."
 
कोरोना व्हॅरिएंटचा धोका
कोरोनाचे काही नवीन प्रकार काही देशांमध्ये आढळून आले आहेत. याला व्हॅरिएंट म्हणतात. प्रत्येक विषाणू स्वतःच्या रचनेत काही बदल करत असतो. याला व्हॅरिएंट किंवा स्ट्रेन म्हणतात. कोरोना विषाणूचेही काही नवीन व्हॅरिएंट दक्षिण आफ्रिका आणि युरोपात आढळले आहेत.
भारतातही कोरोना विषाणूने स्वतःत काही बदल करून घेतले आहेत का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. विषाणूच्या गूणसूत्र संरचनेवरून म्हणजेच जिनोम सॅम्पलिंगवरून ते ओळखता येतं. मात्र, त्यासाठी जिनोम सॅम्पलिंग गरजेचं आहे. भारतात सॅम्पलिंगवर आजवर विशेष भर देण्यात आलेला नव्हता. मात्र, यापुढे राज्यांनी जिनोम सॅम्पलिंगसाठीही विशेष काम करावं, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.
यामुळे तुमच्या राज्यात कोरोना विषाणूचा एखादा नवीन व्हॅरिएंट आला आहे का, याची तुम्हाला माहिती मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.
 
'लसीचं वेस्टज तात्काळ रोखावं'
कोरोनावर आज आपल्याकडे लस आहे. या लसीचं उत्पादन सतत सुरू आहे. मात्र, लसीचे डोस वाया जाण्याचेही प्रकार दिसत आहेत. कोरोनाची देशव्यापीच नाही तर जगव्यापी साथ पसरली असताना एक डोसही वाया घालवणं परवडणारं नाही. त्यामुळे हा गंभीर मुद्दा असून त्याला तातडीने आळा घातला पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
ते म्हणाले, "कोरोनाविरोधातल्या लढाईत वर्षभरानंतर लसरुपी शस्त्र आपल्या हाती आलं आहे. हे प्रभावी हत्यार आहे. लसीकरणाचा वेग वाढतोय. एका दिवसात 30 लाख लोकांना लस देण्याचा विक्रमही आपण एकदा करून दाखवला आहे. मात्र, यासोबतच लसीचा डोस वाया जाण्याच्या समस्येला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे."
"तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जवळपास 10 टक्क्याहून जास्त डोस वाया जात आहेत. उत्तर प्रदेशातही जवळपास हीच परिस्थिती आहे. लस वाया का जाते, याची समिक्षा करण्याची गरज आहे. कारण एकप्रकारे जेवढे टक्के लस वाया जाते तेवढ्या टक्के लोकांचा अधिकार आपण मारत असतो."
स्थानिक पातळीवर प्लॅनिंग आणि गव्हर्नंसच्या काही अडचणींमुळे लस वाया जात असतील तर त्या तातडीने दूर करायला हव्या, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणतात, "मला वाटतं राज्यांनी 'झिरो व्हॅक्सिन वेस्टेज' हे उद्देश ठेवून काम करायला हवं. यात जेवढं यश येईल तेवढंच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि इतरांना लसीचे दोन डोस पुरवण्याचं आपलं उद्देश पूर्ण होणार आहे."
 
पंतप्रधानांच्या सूचना
कोरोना विषाणूचा मुकाबला करताना कसं काम करावं, याबाबत आपल्या प्रशासनाला गेल्या वर्षभरात चांगलं प्रशिक्षण मिळालं असल्याचं सांगत प्रशासनाने आता प्रोअॅक्टिव्ह होण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यांमध्ये काम करणाऱ्या 'पँडेमिक रिस्पॉन्स टीम'ला कंटेनमेंट आणि सर्व्हिलियंस यांबाबत नव्याने प्रशिक्षण हवं असेल तर तेही जरूर देण्यात यावं, असी सूचनाही पंतप्रधानांनी केली.
टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट याबाबतही गांभीर्याची गरज असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक संसर्गग्रस्त व्यक्तीची संपर्क साखळी कमीत कमी वेळत शोधून काढणं आणि आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्क्यांहून अधिक ठेवणं सर्वात महत्त्वाचं असल्याची सूचना त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "काही राज्यांमध्ये रॅपीड अंटिजेन टेस्टवर भर आहे. केरळ, ओडिसा, छत्तीसगढ, यूपी या राज्यांमध्ये हे चित्र आहे. यात तातडीने बदल होण्याची गरज आहे. मला वाटतं देशातल्या प्रत्येक राज्यात पीसीआर चाचण्या वाढवण्यावर भर द्यायला हवा."
संपूर्ण देश प्रवासासाठी खुला झाल्यानेही संसर्ग वाढत असल्याचं ते म्हणाले. यासाठी एअर ट्रॅव्हल करून आलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आणि त्याच्या संपर्क साखळीची माहिती सर्व राज्यांनी एकमेकांना द्यावी आणि त्यासाठी आवश्यक ती यंत्रणाही उभारावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली.
परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठीच्या एसओपीचं पालनही काटेकोरपणे व्हायलाच हवं, असंही ते म्हणाले.
कोरोनाविरोधातल्या लढाईत भारताला जे काही यश मिळालं त्यात कोरोना योद्धे, राज्य सरकारं, प्रशासन आणि जनतेचंही योगदान असल्याचं म्हणत पंतप्रधानांनी सर्वांचे आभारही मानले.