1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

इंडोनेशियात निवडणुकीच्या कामाच्या ओझ्यामुळे 272 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

भारताप्रमाणेच सध्या इंडोनेशियातही निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अनेक कर्मचारी अहोरात्र निवडणुकीच्या कामांमध्ये गुंतले आहेत. मात्र निवडणुकीच्या कामांचा हा भार इतका होता, की 270 हून अधिक कर्मचाऱ्यांचा कामाच्या ओझ्यानंच मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
 
थकवा आणि ताणामुळे ओढावणाऱ्या आजांरानी या निवडणूक कर्मचाऱ्यांचा बळी घेतला. इंडोनेशियाच्या निवडणूक आयोगाचे प्रवक्ते एरीफ प्रियो सुसांतो यांनी सांगितलं, की कामाच्या धकाधकीत 1878 कर्मचारी आजारी पडले आहेत. सध्या इंडोनेशियामध्ये मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. कर्मचारी हातांनी या मतपत्रिका मोजत आहेत.
 
अपुऱ्या सोयी-सुविधांचा आरोग्यावर परिणाम
17 एप्रिलला झालेल्या मतदानानंतर 70 लाख लोक मतमोजणीच्या प्रक्रियेत गुंतले होते. प्रचंड उष्मा आणि अपुऱ्या सोयी-सुविधांमध्ये हे कर्मचारी काम करत होते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. इंडोनेशियाची लोकसंख्या 26 कोटी आहे. इथं निवडणुकांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी एकाच वेळी अनेक निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या.
 
इंडोनेशियात 19.3 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 80 टक्के लोकांनी आपला मतदानाचा अधिकार वापरला आहे. निवडणुकांमध्ये देशभरात जवळपास 8 लाख मतदान केंद्र बनविण्यात आली होती.
 
कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले बहुसंख्य कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीवर घेतलेले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. मात्र कंत्राटी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली नव्हती.
 
सरकार निवडणुकीसाठी सज्ज नव्हतं, अशी टीका सरकारवर होत आहे. निवडणुकीच्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करणं हा सरकारचा निर्णय चुकल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे. 22 मे पर्यंत मतमोजणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती आणि सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येतील.