मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (10:03 IST)

नितीन गडकरीः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शीतयुद्ध असल्याच्या चर्चेला दिला नकार - विधानसभा निवडणूक

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात फारशी उपस्थिती न दिसणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी विदर्भातील प्रचारात सक्रिय झाल्याचं चित्र दिसत आहे.
 
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत संपादक आशिष दीक्षित यांच्याशी नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणूक प्रचार, काश्मीर प्रश्न, त्यांचा प्रचारातील सहभाग, भाजपच्या जाहीरनाम्यातील स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याचं वचन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये कोणतंही शीतयुद्ध नाही असं गडकरी यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
 
नितीन गडकरी आतापर्यंत प्रचारात दिसत नव्हते. कुठे होते नितीन गडकरी?
 
मी खरं तर फॉर्म भरल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच प्रचारात सहभागी झालो आहे. फक्त मी विदर्भात प्रचार करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझं असं ठरलं की मी विदर्भावर लक्ष केंद्रीत करावं. ते पश्चिम महाराष्ट्रात वगैरे ठिकाणी लक्ष देतील. मी 47 सभा घेतल्यात आतापर्यंत.
 
चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, कोहळे यांच्यासारख्या तुमच्या जुन्या सहकाऱ्यांना तिकीट मिळालं नाही.
 
तिकीट कुणाला द्यायचं हे निर्णय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरच होतात.
 
अगदीच, पण नितीन गडकरीच्या जवळच्या माणसांनाही तिकिटं मिळाली नाहीत. त्याबद्दल अनेक ठिकाणी लिहिलं गेलं.
 
ही चुकीची चर्चा आहे. राजकारणात माझ्या कुणीही जवळचा किंवा दूरचा असं नाहीये. माझे सगळेचजण जवळ आहेत. प्रत्येक उमेदवार माझा आहे. मी कधीच गट-तट केले नाहीत.
 
देवेंद्र फडणवीसांना नाकाखालची माणसं हवी आहेत, अशी चर्चा केली जातेय. तुमचं निरीक्षण काय आहे याबद्दल?
ही चर्चा योग्य नाही. महाराष्ट्रात त्यांनी फार मोलाचं काम केलंय आणि महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलंय त्यांना.
 
तुमच्यात आणि देवेंद्र यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे अशी मुंबई-दिल्लीतल्या पत्रकारांमध्ये चर्चा आहे.
 
हे 101 टक्के चूक आहे. देवेंद्रनं फॉर्म भरला तेव्हा तो माझ्या घरी आला आणि त्यानं माझा आशीर्वाद घेतला. मला लहान भावासारखा आहे तो.
 
मला महाराष्ट्रात यायचंच नाही. मी राष्ट्रीय राजकारणात माझी भूमिका ठरवली आहे. माझा देवेंद्रना पूर्ण पाठिंबा आहे. आमचा संवाद चांगला आहे.
 
लोकमतच्या कार्यक्रमातल्या भाषणात नेहरू, ए.बी.वर्धन यांचा उल्लेख तुम्ही केला. तुमच्यात मतभेद होते, मनभेद नव्हते असं वाक्य तुम्ही वापरलं होतंत तेव्हा. पण आता सध्या विरोधकाला संपवून टाकण्याचं राजकारण केलं जातंय, पण तुमची भाषा वेगळी वाटते. तुम्हाला हे पटतंय का?
 
असं, राजकारण भाजप करत नाही.
 
पण काँग्रेसमुक्त भारत म्हणजे संपवण्याचंच राजकारण नाहीये का?
काँग्रेसमुक्त म्हणजे काँग्रेसची मेजॉरिटी आहे तिथे भाजपाला निवडून आणायचं. संधी घेण्याचा अर्थ आहे.
 
राज ठाकरे तुमचे मित्र आहेत, असं तुम्ही म्हणाला होतात. पण ते तुमच्या बाजूने बोलत नाहीयेत. तरी ते तुमचे अद्याप मित्र आहेत का?
राजकारण वेगळं आहे आणि आमचे संबंध वेगळे आहेत. आम्ही काही एकमेकांना सपोर्ट मागितला नाहीये. त्यांना मेजॉरिटी मिळणार नाही माहिती आहे. त्यांनी विरोधीपक्ष म्हणून निवडून देण्याचं आवाहन केलंय. मला त्यात काही गैर वाटत नाही.
 
भाजपच्या मेनिफेस्टोमध्ये सावरकरांचा मुद्दा आहे. काँग्रेसनं विरोध केलाय त्याला. गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीवर्षी सावरकरांना भारतरत्न देणं अयोग्य होईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे.
जेव्हा जेव्हा अशी चर्चा ऐकतो तेव्हा डोळ्यांत पाणी येतं. सावरकरांचं माझी जन्मठेप पुस्तक वाचलं असेल, तर कळेल. की देशासाठी सावरकरांचं आयुष्य आणि परिवार उद्ध्वस्त झालाय. सावरकर थोर देशभक्त होते. महात्मा गांधींच्या खून खटल्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत. त्यांचा या खटल्याशी काहीही संबंध नाही. त्यांच्या विचाराबद्दल मतभेद असू शकतात पण देशभक्तीबद्दल शंका घेणं योग्य नाही. त्यामुळे सावरकर वादाचा विचार करू नये.
 
आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे हे तुम्हाला मान्य आहे का? आणि मान्य असेल तर त्यावर बोलायचं सोडून 370 वर का बोललं जातंय?
370 हा राष्ट्रीय मुद्दा आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकीत ती होणं साहजिकच आहे. त्यात काही गैर नाहीये. आर्थिक बाबतीत बोलायचं, तर जगात रिसेशन आहे. कधी डिमांड-सप्लायमुळे कधी बिझनेस सायकलमुळे आणि कधी ग्लोबल इकॉनॉमीमुळे ही परिस्थिती येतेच. आम्ही जे प्रयत्न करतोय त्यामुळं अधिक रोजगार निर्माण होतील. पण मला आर्थिक संकट आहे असं वाटत नाही.
 
पण आपला जीडीपी ग्रोथ रेट कमी होतोय.....
ती एक सायकल असते. पुढल्या सहा महिन्यात आणखी चांगली परिस्थिती येईल.
 
गेल्या विधानसभेत तुम्ही विदर्भ राज्य करण्याचं आश्वासन दिलं होतंत.
भाजप छोट्या राज्यांची समर्थक आहे. कारण विकास करणं सोपं जातं. आजच्या घडीला विदर्भाचा विकास होतो आहे. योग्य वेळ आली की छोट्या राज्याची निर्मिती केली जाईल. आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.
 
आता अजेंड्यावर हा मुद्दा नाहीये का?
अजेंड्यावर आहे. पण आता अंमलबजावणी होईल अशी स्थिती नाहीये.