शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (22:57 IST)

NEET-MBBS : नीट परीक्षा आणि वैद्यकीय प्रवेश कधी आणि कसे होणार?

दीपाली जगताप
बारावीचे विद्यार्थी म्हणजे केवळ बोर्डाचे विद्यार्थी नाहीत. तर डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, सीए, शिक्षक अशा अनेक क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे हे लाखो विद्यार्थी आहेत. त्यामुळे सरकारी व्यवस्थेने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
 
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटले असं सध्यातरी म्हणता येणार नाही. कारण लाखो विद्यार्थी वैद्यकीय, इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी अशा विविध अभ्यासक्रांच्या एन्ट्रन्स परीक्षांना प्रविष्ठ होणार आहेत. यापैकी MBBS महाविद्यालयीन प्रवेशांबद्दल बोलायचं झालं तर या परीक्षांवर कोरोनाचं सावट तर आहेच पण याशिवाय प्रत्यक्षात महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
 
नीट ही प्रवेश परीक्षा एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि पशु वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाते. महाराष्ट्रात साडेसहा हजार प्रवेशांच्या जागांसाठी सुमारे दीड लाख विद्यार्थी स्पर्धेत असतात.
गेल्यावर्षी नीटची परीक्षा सप्टेंबर महिन्यात झाली होती आणि थेट जानेवारी महिन्यापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू होती. तेव्हा गेल्यावर्षीही विद्यार्थ्यांचं जवळपास संपूर्ण वर्ष हे परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया यातच गेल..
 
पण यावर्षी विद्यार्थ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बारावीची परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचं टेंशन वाढलं आहे. यामागे नेमकी काय कारणं आहेत? बारावी परीक्षा आणि नीटच्या निकालाचा काय संबंध आहे? तसंच एचएससी बोर्डाचा निकाल वेळेत जाहीर झाला नाही तर विद्यार्थ्यांचे काय नुकसान होऊ शकतं? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.
 
NEET परीक्षेसोबतच बारावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा का आहे?
नीट या एन्ट्रास परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारावर देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नीटचं रँकिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. पण केवळ नीट परीक्षेच्या निकालाच्या आधारे वैद्यकीय प्रवेश होत नाहीत.
या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, AYUSH, ANIMAL HUSBANDARY, DENTAL यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास बारावीत PCB ग्रुपमध्ये म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयात किमान 50% गुण असणं अनिवार्य आहे. त्यामुळे नीटच्या निकालासोबतच बारावीचा निकालही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.
 
गेल्या वर्षीसुद्धा कोरोना आरोग्य संकटात या प्रवेश प्रक्रिया विलंबाने पार पडल्या. पण गेल्यावर्षी बारावीची परीक्षा झाली होती. त्यामुळे PCB मध्ये त्या त्या विषयांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुण मिळाले होते. यावर्षी मात्र परिस्थिती पूर्ण वेगळी आहे.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने बारावीच्या परीक्षा रद्द होत आहेत. तेव्हा PCB ग्रुपचे 50 टक्के गुण कसे मिळणार? हा विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे.
 
PCB ग्रुपचे गुण कशाच्या आधारावर मिळणार?
सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या निकालासाठी सीबीएसई कालबद्ध आणि निर्दोष पद्धतीने वस्तुनिष्ठ निकालाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देणार आहे. यासंदर्भात सीबीएसई बोर्डाने परिपत्रक जारी केलं आहे.
एचएससी बोर्डाने अद्याप परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली नसली तरी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या, "सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही परीक्षा न घेता समांतर पर्याय देण्याची विनंती केली होती. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ."
 
सीबीएसई आणि एचएससी बोर्डाने बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत तर निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार हे स्पष्ट आहे. पण त्याचे नेमके निकष काय असतील हे अजून सांगण्यात आलेले नाही.
 
वैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा PCB ग्रुपच्या अनिवार्य गुणांची सवलत द्यावी अशी मागणी पालक संघटना करत आहेत.
 
सायकॉन ही पालक संघटना वैद्यकीय विद्यार्थी आणि पालकांसाठी काम करते. या संघटनेच्या समन्वयक सुधा शिनॉय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "परीक्षाच होणार नसल्याने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयात चांगले गुण मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांकडे नाही. अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार हे अद्याप स्पष्ट नाहीय. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती आहे."
त्या पुढे सांगतात, "जेव्हा विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावीच्या वर्षात अंतर्गत परीक्षा किंवा इंटरनल असाईनमेंट्स दिल्या तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की या परीक्षांचे गुण थेट वैद्यकीय प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोकस हा बोर्डाची परीक्षा आणि नीटवर असतो. वर्षभर ज्या छोट्या परीक्षा होतात त्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष दिलं असेलच असे नाही. त्यामुळे आता अचानक सरकार जर इंटरनल गुणांच्या आधारे निकाल जाहीर करेल तर PCB च्या गुणांवर त्याचा परिणाम होणार आहे."
 
वशीलेबाजी होण्याची शक्यता?
जवळपास पंधरा लाख विद्यार्थी नीट परीक्षा देत असतात. ही स्पर्धा परीक्षा असल्याने आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यात प्रविष्ठ होत असल्याने असे शेकडो विद्यार्थी असतात ज्यांना नीटमध्ये एकसमान गुण मिळालेले आहेत. अशावेळेस मेरिट यादीत कोणत्या विद्यार्थ्याला प्राधान्य द्यायचा असा प्रश्न असतो.
 
यावर तोडगा म्हणून दोन्ही विद्यार्थ्याचे पीसीबीचे गुण पाहिले जातात. ज्या विद्यार्थ्याला पीसीबीमध्ये अधिक गुण असतील त्याला मेरिट यादीत प्राधान्य मिळतं.
 
राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्डचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितलं, "यंदा परीक्षा होणार नसल्यास स्थानिक पातळीवर पीसीबीचे गुण देताना वशिलेबाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून दिले जातील. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकं सुद्धा झालेली नाहीत. तेव्हा यापूर्वी जो निकाल केवळ बोर्डाच्या माध्यमातून जाहीर होत होता तो आता स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या हातात असू शकतो. यामुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचीही शक्यता आहे."
"केंद्र आणि राज्य सरकारने यावर तोडगा काढायला हवा. पीसीबीचे गुण हे प्रवेश घेण्यासाठी आणि महाविद्यालय निवडण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे एचएससी बोर्डानेही गुण देण्याचे निकष ठरवताना याची खबरदारी घेणं गरजेचं आहे,"
 
गुण देताना फेवरेटिजम होण्याची शक्यता आहे असं विद्यार्थी सुद्धा सांगतात. एचएससी बोर्डाची विद्यार्थिनी शांभवी कामत सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे.
 
ती सांगते, "एचएससी बोर्डाची परीक्षा होणार की नाही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. परीक्षा जरी झाली नाही तरी आमच्या ऑनलाईन युनीट टेस्ट झालेल्या आहेत. पण या परीक्षांची हजेरी फारच कमी होती. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन कसं करणार? शिवाय, अशावेळी गुण देताना अनेकदा फेवरेटिजम खूप होतो. काही विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले जातात तर काहींना कमी दिले जातात. यात पारदर्शता नसते. त्यामुळे याचा परिणाम बारावीच्या निकालावर होऊ शकतो."
 
नीटचा अभ्यासक्रम आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम हा एकच आहे. त्यामुळे एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दोन्ही बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. यात आमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही जास्त खर्च होते, असंही शांभवी सांगते.
ती पुढे सांगते, "एमबीबीएसला जाण्यासाठी वर्षातून एकदाच नीट परीक्षा होते. पण इंजिनिअरिंगच्या मुलांना जेईई देण्यासाठी चार संधी मिळतात. त्यामुळे किमान एका परीक्षेत तरी अपेक्षित गुण मिळवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. आम्हाला यावर्षी नीटमध्ये चांगले गुण मिळाले नाहीत तर पुढच्यावर्षी पर्यंत वाट पहावी लागते. ही संपूर्ण सिस्टम प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकसमान नाही असंही आम्हाला वाटतं."
 
HSC बोर्डाचा निकाल वेळेत जाहीर झाला नाही तर?
महाराष्ट्रात बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी एचएससी बोर्डाचे असतात. सीबीएसई बोर्डाचे बारावीचे विद्यार्थी तुलनेने अत्यल्प आहेत.
 
राज्यात वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश वैद्यकीय संचालनालय म्हणजे (DMER) या स्वतंत्र आस्थापनेकडून होत असतात. याठिकाणी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होतात. प्रवेशासाठी गुणवत्ता यादी सुद्धा ऑनलाईन जाहीर केली जाते.
 
नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी तेव्हाच पात्र होतो जेव्हा त्याच्याकडे बारावीचा (PCB) 50% गुण मिळाल्याचे निकाल पत्र हाती असते. अशा परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सुरू होईपर्यंत एचएससी बोर्डाचा निकालच जाहीर झाला नाही तर यंदा विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात.
 
दरवर्षी एचएससी बोर्डाची परीक्षा मार्च-एप्रिल या महिन्यात पूर्ण होते. मे अखेरपर्यंत निकालही जाहीर होतो. पण यंदा परीक्षाच होण्याची शक्यता धूसर असल्याने निकालाचे निकष आणि प्रत्यक्षात निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
DMER चे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही एचएससी बोर्डाच्या निकालासाठी थांबू शकत नाही. पण सहसा अशी परिस्थिती उद्भवणार नाही. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीपर्यंत एचएससी बोर्डाचा निकाल जाहीर होणं गरजेचं आहे. तोपर्यंत विद्यार्थी इतर कागदपत्र दाखल करू शकतात."
 
नीट परीक्षा पुढे ढकलणार?
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षा रखडल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजंसीनेही वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट 1 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं सांगितलं असलं तरी ही परीक्षा सुद्धा आणखी काही दिवस पुढे ढकलली जाऊ शकते. कारण नीटचे प्रवेश अर्जच अद्याप उपलब्ध नाहीत.
 
सुधा शिनॉय सांगतात, दरवर्षी नीटचे प्रवेश अर्ज भरल्यानंतर साधरण दोन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्यक्षात परीक्षा होते. यावर्षी अजून प्रवेश अर्जच मुलांपर्यंत पोहचलेले नाहीत. त्यामुळे 1 ऑगस्टला परीक्षा होणार का, याबाबत संभ्रम आहे.
 
देशभरात ही परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी होत असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे नियोजन करणं, परीक्षा केंद्र ठरवणं, अडमिट कार्ड विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणं, प्रश्नपत्रिका, सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था अशा सगळ्या आयोजनासाठी शासन व्यवस्थेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
 
एमबीबीएस आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अगदी नववी-दहावीच्या इयत्तेपासून पूर्व तयारी केलेली असते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचे निकष ठरवत असताना त्यात पारदर्शता असेल आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी शिक्षण मंडळांना घ्यावी लागणार आहे.