रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (18:10 IST)

अर्चना हेब्बार : हेब्बार्स किचनच्या सर्वांत लोकप्रिय शेफच्या यशाचं रहस्य

शरत बेहरा
हेब्बार्स किचनच्या फेसबुक पेजला जवळपास लाखो लोक फॉलो करतात. आजपर्यंत या पेजवरील व्हीडिओंना 1.6 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.
दररोज लाखो लोक हेब्बार्स किचनच्या पाककृतीचे व्हीडिओ फेसबूक, यूट्यूब, पिंटरेस्टच्या माध्यमातून बघतात. 2017 सालात सर्वाधिक व्ह्यूज मिळालेल्या व्हीडिओंपैकी एक या हेबर्स किचनचा फेसबुकवरचा व्हीडिओ होता.
या व्हीडिओमागील व्यक्तीनं कधीच तिची खरी ओळख हेबर किचनच्या प्लॅटफॉर्मवर उघड केली नाही.
बीबीसीनं या व्हीडिओमागच्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याची प्रेरणादायी कहाणी समोर आणली आहे.
हेब्बार्स किचन हा एक ऑनलाईन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, ज्या माध्यमातून भारतीय शाकाहारी पाककृती सोप्या पद्धतीनं कशा बनवाव्या हे शिकवलं जातं.
हेब्बार्स किचन इतकं लोकप्रिय असलं तरी त्यामागे असलेली व्यक्ती कोण? याबद्दल आजवर कुणालाही काहीही माहिती नव्हतं. रेसिपी दाखवणाऱ्या व्हीडिओत डाव्या अंगठ्यात रिंग घातलेला एक हात मात्र दिसायचा. हा हात आहे अर्चना हेब्बार यांचा. या लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्ममागच्या भारतीय चेहऱ्याची ही ओळख.
 
छंद म्हणून सुरुवात
हेब्बार्स किचनच्या संस्थापक आहेत अर्चना हेब्बार. सध्या ऑस्ट्रलियातील मेलबर्नमध्ये येथे वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील उडुपी इथल्या आहेत.
अर्चना हेब्बार यांनी हेबर्स किचनची सुरुवात छंद म्हणून केली आणि त्याला इतका प्रतिसाद मिळेल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
भारतीय पाककृतींच्या फेसबुकवरील पेजमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणारे हेब्बार्स किचन हे एक पेज आहे.
नोएडास्थित डेटा अनालिटिक्स कंपनी विडूलीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2017 साली फुड प्रवर्गात सर्वांत जास्त व्ह्यूज हेबर्स किचनच्या व्हीडिओला मिळाले आहेत.
2017च्या दर महिन्याला सरासरी 9 कोटी इतके व्ह्यूज हेबर्स किचनच्या फेसबुकवरील व्हीडिओंना मिळाले आहेत.
हेबर्स किचनची सुरुवात कशी झाली याबद्दल अर्चना सांगतात, "लग्नानंतर 2015 साली मी ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. सॉफ्टवेअर क्षेत्रातलं माझं करिअर मला तसंच सुरू ठेवायचं होतं. पण स्थानिक कंपनीतल्या अनुभवाशिवाय ऑस्ट्रलियात नोकरी मिळवणं अवघड होतं."
"दरम्यान, वेळ घालवण्यासाठी मी वर्डप्रेसवर अकाऊंट सुरू केलं आणि त्यावर पाककृती कशा बनवायच्या हे फोटोंच्या माध्यमातून स्टेप-बाय-स्टेप सांगू लागले. सुरुवातीला विशेष असा प्रतिसाद मिळत नव्हता."
पण बझफीड टेस्टी व्हीडिओज पाककृतीसंबंधी अनेक व्हीडिओ तयार करत होतं आणि त्यापासून मला प्रेरणा मिळाली, असं अर्चना सांगतात.
फेसबुकवर छोट्या व्हीडिओंच्या माध्यमातून भारतीय पाककृती कशा बनवाव्या हे सांगणारं चॅनेल उपलब्ध नव्हतं. असलं तरी तितकं लोकप्रिय नव्हतं, असंही त्यांच्या लक्षात आलं.
 
छंद ते व्यवसाय
अर्चना पुढे सांगतात, "मी छोटे व्हीडिओ फेसबुकवर टाकायचा प्रयत्न केला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उत्तम होता."
"छंद म्हणून हेबर्स किचनची सुरुवात केली होती. नंतर मात्र त्याचं रुपांतर एका व्यवसायात झालं. स्वयंपाकाची मला नेहमीच आवड होती. पण मी कधी त्यासासाठीचा ब्लॉग सुरू करेन असं वाटलं नव्हतं", अर्चना सांगतात.
हेबर्स किचनच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाबद्दल अर्चना सांगतात, सुरुवातीपासून सर्व काही व्यवस्थित होतं असं नाही.
"मी व्हीडिओ शूट केला आणि नंतर आम्ही एडिट केलं. माझे पती वेबसाईट, मोबाईल अॅप आणि फोटोग्राफी हाताळत होते. या छोट्या व्हीडिओंना सुरुवातीला काही विशेष प्रतिसाद मिळाला नाही. कारण व्हीडिओ शूट करण्यात आणि त्याला एडिट करण्यात माझ्याकडून चुका होत असत."
"असं असलं तरी, फोटो ब्लॉगपेक्षा हे खूप चांगलं होतं. शिवाय मला दर्शकांकडून चांगला प्रतिसादही मिळायला लागला होता. त्यातून मग मला अजून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली आणि व्हीडिओ एडिट करण्याचं तंत्र मी शिकले."
"अगोदर मी आयफोन आणि सेल्फी स्टिकच्या साहाय्याने व्हीडिओ शूट करायचे आणि वैयक्तिक लॅपटॉपवर त्याला एडिट करायचे. व्हीडिओची क्वालिटी गुणवत्ता उत्तम नसली तरी तेव्हा ती एक चांगली सुरुवात होती."
"नंतर व्हीडिओ शूट आणि एडिट करण्यासाठी माझ्या पतीनं मला डीएसएलआर कॅमेरा, व्हीडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर तसंच उत्तम प्रतीचं डेस्कटॉप मशीन भेट म्हणून दिलं. यामुळे अजूनच जिद्दीनं काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. तसंच कुशल व्यावसायिकासारखे व्हीडिओ एडिट करण्यासाठी मी काही वेळ दिला." अर्चना पुढे सांगतात.
"व्हीडिओ अपलोड करण्याअगोदर मी ते माझ्या पतीला दाखवायचे. त्यामुळे व्हीडिओतील उणिवा दूर करण्यास मदत व्हायची. थोड्याच कालावधीत आम्हाला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक होता", त्या सांगतात.
 
फेसबुकवर सर्वाधिक हिट्स
फेसबुकवर सर्वाधिक पाहिलं गेलेलं सहाव्या क्रमांकाचं भारतीय चॅनेल आणि फुड प्रवर्गात सर्वांत जास्त व्ह्यूज हेबर्स किचनला मिळाले आहेत, असं व्हीडोलीची (व्हीडिओ ट्रॅकिंग साईट) आकडेवारी सांगते.
हेबर्स किचनचे बहुसंख्य व्हीडिओ दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचे आहेत. अर्चना यांचे हात आणि पाककृतीसाठी लागणारी भांडी या व्यतिरिक्त या व्हीडिओंमध्ये दुसरं काही दिसत नाही, ऐकूही येत नाही.
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना पाककृतीची सेवा देण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर आंध्र, साऊथ इंडियन, कर्नाटक, केरळ असे विविध विभाग केलेले आहेत.
अर्चना यांनी हेबर किचनच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्यांची ओळख उघड केलेली नाही. अबाऊट अस, आमच्याविषयी या भागातही नाही.
"मला माझ्या गोष्टी खासगी ठेवायला आवडतात. मला फेसबुकवर अनेक रिक्वेस्ट आल्या. त्यांना मी मॅनेज करू शकत नव्हते. मला माझा वैयक्तिक स्पेसही हवी होती. त्यामुळे मी माझ्या स्वत:चे फोटो शेअर करणं थांबवलं आणि लो प्रोफाईल ठेवण्याचा प्रयत्न केला," असं त्या सांगतात.
दररोज एक पाककृती अपलोड करायला हवी, याची खात्री अर्चना बाळगतात.
अनेक लोक अर्चना यांच्या व्हीडिओंमुळे प्रेरित झाले आहेत. तुमचे व्हीडिओ बघून आम्ही प्रेरित झालो आहोत आणि तुमच्यासारखंच किचन आम्हालाही तयार करायचं आहे, असं लोक त्यांना कमेंटमध्ये सांगतात.
शिवाय ब्लॉगवर स्वयंपाकाची शिकवणी देण्याचा प्रयत्न करायला आवडेल, असंही सांगतात.
 
'लोकांनी स्वयंपाकाचा आनंद घ्यावा'
स्वत:चा वेळ घालवण्यासाठी मी हेबर्स किचन सुरू केलं. कारण ऑस्ट्रेलियात नोकरी मिळवणं माझ्यासाठी अवघड काम होतं. पण आता यामुळे माझा फक्त वेळ जात नाही तर त्यामुळे मी व्यग्र असते. उत्तम शिक्षण देणारं हे एक वळण होतं.
पाककृतींच्या साध्या व्हीडिओंच्या माध्यमातून लोकांनी स्वयंपाकाचा आनंद घ्यावा यासाठी त्यांना उद्युक्त आणि प्रेरित करणं, हे अर्चना यांचं ध्येय आहे.
 
अर्चना यांच्या यशाची चतुःसूत्री
1. पाठिंबा महत्त्वाचा : 'माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो,' अशी एक म्हण आहे. तसंच माझे पती फूडी असल्यानं त्यांनी मला स्वयंपाकासाठी प्रेरित केलं.
 
2. पाककृतीसाठी लागणारा वेळ :इडली, डोसा, डाळ, रस्सम, सांबार, करी, पुलाव हे पदार्थ मी एका दमात बनवते. कारण त्याची आता सवयच झाली आहे. पण केक आणि पक्वान्न यांसारख्या पाककृतींमध्ये परफेक्शन येण्यासाठी दोन-तीनदा प्रयत्न करावे लागतात.
 
3. कुकिंग प्लॅन : आम्ही सुरुवात केली तेव्हा प्रयोग करण्यासाठी आमच्याकडे खूप वेळ होता. त्यानुसार त्यात काही बदलही करता येत होते. पण आता माझ्याकडे खूप कमी वेळ असतो. कारण पाककृती बनवताना मला माझी स्वत:ची पद्धत वापरायची असते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वाचकांच्या गरजेला प्रतिसादही द्यायचा असतो.
 
4. आठवड्याचं वेळापत्रक : मी आणि माझे पती विचारविनिमयातून आठवडाभरासाठीच्या पाककृती ठरवतो. एका आठवड्यापूर्वीच आम्ही पाककृतींचा प्लॅन बनवतो आणि तसं वेळापत्रक ठरवतो.
 
हेबर्सची टीम
आमची टीम खूपच लहान आहे. मी आणि माझे पती ऑस्ट्रेलियातून हेबर्स किचनचं काम पाहतो. तसंच माझी मैत्रीण श्रीप्रदा मुंबईतून मला आमचं फेसबुक पेज हाताळण्यासाठी मदत करते. कारण वेळेतल्या फरकासोबत जुळवून घेणं मला खूप अवघड गेलं असतं.
 
पहिला व्हीडिओ : उडुपी खाद्यप्रकारातली मेंथी तांबळी ही माझी पहिली पाककृती होती. व्हीडिओ शूट करणं, त्याला एडिट करणं आणि त्यात असणारी प्रकाशाची भूमिका याचं आम्हाला काहीही ज्ञान नव्हतं. पण लहानपणापासूनच पनीरची पाककृती माझी ऑल टाईम फेवरेट आहे.
सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला व्हीडिओ : आतापर्यंत सर्वांत जास्त प्रतिसाद मिळालेली पाककृती रसगुल्ला ही आहे. रसगुल्ल्याच्या व्हीडिओला 1 कोटी सात लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 6 लाख 2 हजार लोकांनी त्याला शेअर केलं आहे.
रवा केसरी आणि आलू कुल्चा बनवण्याच्या व्हीडिओंना फेसबुकवर जवळपास दीड कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
 
बनवलेल्या पदार्थांचं काय होतं ?
बनवलेले स्नॅक्स आणि ब्रेकफास्टचे पदार्थ आम्ही स्वत: खातो. तसंच आमच्या शेजाऱ्यांसोबतही शेअर करतो. गोड पदार्थांच्या पाककृती मी पॅक करते आणि पतीला त्यांच्या कार्यालयात वाटून देण्यासाठी पाठवते, असं अर्चना सांगतात.
दर्शकांकडून आलेला प्रतिसाद मला पाककृती बनवण्यास आणि नियमितपणे व्हीडिओ शेअर करण्यास प्रेरित करतो, असं त्या सांगतात.
 
पाककृतीची टेस्ट कशी ठरवतात?
अस्सल पाककृती मिळवणं खूपच अवघड असतं. कारण स्थळ आणि परंपरेनुसार प्रत्येकाच्या पाककृतीत वेगळेपणा असतो. तसंच मी माझ्या मित्रांकडून आणि कुटुंबांकडून पाककृती मिळवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करते. माझ्या दर्शकांकडूनही मला त्यांच्या घरच्या पाककृतींविषयी समजतं. त्यांचे मेल मिळतात.